सहकार, संघर्ष, समाजव्रत आणि सीताराम राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020   
Total Views |
Sitaram Rane _1 &nbs


कोकणातील एका लहानशा गावातून मुंबईत आपले नशीब आजमावण्यासाठी आलेल्या सीताराम राणे यांनी रूजवलेल्या सेवाव्रताचा अंकुर आज वटवृक्षाच्या रुपात कित्येकांना सावली देत उभा आहे. सहकार क्षेत्र असो वा सामाजिक क्षेत्र, त्यांच्या योगदानाचा दै. 'मुंबई तरुण भारत'ने घेतलेला हा आढावा...

 
 
सहकार क्षेत्रातील प्रश्न असो, पालिका स्तरावरील समस्या, गृहनिर्माण संस्थांसंदर्भातील तक्रारी असोत किंवा विद्यार्थी-तरुणांना लागणारी सर्वोतोपरी मदत, सीताराम राणे आपला हक्काचा माणूस, अशी ओळख त्यांनी आपल्या कारकिर्दीत तयार केली. कणकवली तालुक्यातील वाघेरी या लहानशा गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात राणे यांचा जन्म झाला. वडील बाजी राणे हे पोलीस सेवादलात कार्यरत असल्याने वडिलांची सततची बदली ठरलेली. बालपणापासून वडिलांसोबत राहत असल्याने जेवण आणि घरातील सर्व कामांची जबाबदारी अवघ्या दहाव्या-अकराव्या वर्षी त्यांच्यावर पडली.
 
 
शिकत असतानाच हा सर्व घरातील कामांचा दैनंदिन खटाटोप करावा लागत असल्याने अजाणत्या वयात कौटुंबिक जबाबदारीची जाणीव राणे यांना झाली. हातात असलेल्या पैशांतून घरखर्च आणि जबाबदार्या सांभाळण्याची शिकवण आपसूकच मिळत गेली. त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना व्यवहार करताना अडचणी आल्या नाहीत. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर राणे यांनी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर नोकरी हा एकमेव उद्देश त्यांच्यासमोर होता. तरीही रात्रशाळेत शिकून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिकत असतानाच चार्टड अकाऊंटंटकडे नोकरी मिळाली. अकाऊंटच्या कामाचा अनुभव घेऊन 'कॅसल मिल'मध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर 'जीआयसी'च्या भरतीत गुणवत्तेनुसार निवड झाल्यानंतर १० वर्षे त्यांनी ही नोकरी केली. मुळात नोकरी करणे हा स्वभाव नसल्याने त्यांच्यातील उद्योजक त्यांना खुणावत होता. यामुळेच उद्योग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
 
 
१९९५च्या काळात युती सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची घोषणा केली. ठाण्यातील एक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम हाती घेतले. मात्र, या कामात अपयश आल्याने त्यांनी गुंतवलेले भांडवलही त्यांना परत मिळाले नाही. धंद्यात उतरल्यानंतर पहिल्यांदाच आलेले अपयश पाहता, पुन्हा तोच व्यवसाय करण्यास इतर सर्वसामान्य व्यक्ती धजावला नसता. मात्र, राणे यांनी त्याच याच प्रकल्पाच्या बाजूला दुसर्या एका प्रकल्पाचे काम हाती घेतले आणि ठाण्यातील 'साई आनंद प्लाझा' हा गृहनिर्माण प्रकल्प राणे यांनी यशस्वी करून दाखवला. तत्कालीन ठाणे मनपा आयुक्तांनीही या प्रकल्पाची प्रशंसा केली.
 

सहकार क्षेत्रातून संघर्षाला सुरुवात

 
माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यापासून प्रेरणा घेत कोकणातील शेतकर्यांच्या हक्कासाठी लढण्याचे काम त्यांनी याच काळात सुरू केले. मात्र, सक्रिय राजकारणात न उतरता सहकार क्षेत्राकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. १९९७ मध्ये त्यांनी ठाण्यात 'समर्थ भंडार'ची निवडणूक त्यांनी लढवली. मात्र, यातही त्यांचा पराभव झाला. पुढील निवडणुकीत मात्र, त्यांनी एकहाती सर्व पॅनलमध्ये विजय मिळवला. एकेकाळी तोट्यात गेलेली 'समर्थ भंडार संस्था' त्यांनी नफ्यात आणण्याचे काम याच काळात केले. २००७मध्ये 'हौसिंग फेडरेशन'च्या निवडणुकीत लढण्याचा आग्रह त्यांना करण्यात आला. या निवडणुकीतही त्यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले. याच दरम्यान, त्यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध विषयांतील अभ्यास गाढा होत गेला. 'दि. ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन'वर निवडून आल्यानंतर जनतेपर्यंत या क्षेत्रातील प्रश्न पोहोचवण्यासाठी 'हौसिंग हेराल्ड'हे त्रैमासिक सुरू केले. कालांतराने हे मासिक म्हणून प्रसिद्ध केले जाऊ लागले. या माध्यमातून गृहनिर्माण संस्था, ग्राहकांचे हक्क, पदाधिकार्यांची कर्तव्ये आणि या क्षेत्रातील विविध प्रश्न हाताळण्याचे काम त्यांनी सुरू केले. परिणामी, २००६ साली फेडरेशनमध्ये असलेल्या सभासदांची संख्या सहा हजारांवरून आता १५ हजारांच्या आसपास पोहोचली आहे.
 
