बचके रहना रे बाबा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2020
Total Views |


manovata_1  H x


कधीकधी तुमचं बुडतं जहाज तुम्ही सावरता. तुम्ही असे सहजासहजी बुडणाऱ्यांपैकी नसता. म्हणजे असं की, तुम्ही स्वतःला सावरता. म्हणून वरच्या कथनात सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्यांना अगदी पार करून जरी गेला नाहीत, तरी तुम्ही बुडाला कसे नाहीत याचं दुःख किंबहुना अपरंपार दुःख काही व्यक्तींना होतं.


लोक आपला हेवा का करतात, याची अनेकविध कारणं आहेत. यातील अनेक कारणं त्यांच्याशी निगडित असतात, काही कारणं आपल्याशी निगडित असतात, तर बरीच कारणं त्यावेळच्या परिस्थितीनुसार संबंधित असतात. प्रामाणिकपणे वेळोवेळी या कारणांचा परामर्श घ्यावा लागतो. बऱ्याचवेळा एखाद्याला सहज ओलांडून आपण पुढे निघून जातो. तेव्हा ती माणसं आपला तिरस्कार करतात. अशा प्रकारचा मनापासून केलेला तिरस्कार आपण प्रेमभंगानंतर पाहतो. तुम्ही या व्यक्तीवर एकेकाळी प्रेम करत होता, पण या व्यक्तीने त्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही वा काही काळानंतर प्रेमाच्या राज्यातून त्या व्यक्तीने तुम्हाला हद्दपार केले, तर अशा प्रकारचा तिरस्कार काही जणांच्या मनात येऊ शकतो. अर्थात, त्या व्यक्तीने तुम्हाला ती 'रोमॅण्टिक' प्रीती नाही दिली, पण तुमचे मैत्र स्वीकारले, तर तुम्ही शांत होता किंवा मग समजा, त्या व्यक्तीने क्रूरपणे तुमचा छळ केला, तर अशा व्यक्तीच्या नादाला न लागता तुम्ही स्वतःलासावरता. या दुखण्यावर मात करता, पण मनोरंजक गोम पुढे आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला नाकारल्यानंतर तुम्ही तुमच्यात बदल घडवता व एक आकर्षक व्यक्तिमत्त्वात तुमचं परिवर्तन होतं. आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हटलं की, कर्तृत्वसुद्धा आलंच. अशावेळी त्यांनी तुम्हाला झिडकारलं, त्यांना मात्र आता तुमची ओढ लागते. आता त्यांना तुमची प्रशंसा करायची असते. तुमच्याकडे ध्यान द्यायचे असते.

 

आता थोडक्यात सांगायचे म्हणजे, त्यांना तुमचं आकर्षण वाटायला लागते. पुन्हा प्रेमाच्या गावातच अशा उलट दिशेने वळलेल्या गोष्टी जास्त प्रमाणात दिसतात. गाढ मैत्रीतही दिसतात. 'काल अव्हेरले, पण आज स्वीकारले' असा काहीसा प्रकार घडतो. पण, आता तुमचीही दिशा बदललेली असते. तुम्हाला आपण कधीकाळी झिडकारलो गेलो होतो, हे मनातून विसरता येत नाही. त्यात भर पडते ती नव्याने लाभलेल्या वा कमावलेल्या क्षमतेची! तुम्हाला व्यवस्थित माहीत असतं की, आता तुम्ही वरच्या दर्जाच्या लोकांना प्रभावित करू शकता. तुमचा सामाजिक दर्जा उंचावलेला असतो. त्यामुळे आता तुमचा स्वाभिमान जागृत झालेला असतो. आता स्वतःची उंची तुम्हाला कळलेली असते. त्यामुळे दुसऱ्यांकडून 'स्वीकारण्याच्या' टेकूची तुम्हाला गरज वाटत नाही. आता परिस्थिती एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवावर पोहोचली आहे. आता तुम्हाला त्या झिडकारणाऱ्या लोकांपाशी जायची इच्छा उरत नाही. त्यांच्याबाबतीत असे होते की, त्यांना त्यांच्या उंचीचे कुणीतरी मिळायला हवे होते, जे त्यांना आता मिळत नाही. त्यांचा अभिमान दुखावतो. त्यांचा तुमच्या बाबतचा तिरस्कार आता अघोरी होतो. आता तुम्हाला प्राप्त करायची त्यांची संधी हुकल्यामुळे 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' अशी त्यांची वृत्ती होते. मग ते काय करता? तुम्ही कसे निरुपयोगी, कुचकामी आहात, हे सिद्ध करायचे अफाट प्रयत्न करतात. त्यासाठी ते तुम्हाला त्रासदायक ठरतील. अशा अनेक गोष्टींचे प्रयोजन करतात. शेवटी येनकेन प्रकारेण त्यांना प्रमाण द्यायचे असते की, तुम्हीच निरर्थक आहात म्हणून तुम्ही त्यांना आता नाकारत आहात. त्यांना तुम्ही त्यांचे नावडते कसे आहात, हे सिद्ध करायचे असते. कारण, त्यांचा अभिमान त्यांना गोंजारायचा असतो. ही अशी सर्वसामान्य कहाणी प्रेमाच्या गावात घडतेच. पण, सर्वसामान्यपणे इतरही कथनात असेच घडते. खेळ खरा तर दुखऱ्या 'इगो'ला फुंकर मारण्यासाठी असतो.

 

कधीकधी तुमचं बुडतं जहाज तुम्ही सावरता. तुम्ही असे सहजासहजी बुडणाऱ्यांपैकी नसता. म्हणजे असं की, तुम्ही स्वतःला सावरता. म्हणून वरच्या कथनात सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्यांना अगदी पार करून जरी गेला नाहीत, तरी तुम्ही बुडाला कसे नाहीत याचं दुःख किंबहुना अपरंपार दुःख काही व्यक्तींना होतं. या व्यक्ती खरंच नतद्रष्ट आणि विखारी असतात. 'सुख म्हणजे काय?' असं या व्यक्तींना विचारलं तर दुसऱ्याच्या दुःखातच त्यांना सुख मिळतं. अशाही व्यक्ती अवतीभवती असतात. तुकाराम महाराजांनी व संत ज्ञानेश्वरांनी अशा व्यक्तींना पाहिले आहे, अनुभवले आहे. अशा व्यक्ती दुसऱ्या सुस्थित व्यक्तींचा दुस्वास करतात. कारण, त्याशिवाय त्यांना आनंदाचा दुसरा पर्याय नसतो. या व्यक्तींपासून आपल्या आयुष्यात विष भिनणार नाही, याची काळजी ज्याची त्याने घ्यायला लागते. त्यासाठी थोडा धीर आपल्याकडे असावा लागतो व आपल्या कर्माकडे आपली वचनबद्धता असायला लागते. मग कोण कुठला माईका लाल आपले स्खलन करण्याचे धाडस करील?

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@