'अमेरिकेचे केजरीवाल' बर्नी सँडर्स?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020   
Total Views |


america_1  H x

 


बर्नी सँडर्स यांची तुलना अरविंद केजरीवालांशी करण्याचा मोह टाळायला हवा. जरी 'मोहल्ला क्लिनिक' आणि सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, लोकवर्गणीतून निवडणूक निधी गोळा करणे ही साम्यस्थळं असली तरी राजकारणात येऊन दहा वर्षं पूर्ण होण्याच्या आत अरविंद केजरीवालांनी अनेकदा रंग बदलले आहेत. तात्विक मुद्द्यांवर सोयीची भूमिका घेतली आहे. केजरीवाल रांगत होते, तेव्हापासून बर्नी सँडर्स राजकारणात आहेत.


अमेरिकेत दि. ८ नोव्हेंबर, २०२० रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरू लागले आहेत. ट्रम्प यांना आव्हान देऊ शकेल, असा उमेदवार शोधण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षातर्फे विविध राज्यांमध्ये पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून आयोवा आणि न्यू हॅम्पशायर या दोन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांतील बर्नी सँडर्स यांनी अन्य इच्छुकांवर आघाडी घेतली आहे. नेवाडामध्ये लवकरच निवडणुका होणार असून तिथेही सँडर्स विजयी होतील, असा कल आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये केवळ १२ टक्के डेमोक्रॅट्सनी सँडर्स यांना पसंती दिली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये हा आकडा २४ टक्क्यांवर गेला आहे. त्यांच्यापाठोपाठ इंडियाना राज्यातील साऊथ बेंड शहराचे माजी महापौर आणि केवळ ३८ वर्षांचे पीटर बुटिजिग असून राजकीय पंडितांच्या पसंतीचे एलिझाबेथ वॉरन आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडन स्पर्धेत मागे पडत आहेत. न्यूयॉर्कचे माजी महापौर आणि सुप्रसिद्ध उद्योजक मायकल ब्लूमबर्ग यांनी निवडणुकांत उडी घेतली आहे. ६४ अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या ब्लूमबर्ग यांनी आजवर प्रचारावर सुमारे ३४ कोटी डॉलर खर्च केले असून जे इतर उमेदवारांहून खूप अधिक आहेत. 'ट्रम्पना हटवा' हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. आयोवा आणि न्यू हॅम्पशायर ही छोटी राज्ये असून अजून ४८ राज्यांतील अंतर्गत निवडणुका बाकी आहेत. डेमोक्रेटिक पक्षाच्या मान्यवर सदस्यांचा (सुपर डेलिगेट्स) कौलही महत्त्वाचा असतो, हे जरी मान्य केले तरी बर्नी सँडर्स यांच्यापाठी डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य आणि मतदार एकवटताना दिसत आहेत. हा कल कायम राहिला तर ट्रम्प यांच्यापुढे सँडर्स यांचे आव्हान असेल. असे झाल्यास अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक ज्यू धर्मीय व्यक्ती अध्यक्षपदाची उमेदवार असेल. पण, ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे सर्वात कट्टर विरोधक हिंदूच असतात, त्याचप्रमाणे अमेरिकेत इस्रायल सरकारच्या ध्येयधोरणांवर सर्वात कडवट टीका करणारे लोक अनेकदा ज्यू धर्मीयच असतात. सँडर्सही त्यापैकीच एक. याउलट डोनाल्ड ट्रम्प इस्रायली सरकारचे आजच्या घडीचे सर्वात मोठे समर्थक म्हणून ओळखले जातात. दुसरे म्हणजे, गरिबांच्या बाजूने उभे राहणारे सँडर्स स्वतः मात्र अमेरिकेतील १ टक्के श्रीमंत लोकांपैकी आहेत.

 
 

रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक असे दोन मुख्य पक्ष असलेल्या अमेरिकेत अध्यक्षाला सलग दोन टर्म म्हणजे आठ वर्षं पदावर राहता येते. त्यामुळे अध्यक्षांनी दुसरी टर्म लढण्याचे ठरवल्यास त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून त्यांना आव्हान देण्याची परंपरा नाही. जानेवारी २०१७ मध्ये ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून डेमोक्रेटिक पक्षाच्या विविध नेत्यांनी आपण पुढची निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे घोषित करायला सुरुवात केली असली, तरी डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध लढण्यासाठी प्रतिस्पर्धी शोधण्याची प्रक्रिया डेमोक्रेटिक पक्षाकडून जून २०१९ मध्ये सुरू झाली. पक्षाचे नामांकन मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना महत्त्वाच्या माध्यमसमूहांकडून आयोजित वाद-चर्चांमध्ये अध्यक्ष म्हणून आपली ध्येयधोरणे स्पष्ट करायची असतात, त्याचप्रमाणे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून, लोकवर्गणी तसेच देणग्या उभ्या करून स्वतःची प्रचारयंत्रणा राबवायची असते. भारताप्रमाणे तिथे किती खर्च करायचा, याची मर्यादा नसते, तसेच सर्व खर्च अधिकृत असल्यामुळे काळ्या बाजारातून पैसे उभे करून खर्चाची समांतर यंत्रणा राबवणेही अवघड असते. अमेरिकेतही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर असला तरी त्याचे स्वरूप वेगळे असते. देणगीदार, उद्योजक तसेच विविध दबावगटांना दुखवेल, अशी भूमिका घेऊन पक्षाची उमेदवारी मिळवणे अवघड असते. बर्नी सँडर्सचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी आपली विचारधारा आणि तत्त्वांबाबत फारशा तडजोडी न करता सँडर्स यांनी सलग दोन वेळा डेमोक्रेटिक पक्षाच्या अंतर्गत निवडणुकींच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. डाव्या, उदारमतवादी डेमोक्रेटिक पक्षातही बर्नी सँडर्स बंडखोर ठरतात. बंड अशासाठी की, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि शिक्षणव्यवस्था सर्वांसाठी मोफत असावी, उद्योगांच्या व्यवस्थेत कामगारांना अधिक वाव असावा, तसेच अमेरिकेत किमान ताशी वेतन १५ डॉलर असावे इ. त्यांची मतं समाजवादाकडे झुकणारी आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला सँडर्स यांच्या उमेदवारीला ट्रम्पपेक्षा डेमोक्रेटिक पक्षातील भांडवलवादी आणि कॉर्पोरेट दबावगटांचा धोका आहे. 2016 सालीही अंतर्गत निवडणुकीत त्यांना पाडून हिलरी क्लिटंनना विजयी करण्याचे प्रयत्न झाले होते. त्यात डेमोक्रेटिक पक्षाचे पदाधिकारी गुंतले होते.