 
सहकार क्षेत्रात हौसिंग फेडरेशन्ससाठी वेगळा कायदा असावा, अशी मागणी पहिल्यांदा राणे यांनी केली होती. २०१८ मध्ये तशी तरतूद सहकार कायद्यामध्ये करण्यात आली. हौसिंग सोसायट्यांना बंदपत्रातून मुक्तता करण्याचे काम, डीम्ड कन्व्हेअन्स कायद्यात सुलभता आणून त्यासाठी लागणार्या कागदपत्रांच्या जाचक अटी दूर करून ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठीचे प्रश्न लावून धरले.'एलबीटी' कर आकारणीचा प्रश्न, भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीला विरोध आदी प्रश्न लावून धरले. अभिरूप महासभा भरवून पालिका सभागृहात मांडण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींना केले. परिणामी, 'दि. ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन' हे जनतेला न्याय मिळवण्याचे व्यासपीठ आहे असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. आजही याच संस्थेच्या माध्यमातून अनेक गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सरकार दरबारी लावून धरण्याचे काम केले जात आहे. या सर्व सामाजिक व राजकीय प्रवासात राणे यांचे कुटुंबीय कायम त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या अर्धांगिनीने खंबीरपणे उभे राहत पाठबळ दिले.


 
 

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार
 
आपण ज्या मूळ गावातून आलो, तेथील तरुणांसाठी, शेतकरी-कष्टकर्यांप्रति एक सामाजिक जबाबदारी म्हणून समाजकार्य करावे, या हेतूने कोकण ग्रामविकास मंडळ, ठाणे या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला ठाण्यातील दहीहंडी उत्सव आणि इतर उपक्रमांद्वारे राणे यांच्या कार्याला बर्यापैकी प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, दहीहंडीतील थरांचा वाद आणि स्पर्धा या कारणांमुळे उत्सवाच्या खर्चाची बचत मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजवर दहीहंडीचा उत्सव न करता खर्चाची रक्कम गरजूंसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना सायकल वाटप, त्यांच्या नावे ठराविक रक्कमेची मुदत ठेव आदी उपक्रम या माध्यमातून त्यांनी राबवले.
 
 
मालवणी महोत्सव
 
 
कोकणातील शेती, लघुउद्योग, खाद्यसंस्कृती, पारंपरिक व्यवसाय, कलाकुसर यांना ठाणे, मुंबईतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने ठाण्यात दरवर्षी 'कोकण ग्राम विकास मंडळा'च्यावतीने 'मालवणी महोत्सवा'चे आयोजन केले जाते. २२ वर्षांपासून हा महोत्सव ठाण्यात भरवला जात आहे. या माध्यमातून कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या महोत्सवातील स्टॉल्सवर दहा दिवसांमध्ये तब्बल साडे तीन कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे. या महोत्सवातून अनेक स्टॉलधारकांना पुढील वाटचालीची संधी मिळाली. कोकणातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
 

Malvani-Mahostav _1  
 
 
 
महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ मर्यादित या संस्थेचे अध्यक्ष, ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को ऑप. फेडरेशनचे अध्यक्ष, कोकण ग्राम विकास मंडळ, ठाणे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, जिल्हास्तरीय समन्वय समिती डीम्ड कन्व्हेअन्स, महाराष्ट्र शासनाचे निमंत्रक, सिटीझन फोरम ठाणेचे सल्लागार आणि भाजप राष्ट्रीय परिषद सदस्य अशा विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून आपल्या सेवाकार्याचा वसा अविरत सुरू ठेवणार्या सीताराम राणे यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा...!




Selfie Point _1 &nbs





@@AUTHORINFO_V1@@