लोकमान्य टिळक : पडद्यामागचे विवेकी क्रांतिकारक!

    15-Feb-2020
Total Views |
tilak_1  H x W:



लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात गुप्त क्रांतिकारक कार्यरत होते. गावोगावी त्यांची मंडळे होती. सावरकर कुटुंब या चळवळीचे अग्रणी! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ संस्थेशी टिळकांचा जवळचा संबंध होता, पण पडद्यामागून! टिळक विचाराने झपाटलेल्या सावरकरांनी महाराष्ट्रात क्रांतीची गुप्त केंद्रे स्थापिली. बहुत लोक एकत्र केले. सावरकरांचे विचार हे टिळक विचारांची पुढची आवृत्ती आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक क्रांतिकारकांचा आणि त्यातही सावरकरांच्या विचारांचा पाया हा ‘टिळक स्कूल ऑफ थॉट्स’मधूनच पक्का झालेला आहे.

आपल्या तरुण वयात टिळक हे स्वतः वासुदेव बळवंत फडकेंच्या तालमीत जात असत, असे काही उल्लेख सापडतात. याबद्दल विष्णुशास्त्री आणि आगरकरांबरोबर त्यांची चर्चा झाली असावी. परंतु, त्या काळात आपण थेट क्रांतिकार्य हाती घेऊ शकू, याबद्दल टिळक जरा साशंक होते असेच दिसते. पुढे मात्र आपल्या जहाल राजकीय भूमिकांच्या बरोबरीने गुप्तपणे क्रांतिकारक चळवळ देशात जीवंत राहणे अत्यावश्यक आहे, हे टिळकांच्या ध्यानी आले. तद्नुसार त्यांचे अखेरपर्यंत गुप्त क्रांतिकारकांशी जवळचे संबंध होते.


चापेकर प्रकरणाबद्दल जरा वेगळी माहिती सापडते. इतिहास वाचला तर लक्षात येते की, चापेकरांनी टिळकांबद्दल आणि टिळकांनी चापेकरांबद्दल बोलताना, लिहिताना फारसे चांगले शब्द वापरलेले नाहीत. उलट टीकाच केली आहे. मग तरीही चापेकर हे रॅण्डचा खून करणार आहेत हे टिळकांना माहीत होते का? टिळकांनी चापेकरांना प्रोत्साहन दिले ते कसे? त्याचे उत्तर शोधण्यासाठी इतर क्रांतिकारकांच्या पत्रांचा शोध घ्यावा लागतो. टिळकांनी स्वतः १० जानेवारी, १८९६ रोजी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांना लिहिलेले एक पत्र सापडते. श्यामजी तेव्हा उदयपूर संस्थानात ‘दिवाण’ म्हणूण काम बघत होते. ‘दोन ब्राह्मण तरुणांना लष्करी शिक्षण घेण्याकरिता पाठवत आहोत, त्यांची शिफारस करत आहोत,’ असा उल्लेख त्या पत्रात सापडतो. कदाचित हे दोन तरुण म्हणजे चापेकर बंधू असावेत. चापेकरांनी रॅण्डचा खून केल्यानंतर लगेचच काही दिवसांत श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदुस्थान सोडून निघून जाणे हा नक्कीच योगायोग नाही, हे सुज्ञांस समजेल.


टिळकांचे शिष्य वीर वामनराव जोशी यांनी लिहिलेल्या पत्रात याबद्दल सविस्तर लिहिले आहे. ते म्हणतात, “चापेकर हा हैदराबाद संस्थानातील देशपांड्यांच्या येथे आश्रयास होता. तो देशपांडे टिळकांचा मित्र होता व टिळकांच्या संदेशावरूनच त्याने चापेकरास ठेवले होते. ही माहिती मला माझ्या धाकट्या भावाकडून मिळाली होती. माझा धाकटा भाऊ रघुनाथ हा हैदराबाद येथे मेडिकल कॉलेजात शिकत असता सदर देशपांडे यांचा परिचय होऊन मित्रत्व जमले होते व माझा भाऊ त्यांच्या गावीही जाऊन आला होता. त्या देशपांड्यांकडूनच ही माहिती माझ्या भावास मिळाली होती...”


