‘मिस्टर ३६०’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
ab devillers_1  




आक्रमक फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक, चपळ यष्टिरक्षक आणि हुशार कर्णधार अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या क्रिकेट विश्वातील ‘मिस्टर ३६०’अर्थात ए. बी. डिव्हिलियर्सच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...

केट हा खेळ केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील एकूण १०४ देशांनी क्रिकेटला पसंती दिली असून फुटबॉलनंतर जगभरात प्रसिद्ध असणारा हा दुसरा जागतिक खेळ. विश्वचषक स्पर्धेत आघाडीचे दहा ते बारा मुख्य संघ जरी सहभागी होत असले तरी क्रिकेटचा विस्तार हा संपूर्ण जगभरात पसरलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. क्रिकेटविश्वात भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक विक्रम आपल्या नावावर करून ठेवले आहेत. भारतीयांप्रमाणेच काही परदेशी क्रिकेटपटूंनीही आपल्या नावावर अनेक विक्रम केले असून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स हा त्यांपैकीच एक.

३६ वर्षीय ए. बी. डिव्हिलियर्सच्या नावावर क्रिकेटविश्वात आत्तापर्यंत अनेक विक्रम असून अद्यापही कोणत्या खेळाडूला ते मोडता आलेले नाही. ‘दक्षिण आफ्रिका संघाचा कणा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच आपल्या वयाच्या ३४व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आपल्या करिअरमध्ये परमोच्च स्थानी असताना आणि आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून जगभरात प्रसिद्ध असतानाच ए. बी. डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरा दिला. अवघ्या ३४व्या वर्षी निवृत्ती घेणारा ए. बी. डिव्हिलियर्स हा पहिलाच खेळाडू. निवृत्तीनंतरही आपली तंदुरुस्ती कायम राखत विविध ‘लीग’ स्पर्धांच्या सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन करत त्याने अनेकांवर आपली छाप पाडण्यात यश मिळविले. संघाचा कणा म्हणून ओळखला जाणार्या डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या दुबळ्या संघांविरोधातही विजयासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे डिव्हिलियर्सला संघात पुन्हा एकदा सामावून घेण्याची मागणी क्रिकेटप्रेमींकडून होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी त्याला विनंतीही केली असून लवकरच तो आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करणार असल्याची दाट शक्यता आहे. डिव्हिलियर्सने संघात जर पुनरागमन केले तर क्रिकेटविश्वातील ही ऐतिहासिक घटना असेल. कारण, असे करणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल. डिव्हिलियर्स पुनरागमन करणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्याने फाप ड्यू प्लेसिसने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून यष्टिरक्षक क्विंटन डिकॉककडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची ही रणनीती मानली जाते.

अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स असे त्याचे पूर्ण नाव. १७ फेब्रुवारी, १९८४ साली दक्षिण आफ्रिकेतील वामबार्ड येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील बेंजामिन डिव्हिलियर्स हे पेशाने डॉक्टर होते. ‘रग्बी’ या खेळात त्यांना फार रस होता. डिव्हिलियर्सने मोठे होऊन डॉक्टर बनण्याऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू व्हावे, ही त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी लहानपणापासूनच डिव्हिलियर्सला विविध खेळ खेळण्याची प्रेरणा दिली. केवळ क्रिकेटच नव्हे, तर बॅडमिंटन, स्विमिंग, रग्बी, हॉकी, फुटबॉल, टेनिस, अॅथलेट आदी सर्व प्रकारचे खेळ डिव्हिलियर्स लहानपणापासूनच खेळायचा. विविध खेळांमध्ये रुची असली तरी शालेय अभ्यासातही डिव्हिलियर्स हुशार होता. शालेय अभ्यासादरम्यान त्याने केलेल्या विज्ञान प्रकल्पाला दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या हस्ते राष्ट्रीय पदकही मिळाले आहे. सर्व खेळांमध्ये रुची असली तरी क्रिकेटमध्येच डिव्हिलियर्सने करिअर करण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ‘उजव्या हाताचा फलंदाज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिव्हिलियर्सने आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ११४ कसोटी सामन्यांमध्ये २२ शतके ठोकली आहेत. त्याने कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८,७६५ धावा केल्या आहेत. त्याशिवाय २२० एकदिवसीय सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९,५७७ धावा केल्या आहेत. ७८ ‘टी-२०’ सामन्यांमध्ये त्याने १० अर्धशतके ठोकत १,६७२ धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सच्या नावावर ‘वन-डे’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने अर्धशतक आणि शतक झळकावण्याचा जागतिक विक्रम आहे. त्याने ‘वेस्ट इंडिज’विरुद्ध २०१५ मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्यात हा विक्रम केला होता. डिव्हिलियर्सच्या नावावर असलेला सर्वात वेगवान अर्धशतक आणि शतकाचा विक्रम अद्याप कोणालाही मोडता आलेला नाही. आक्रमक फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. उत्तम क्षेत्ररक्षण, चपळ यष्टिरक्षक आणि हुशार कर्णधार या सर्वांमुळे त्याला क्रिकेट विश्वात ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखले जाते. क्रिकेट विश्वात त्याचे पुनरागमन झाल्यास स्वागतच करायला हवे.



- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@