पुन्हा एकदा 'गुलाबोत्सव'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2020
Total Views |


test team india_1 &n

 


सलग पाच सामने जिंकत न्यूझीलंडला 'व्हाईटवॉश' देणारा भारतीय क्रिकेट संघ आता पुन्हा एकदा कसोटी मालिकेसाठी कसून सराव करत आहे. भारतीय संघ या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यानंतर भारत स्वगृही परतणार असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यात सलग पाच टी-२० सामने जिंकत भारताने इतिहास घडवला. मात्र, एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने सलग तीन सामन्यांत पराभव करत 'व्हाईटवॉश'ची परतफेड केली. त्यामुळे कसोटी मालिकेत कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय क्रिकेट विश्वात कसोटी मालिकांचा हा काळ असला, तरी सध्या चाहत्यांना कुतूहल आहे ते म्हणजे 'गुलाबोत्सवा'चे. कारण, भारतीय संघ या वर्षात पुन्हा एकदा गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील (डे अ‍ॅण्ड नाईट) कसोटी खेळणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यानेच दिले आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून यात ४ कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. यापैकी पर्थ येथे होणारा कसोटी सामना हा गुलाबी चेंडूने आणि प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने याबाबत तयारी दर्शविल्यानंतर गांगुली यांनी याबाबत सूतोवाच केले. गेल्या वर्षी कोलकात्यातील 'ईडन गार्डन'च्या मैदानावर भारताने पहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळला होता. त्यात विजय मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने घरगुती धर्तीवर काय पर्थमध्ये जरी प्रकाशझोतातील सामना खेळावा लागला तरी आपली तयारी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळण्याबाबत रीतसर प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा 'गुलाबोत्सवा'चा आनंद अनुभवता येणार आहे. परदेशी धर्तीवर होणाऱ्या या गुलाबी चेंडूच्या कसोटीत नेमका कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

खरंच आनंददायी बाब?

 

२०१९ च्या विश्वचषकामधील उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी जवळपास आठ ते नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय त्याने घेतला असून यासाठी सराव सुरू केल्याची एक चित्रफीतही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्यानंतर ही आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी दिली. मात्र, ही खरंच आनंददायी बाब आहे का, असा प्रश्न क्रिकेट समीक्षकांनी उपस्थित केला आहे. आयपीएलमधील 'चेन्नई सुपर किंग्ज' या संघाचे तो नेतृत्व करणार असून यष्टीरक्षकाचीही जबाबदारी तो सांभाळणार आहे. एकूणच काय म्हणजे, धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या अवतारात सर्वांना पाहायला मिळणार आहे. महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधील सामने पुन्हा खेळणार, हे सर्वश्रुत होतेच. मात्र, तो भारतीय संघात पुनरागमन करणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, याकडे समीक्षक लक्ष वेधतात. विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्रसिंह धोनी जवळपास आठ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर आहे. धोनीच्या अनुपस्थितीत अनेक यष्टीरक्षकांना भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र, या संधीचे सोने करण्यात ते अपयशी ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, धोनीसारखी चमकदार कामगिरी अद्याप एकाही यष्टीरक्षकाला करता आलेली नाही. लोकेश राहुलचा अपवाद वगळल्यास इतर सर्व खेळाडूंची कामगिरी निराशाजनकच आहे. राहुलच्या रूपात भारताकडे यष्टीरक्षकासाठी पर्याय उपलब्ध असला तरी धोनीसारखी चमकदार कामगिरी तो आगामी काळात करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धोनीचे मैदानावरील कौशल्य सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा हातचलाखीने धावचीत करत धोनीने बड्या फलंदाजांना माघारी धाडण्यात यश मिळवले आहे. सामने जिंकण्यासाठी संघात नेमके कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे, याबाबत निर्णय घेण्यात धोनी माहीर असून यामुळेच त्याला क्रिकेट विश्वात 'माही' म्हणून ओळखले जायचे. म्हणून धोनीचे भारतीय संघातील पुनरागमन फार महत्त्वाचे आहे.

 
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@