 
 

बर्नी सँडर्स यांची तुलना अरविंद केजरीवालांशी करण्याचा मोह टाळायला हवा. जरी 'मोहल्ला क्लिनिक' आणि सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, लोकवर्गणीतून निवडणूक निधी गोळा करणे ही साम्यस्थळं असली तरी राजकारणात येऊन दहा वर्षं पूर्ण होण्याच्या आत अरविंद केजरीवालांनी अनेकदा रंग बदलले आहेत. तात्विक मुद्द्यांवर सोयीची भूमिका घेतली आहे. केजरीवाल रांगत होते, तेव्हापासून बर्नी सँडर्स राजकारणात आहेत. अन्य राजकीय नेत्यांच्या तुलनेत त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका कायम ठेवली आहे. ७८ वर्षांच्या सँडर्सना डेमोक्रेटिक पक्षातील तरुणांचा तसेच उदारमतवादी वर्गाचा खूप मोठा पाठिंबा आहे, पण दुसरीकडे त्यांच्या समाजवादाकडे झुकणाऱ्या भूमिकेमुळे मध्यममार्गी मतदारांचा पाठिंबा त्यांना सहजासहजी मिळणार नाही. त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की, पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये मध्यममार्गी मतं तीन-चार उमेदवारांमध्ये विभागली जात असून तरुण आणि टोकाची डावी मतं सँडर्स यांना एकगठ्ठा मिळत असल्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी वाटते. पण, ती भासमान आहे. जशी ही स्पर्धा पुढे जाईल तसे दोन किंवा तीन उमेदवार स्पर्धेत उरतील आणि मग सँडर्स मागे पडतील. पण जर ते उमेदवार झाले तर ते ट्रम्प यांना हरवू शकणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या ध्येयधोरणांमुळे रिपब्लिकन पक्षातील मध्यममार्गी मतदारही दुखावला गेला आहे. डेमोक्रेटिक पक्षाने मध्यममार्गी उमेदवार दिल्यास त्याला डेमोक्रेटिक पक्षासोबतच नाखुष रिपब्लिकन मतंही मिळू शकतील. याउलट सँडर्स समर्थकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांनी आपल्या विखारी प्रचारामुळे जनमत ढवळून काढले आहे. त्यांना हरवण्यासाठी त्यांच्याच तंत्राने उत्तर द्यावे लागेल. बर्नी सँडर्स यांनी आपल्या भूमिकेत थोडा मवाळपणा आणण्याचे संकेत दिले आहेत. जर 'ट्रम्प विरुद्ध सँडर्स' अशी लढत झाली तर ती अतिशय रंजक ठरेल, कारण एका अर्थाने ती लोकशाही किंवा भांडवलशाहीच्या अस्तित्वाची लढाई असेल. मुख्य म्हणजे, हे दोघेही उमेदवार व्यवस्थेबाहेरचे असतील. चार वर्षं अध्यक्षपद भूषवूनही ट्रम्प रिपब्लिकन पक्षापेक्षा स्वतःच्याच ताळतंत्राने वागतात. मग ते चीनविरुद्ध व्यापार आणि तंत्रज्ञान युद्ध असो वा अमेरिकन सैनिकांच्या माघारीचे प्रयत्न. स्वतःच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना महत्त्वाच्या पदांवर बसवणे असो किंवा विरोधी पक्षाचे नेते आणि पत्रकारांवर ट्विटरद्वारे वैयक्तिक टीका करणे, ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची प्रतिमा आणि गरिमा पार मोडीत काढली आहे. सँडर्स जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर त्यांची कारकीर्दही ट्रम्प यांच्याइतकीच वादळी असेल. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे अमेरिकन भांडवली बाजारात भूकंप होईल. भारताने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवून तेथे इंटरनेट आणि दूरसंचार सेवांवर निर्बंध आणल्यावर सँडर्स यांनी भारतावरही सडकून टीका केली होती. पर्यावरण, संरक्षण, मानवाधिकार ते राजकीय धोरणं याबाबतीत सँडर्स आणि भारत सरकारचे विचार जुळणे अवघड आहे. त्यामुळे सँडर्स यांना डेमोक्रेटिक पक्षाचे नामांकन मिळू नये आणि मिळाले तर ते ट्रम्पविरुद्ध जिंकू नये, अशीच भारताची अपेक्षा असेल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@