पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचे जबरदस्ती इस्लाम धर्मांतरण

    18-Feb-2020
Total Views |
mehek_1  H x W:





हिंदू मुलीला न्याय द्या; लंडनमध्ये आंदोलनकर्त्यांची मागणी



लंडन : जबरदस्ती धर्मांतर करायला लागलेल्या, अल्पवयीन हिंदू मुलगी मेहक कुमारीला न्याय मिळावा यासाठी लंडनमध्ये निदर्शने सुरू आहेत. सोमवारीही पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ते आणि लंडनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी पाकिस्तानी दूतावासाबाहेर पाकिस्तानी हिंदू मुलीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले. निषेधाच्या वेळी आंदोलक महक कुमारीला न्याय द्या असे पोस्टर घेऊन घोषणाबाजी करताना दिसले.


याआधी रविवारी लंडनमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारताबाहेरील भारतीयांनीही न्याय मिळावा म्हणून पाकिस्तानविरोधात निषेध नोंदविला. १५ जानेवारी रोजी, सिंध प्रांतातील जेकबाबाद येथे राहणाऱ्या मेहक कुमारी नामक अल्पवयीन मुलीचे अली रझा नावाच्या युवकाने अपहरण केले. ज्यानंतर आरोपी तरुणांनी मेहक कुमारीला इस्लाम धर्म स्वीकारायला लावून सक्तीने धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडले. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीने दोनदा लग्न केले आहे आणि त्याला ४ मुले देखील आहेत. ही घटनेच्या सुनावणी दरम्यान मेहकने आपली आपबिती सांगितली. तसेच आपल्या इस्लाम धर्म मान्य नसून आपल्याला कुठल्याही मुस्लीम तरुणासोबत राहायचे नाही, असे तिने न्यायालयाला सांगितले. याचबरोबर तिने आपल्याला आई-वडिलांसोबतच राहायचे आहे अशी विनंतीदेखील केली. मात्र तिच्या या वक्तव्यानंतर स्थानिक पाकिस्तानी मौलवींनी तिला ठार मारण्याचा फतवा काढला आहे. या विरोधात जगभरात निदर्शने सुरु असून, तिला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.