यूपीएससीचा अभ्यास करायचा की आंदोलन?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2020
Total Views |
sarathi_1  H x





सारथीच्या वादामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली; विद्यार्थ्यांचे जंतरमंतरवर आंदोलन


नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा – कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेसंबंधी सुरू असलेल्या घोळाचा फटका देशाच्या राजधानीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थ्यांना विद्यावेतन न मिळाल्याने विद्यार्थी हवालदील झाले असून अखेर अभ्यास सोडून त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन करावे लागत आहे. राजकीय वादामुळे आमचे नुकसान का करता, असा सवाल विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात विद्यावेतन देतो, असे आश्वासन राज्याचे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (ओबीसी) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे दिले आहे. आमदार विनायक मेटे यांनी त्याकामी पुढाकार घेतला.

राज्यातील मराठा – कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजित विकासासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने सारथी संस्थेची स्थापना केली होती. सारथी यूपीएससी कोचिंग प्रोग्राम २०१९-२० अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा (यूपीएससी) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे पुढील अभ्यासाठी दरमहा १३ हजार रूपयांचे विद्यावेतन देण्यात येत होते. प्रवेशप्रक्रियेद्वारे २२५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ते दिल्ली येथे यूपीएससीचा अभ्यास करीत आहेत. यामध्ये ८५ विद्यार्थींनींचा समावेश आहे.

मात्र, सारथी संस्थेसंबंधी सध्या सुरू असलेल्या वादाचा फटका आता विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे जानेवारी महिन्याचे विद्यावेतन ३१ जानेवारी अथवा १ फेब्रुवारी रोजी येणे अपेक्षित होते, मात्र ते अद्यापपर्यंत मिळालेले नाही. यामुळे दरमहा मिळणाऱ्या १३ हजार रूपयांच्या विद्यावेतनामध्ये विद्यार्थी आपला दिल्लीत राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागवित होते. मात्र, आता पैसेच मिळाले नसल्याने घरभाडे आणि खानावळ यांचे पैसे देणे विद्यार्थ्यांना शक्य झालेले नाही, परिणामी विद्यार्थ्यांच्या मागे त्यांचा तगादा लागला आहे. काही विद्यार्थ्यांना खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे, तर काहींना खानावळीमध्ये जेवण देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दिल्लीसारख्या शहरात या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, दोन दिवसात विद्यावेतन मिळाले नाही, तर दिल्ली सोडून महाराष्ट्रात येण्याशिवाय अन्य पर्याय विद्यार्थ्यांपुढे नाही.

अशा आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या :
 
  • जानेवारी महिन्याचे विद्यावेतन दोन दिवसात जमा करावे
  • दर महिन्याच्या २ तारखेपर्यंत विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची हमी द्यावी
  • मुळ योजनेनुसार १५.५ महीने विद्यावेतन मिळेल, याची हमी द्यावी
  • यूपीएससी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांना एकरकमी २५ हजार द्यावे
  • वारंवार भाडेकरार व अन्य कागदपत्रे देण्याची सक्ती करू नये
  • सारथीच्या स्वायत्तेविषयी खुलासा करावा




sarathi 1_1  H

राज्य सरकारला सामाजिक भान नाही : आमदार विनायक मेटे

एका चांगला उपक्रम व्यवस्थित सुरू असताना जाणीवपूर्वक सुरू केलेल्या वादाचा फटका आमच्या विद्यार्थी – विद्यार्थींनींना बसला आहे. सर्वांत वाईट बाब म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री या कोणालाच याचे गांभीर्य नाही. आपले घर सोजून दिल्लीसारख्या शहरात विद्यार्थी अभ्यासासाठी आले आहेत, मात्र आता अभ्यास सोडून आता त्यांना आंदोलन करावे लागत आहे. सामाजिक भान नसलेल्या सरकारने विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणले आहे, असे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आणि आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.

दोन दिवसात प्रश्न सोडवू : विजय वडेट्टीवार

विनायक मेटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना धीर दिला आणि राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. आज सारथीकडे पैसे वर्ग करून विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसात विद्यावेतन देऊ, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्य़ांना दिले. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या २ तारखेपर्यंत विद्यावेतन मिळेल, अशी हमी त्यांनी दिली. त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसात दिल्ली कामानिमित्त येणार असून विद्यार्थ्यांची भेट घेऊ, असेही आश्वासन विद्यार्थ्यांना त्यांनी दिले आहे.

यामागे षडयंत्र आहे का ? : खासदार संभाजीराजे छत्रपती

सारथी संस्थेच्या वादासंबंधी मी गेल्या महिन्यातच पुणे येथे आंदोलन केले होते, त्यावेळी आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. सारथीसंबंधी जी काय चौकशी करायची ती करा, मात्र त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आंदोलन करायचे, संतापजनक बाब म्हणजे विद्यार्थ्यांकडून वारंवार रेंट एग्रीमेंट आणि अन्य कागदपत्रे देण्याचा तगादा लावला जात आहे. विद्यार्थ्यांना असा त्रास देण्यामागे कोणते षडयंत्र आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

तर दिल्ली सोडावी लागेल...

यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या भिगवण येथून आलेल्या भुषण जाधव या विद्यार्थ्याने सांगितले की, विद्यावेतन न मिळाल्याने आम्हाला फार त्रास होत आहे. खानावळ, खोलीचे भाडे थकले असल्याने त्यांचा तगादा आमच्या मागे लागला आहे. अनेकांना तर खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासाऐवजी दिल्लीत रहायचे कसे, हीच काळजी आम्हाला लागली आहे. येत्या दोन दिवसात विद्यावेतन न मिळाल्यास दिल्ली सोडण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही.
@@AUTHORINFO_V1@@