स्त्रीदाक्षिण्य आणि शिवराय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2020
Total Views |
Chhatrapati-Shivaji-Mahar
 
परवा-परवा हिंगणघाटच्या रस्त्यावरती माझ्या एका भगिनीला जीवंत पेटवून देण्यात आले. अशा घटना रोज घडत होत्या. अशा परिस्थितीमध्ये ‘शिवजयंती’ साजरी करायची म्हणजे नक्की काय करायचे? कारण, ज्या महापुरुषाची जयंती साजरी करायची आहे, त्याच्या विचारांचा थोडा तरी अर्थ उरला आहे का? आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यानिमित्ताने महाराजांचे कर्तृत्व आणि विचारांचे स्मरण करायलाच हवे...
 
 
सहजपणे शिवचरित्रात डोकावले तर काय दिसते, गावच्या पाटलाने बाबाजी भिकाजी गुर्जराने जेव्हा गरिबाघरची पोरगी बाटवली आणि हे प्रकरण शिवबांकडे आले, त्यावेळी सर्वांसमक्ष जिजाऊ आईसाहेबांच्या साक्षीने जागेवरच चौरंग्या केला होता. माहूर संस्थानची संस्थानिक रायबागन देशमुख जालन्याच्या लढाईत ज्यावेळी शिवरायांच्या समोर पराजित अवस्थेमध्ये आली, त्यावेळी त्यांनी तिला साडीचोळीचा आहेर करून थेट माहूर संंस्थानात रवाना केले होते. स्त्री म्हणजे आई, बहीण, लेक आणि भवानी याच रुपकामध्ये शिवरायांनी स्त्रीला पाहिले होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा किस्सा जगजाहीर. सर्वांग सुंदर असणारी यवनांच्या कन्या, शत्रूची सून जेव्हा शिवरायांसमोर आली, त्यावेळी काय उपमा दिली राजांनी याला इतिहास साक्षी आहे. शब्द कवीचे आहेत, पण भावना माझ्या राजाची आहे.
 
अशीच असती माता
आमुची सुंदर रूपवती
आम्हीही असेच जन्मलो
असतो वदले छत्रपती
 
सखोजी गायकवाड म्हणजे शिवरायांच्या घरातला माणूस! राणीसाहेब सकवारबाई यांचे बंधू परंतु दक्षिण दिग्विजय करून परत येत असतानाची घटना आहे. १६७८ असावं. मल्लाबाईने तक्रार-फिर्याद दिली होती की, ’सखोजी गायकवाड याने युद्ध जारी असताना आपल्या काही स्त्रीसैन्यास कैद केले होते. इतकेच नव्हे, तर कैदेत त्यांना रात्रभर मराठा छावणीत डांबून ठेवले. दुसर्या दिवशी सकाळी त्या सर्व स्त्रियांना थपडा मारून सोडून दिले !’ आपल्या मेहुण्याने असे लांच्छनास्पद कृत्य करावे. यामुळे राजे व्यथितही झाले होते आणि क्रोधितही झाले! शिवबांच्या सैन्यास सक्त ताकीद होती की, ’सैनिकांनी स्त्रियांना डांबून ठेवू नये वा कैदही करू नये. अशी गुस्ताखी करणार्या सैनिकाविरुद्ध सक्त सजा फर्मावली जाईल.’ आजच्या सरकारप्रमाणे शिवाजीराजांचे नियम कागदोपत्री नव्हते. त्याची कठोर अंमलबजावणी व्हायची. अपराधी कोणीही असो तथ्य आढळले तर जागेवरच सजा दिली जायची. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली होती ते सखोजी गायकवाड शिवाजीराजांच्या पत्नी सकवारबाईसाहेब यांचे बंधू होते. राजांचे सख्खे मेहुणे होते ते! शिवाजीराजांनी आपल्या मेहुण्यास हजर होण्यास फार्मावले आणि मल्लाबाई देसाई चकित झाली. तिला अश्रू आवरेनासे झाले. तिला विश्वास बसत नव्हता की, केवळ एका महिलेच्या तक्रारीवरून एक सार्वभौम राजा आपल्या सख्ख्या मेहुण्याला जेरबंद करण्याचे फर्मान सोडतो! हा राजा अद्वितीय आहे, परमन्यायी आहे, रयतेचा खरा ‘जाणता राजा’ आहे!
 
 
 
सखोजी गायकवाड शिवबांच्या पुढे हजर झाले. त्यांना मल्लाबाईंची तक्रार ऐकवण्यात आली. त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले. आपला मेहुणाच राजा आहे, तो दया दाखवेल असं त्यांना वाटले नाही. ते राजांना चांगले ओळखून होते. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शिवबांंनी मनात आणले असते तर तंबी देऊन, माफीनामा घेऊन त्याला सोडले असते. पण आजच्या पुढार्या सारखे किंवा सरकारसारखे ते नव्हते. ते शिवबा होते! शिवबांनी हुकूम दिला, “तापलेल्या सळईने मुजरीमाचे दोन्ही डोळे काढून टाकले जावेत. माझीया राज्यात मायभगिनीकडे वक्र नजरेने जो पाहील त्याची गय केली जाणार नाही, त्यासी सजा होणार म्हणजे होणार!” मल्लाबाई उर्फ सावित्रीबाई देसाईंची छेड काढली म्हणून सखोजीचे डोळे काढणारा महामानव! काय या राष्ट्राच्या तरुणांना शिवजयंतीपुरते शिवराय आठवावे. या देशाला शिवराय समजले का? तर नाही; शिवरायांचा इतिहास आम्हाला प्रामाणिकपणे शिकवला असता तर ७० वर्षांमध्ये या घटना घडल्याच नसत्या. खरंच शिवराय असते तर या सार्याय लिंगपिसाटी वृत्तीची जागीच खांडोळी केली असती. या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करताना महाराजांचा पुतळा नाही मिरवला तरी चालेल, पण महाराजांचे विचार मिरवता आले पाहिजे.
 

- रवींद्र पाटील
७५०७४९७३३२
@@AUTHORINFO_V1@@