पवारांचा आटापिटा कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |


agralekh_1  H x

 


एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या 'एनआयए' चौकशीवर शरद पवारांनी नुकताच तीव्र आक्षेप घेतला. असे का? 'एनआयए'च्या तपासातून जे काही निष्पन्न होईल त्याची भीती पवारांना वाटते का? पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या सगळ्यात गुंतलेली आहे का? आपले पितळ उघडे पडेल म्हणून तर पवारांचा हा सगळा आटापिटा तर नाही ना?


"एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमातील हिंसाचाराचा संबंध नाही," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात केले. पवारांनी यावेळी शहरी नक्षलवाद्यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस सरकार आणि पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुरुंगात असलेले लोक बाहेर यावेत म्हणून मी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट करत शरद पवारांनी यावेळी शिवप्रतिष्ठानच्या संभाजीराव भिडे यांनी कोरेगाव-भीमातील वातावरण बिघडवले, असा थेट आरोपही केला. एकूणच सत्तेच्या चाव्या हातात आल्याने शरद पवार हयातभर जे केले तेच उद्योग पुन्हा एकदा करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसते. जाती-जातीत भांडणे लावून द्वेषाच्या भिंती उभ्या करायच्या आणि त्या दुफळीच्या आगीत स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या शेकायचा उद्योग पवारांनी अर्धशतकभर केला. आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी दोन समाजात वितुष्ट आणि वाद कसा निर्माण होईल, यासाठी शरद पवार सातत्याने राबले. आताही पवारांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत एल्गार परिषद, कोरेगाव-भीमातील दंगल, शहरी नक्षलवाद्यांच्या अटका आणि हिंदुत्ववादी व्यक्तींच्या संदर्भाने जी काही विधाने केली, ती जातीयतेचा विखार पेरण्यासाठीच! केंद्र सरकारने एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमातील घडामोडींचा तपास 'एनआयए'कडे सोपविल्याच्या आणि राज्य सरकारनेही केंद्राला सहकार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बोलत होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री व नेत्यांची बैठकही झाली आणि त्या बैठकीत या मुद्द्यावर खल झाला. बैठकीनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार एल्गार परिषद व कोरेगाव-भीमाच्या चौकशीसाठी स्वतंत्र 'एसआयटी' स्थापन करणार असल्याचेही सांगितले. परंतु, शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरकारमध्ये सामील झाल्या झाल्या एल्गार परिषद आणि त्यानुषंगाने घडलेल्या घटनांबद्दलच सातत्याने वक्तव्ये का येत आहेत? शरद पवारांना सुधीर ढवळेसह तुरुंगातील शहरी नक्षलवाद्यांचा पुळका का येत आहे? आणि शरद पवार हिंदुत्ववादी व्यक्तींनाच या सगळ्या घटनाक्रमासाठी जबाबदार ठरविण्याचा प्रयत्न का करत आहेत?

 

गेल्यावर्षी राज्य विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार चालला होता. तेव्हा दीनदुबळ्यांचा, अडल्या-नडलेल्या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून शरद पवार गाव-खेड्यांत, बांधाबांधावर हिंडता-फिरताना दिसले. सत्ता येताच कर्ज, दुष्काळ आणि अतिवृष्टीने पिडलेल्यांची सगळीच दुःखे चुटकीसरशी सुटतील, असा विश्वासही पवार आपल्या दौऱ्यातून देत होते. त्यावेळी शरद पवारांनी एकदाही कोणत्याही प्रचारसभेत एल्गार परिषद, कोरेगाव-भीमातील हिंसाचार, शहरी नक्षलवाद वगैरे विषयांवर भाष्य केलेले नव्हते. मात्र, सत्तेवर येताच शेतकऱ्यांचा नेता असलेल्या शरद पवारांसकट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मंत्रीही शेतकरी-कष्टकऱ्यांना पार विसरले. पवार चिपळ्या हाती घेऊन केवळ एल्गार परिषद, कोरेगाव-भीमा आणि शहरी नक्षलवादावरच बोलू लागले. पवारांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ हा एकच एक विषय दिसू लागला. आता तर केंद्र सरकारने या सगळ्याच प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे दिल्यानंतर आणि पुणे सत्र न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर पवारांची तडफड अधिकच वाढल्याचे दिसते. शहरी नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी आपण पुढाकार घेतल्याचेही ते म्हणू लागले. असे का? 'एनआयए'च्या तपासातून जे काही निष्पन्न होईल, त्याची भीती शरद पवारांना वाटते का? शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या सगळ्यात गुंतलेली आहे का? आपले पितळ उघडे पडेल म्हणून तर शरद पवारांचा हा सगळा आटापिटा तर नाही ना? असे प्रश्नही निर्माण होतात. कारण, समाजकारण आणि जनविकासासाठी सत्तेत सामील झाल्याचे पवार नेहमीच म्हणतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांत पवारांचा पक्ष सहभागी असलेल्या राज्य सरकारने तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट शरद पवारांचा एल्गार परिषद व कोरेगाव-भीमातील हिंसाचारासारख्या प्रकरणातील उतावीळपणाच वारंवार समोर आला. पवारांच्या या एकूणच वक्तव्यांवरून त्यांचेच हात या प्रकरणाच्या दगडाखाली अडकल्याचेे कोणी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच 'एनआयए'च्या तपासातून लवकरात लवकर एल्गार परिषद आणि नंतरच्या घटनाक्रमातले गौडबंगाल बाहेर आले पाहिजे. जेणेकरून या सगळ्यात नेमके कोण गुंतलेले होते, ते सर्वांसमोर येईल.

