हिम्मत असेल तर जनादेशाला पुन्हा सामोरे जाऊन दाखवा : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2020
Total Views |

devenddra fadnavis_1 



नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात


नवी मुंबई :
हिंमत असेल तर, आमचे सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिले आहे. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असे फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलत होते.


विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात येत असतानाच, उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले होते. 'आमचे सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवा', अशा शब्दांत त्यांनी भाजपला खुले आव्हान दिले होते. त्यावर फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रतिआव्हान दिले आहे. तुम्ही तिघे एकत्र आहात ना ? जनता आजही कुणाच्या बाजूने आहे हे तुम्हाला कळेल,असेही ते म्हणाले.


चंद्रकांतदादा पाटील पक्षाचे कॅप्टन

भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन. विधानसभेचा सामना जिंकणाऱ्या संघाचे ते कर्णधार कालही होते आणि आजही तुम्ही विजयी संघाचे कर्णधार आहात.सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच होऊ शकते. 'वारसा'मध्ये आपल्याकडे कुणाला काही मिळत नाही. पक्ष हे आपले परिवर्तनाचे माध्यम आहे आणि सच्चा कार्यकर्ता ही आपली ताकद आहे. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले.



जम्मू काश्मीरमध्ये नवी पहाट झाली आहे

कलम ३७० हटवल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताचा तिरंगा डौलाने फडकताना पाहणारे आपण भाग्यशाली कार्यकर्ते आहोत. हे कलम हटवल्यानंतर इथे रक्ताचे पाट वाहतील असे कोणीतरी म्हंटले होते. मात्र, कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे. इथे रक्ताचे पाट नाही नवी पहाट झाली आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले. प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण होताना पाहणारे आपण भाग्यशाली ठरणार आहोत.प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येला जाऊन दर्शन जरूर घ्या, तेथे कदाचित दर्शनमात्राने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्हाला स्मरण होईल, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी टोला लगावला.
@@AUTHORINFO_V1@@