 

शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत संभाजीराव भिडे यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात नेण्याचा प्रकार केला. हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी व्यक्तींबद्दलचा पवारांचा द्वेष लपून राहिलेला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणाऱ्यांत शरद पवारांचाही मोठा वाटा होता. आताही शहरी नक्षलवादप्रकरणी तुरुंगात असलेल्यांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी हिंदुत्ववाद्यांनाच गोवण्याचा विडा उचलल्याचे दिसते. मात्र, पत्रकार परिषदेत एखाद्या व्यक्तीवर बेछूट आरोप करणे निराळे आणि प्रत्यक्ष चौकशीवेळी संबंधितांचे नाव घेणे निराळे. तिथे खोटे बोलून चालत नसते तर खरी तीच माहिती द्यावी लागते आणि त्याचा अनुभव पवारांनाही आहेच. कारण, एल्गार परिषद व कोरेगाव-भिमातील हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर हजेरी लावावी लागली, तेव्हा पवारांनी कोणाचेही नाव घेतलेले नव्हते, तिथे ते मूग गिळूनच बसले होते. संभाजीराव भिडेंच्या सहभागाबद्दल पवारांकडे खरेच काही पुरावे आणि खात्रीशीर माहिती असेल तर त्यांनी ती चौकशी आयोगासमोर का दिली नव्हती? हा प्रश्न म्हणूनच विचारावासा वाटतो. पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यांतून दोन समाजात आगी लावण्याचे काम उरकता येते आणि त्यासाठीच पवार आयोगासमोर जे बोलायला कचरले ते इथे बोलल्याचे दिसते. तसेच 'एसआयटी'च्या माध्यमातून समांतर चौकशी करून हिंदुत्ववादी व्यक्तींना कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याप्रमाणे वर्षानुवर्षे गजाआड टाकण्याचाही पवारांचा डाव असेल. उल्लेखनीय म्हणजे, शरद पवारांच्या या हिंदुत्वविरोधी खेळीला शिवसेना पक्षप्रमुख आणि 'ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कतेर्र् आम्हीच एकमेव'च्या आरोळ्या ठोकणाऱ्या उद्धव ठाकरेंचीही संमती असणारच. कारण, गेल्याच आठवड्यात वरील दोन्ही प्रकरणांच्या 'एनआयए' तपासावर उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली होती. नंतर मात्र शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करत या कठपुतळ्याची कळ फिरवली आणि आता उद्धव ठाकरे 'एनआयए'कडे तपास दिलाच नाही, असे बोलू लागले. तेल लावलेल्या पैलवानाने उद्धव ठाकरेंची चांगलीच शाळा घेतल्याचे आणि सत्ता टिकवण्यासाठी वाघाची मांजर झाल्याचेच यावरून दिसते. अर्थात सत्तेचे लोणी मिळत असेल तर हिंदुत्वाची ऐशी की तैशी करत उद्धव ठाकरे शरद पवारच काय देणाऱ्या कोणाहीपुढे झुकणारच!

 
 
@@AUTHORINFO_V1@@