चापेकरांची ही योजना टिळकांना माहीत होती, याची खात्री दामुअण्णा भिडे यांच्या आत्मचरित्रातून पटते. त्यात दामूअण्णांनी लोकमान्यांची आज्ञा घेतली हे वाक्य येते ते याच संदर्भात.


त्यामुळे रॅण्डचा खून केल्यानंतर खंडेराव साठे यांच्यामार्फत टिळकांना ती बातमी लगोलग समजली आणि ‘गणेशखिंडीतला गणपती पावला’ असे साठ्यांनी टिळकांना सांगितले. त्यावर ‘आता नीट हुशारीने वागा,’ असे टिळक म्हणाले. ही जी कथा सांगितली जाते ती खरी आहे, असे म्हणण्याला वाव आहे.


टिळक-चापेकर संबंधात चापेकरांनी कारागृहात लिहिलेले आत्मचरित्र महत्त्वाचे आहे. त्यात चापेकरांनी टिळकांबद्दल वाकडेपणाने लिहिले असले तरी ते त्यांचे कारागृहातले लेखन आहे, हे विसरून चालणार नाही. त्याच्या सत्यतेबद्दल शंका आहेत, असे काही जाणकारांचे मत. त्यांच्या आत्मचरित्रात खर्‍या-खोट्याची बरीच सरमिसळ झाली हे म्हणणे काही अंशी ग्राह्य धरायला हरकत नाही. खरंतर टिळकांनीसुद्धा ‘केसरी’त चापेकरांबद्दल मुद्दाम वाकडेपणानेच लिहिले आहे. टिळकांनीसुद्धा चापेकरांचा उल्लेख ‘माथेफिरू वेडे पोर’ असाच उल्लेख केलाय. तरीही चापेकरांना फाशी झाल्यानंतर टिळक त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पोहोचवत असेही उल्लेख सापडतात. त्यामुळे जाहीरपणे लिहिता-बोलताना दोघांनी एकमेकांबद्दल मोठ्या खुबीने आणि मोठ्या हुशारीने लिहिले आहे, याची साक्ष त्यावरून पटते. देश स्वतंत्र होईपर्यंत ही माहिती समोर आली नाही. आजही फार थोड्या लोकांना याबद्दल माहिती आहे. यातही पुन्हा गंमत अशी की, ब्रिटिश लोक सातत्याने चापेकर-टिळक संबंधाबद्दल विचारत, शोध घेत, मात्र याचा अजिबात सुगावा लागू नये, ‘आम्ही एकमेकांना ओळखत नाही’ हे सिद्ध होण्यासाठी त्या काळात चापेकरांनीसुद्धा चकार शब्द काढला नाही. जे लिहिले ते वेडेवाकडेचं आणि टिळकांनी तर ‘चिरोल’च्या पुस्तकावर आणि ‘टाईम्स’सारख्या वृत्तपत्रावर अब्रुनुकसानीच्या फिर्यादी भरल्या!


टिळकांनी जरी राजकारणाचा भाग म्हणून चापेकरांना ‘माथेफिरू वेडे पोर’ म्हटले तरी नाशिक येथील विनायकराव सावरकरांना ते अजिबात आवडले नव्हते. पेटत्या वयातले सावरकर हे वाचून कमालीचे पेटले होते. दरम्यानच्या काळात चापेकरांच्या खटल्याच्या सुनावणीपूर्वी पुण्याहून या कटाशी संबंध असलेले, याबद्दल माहिती असलेले दोन तरुण नाशिक येथे सावरकरांच्या घरी आले. हे तरुण म्हणजे सदाशिव लवटे आणि वामन आगरकर असले पाहिजेत, त्यांच्याचकडून सावरकरांना ही घटना आणि यामागे टिळकांचा कसा समावेश होता हे समजले असेल, अशी दाट शक्यता आहे.


सावरकर आणि टिळक

महाराष्ट्रातले बहुतांशी सगळेच क्रांतिकारक टिळक विचारांच्या शाळेत पारखून निघत होते. ‘टिळक स्कूल ऑफ थॉट्स’मधून घडलेले हे सगळे क्रांतिकारक होते. चापेकरांचे बलिदान आणि दरम्यानच्या काळात टिळकांना भोगावा लागलेला तुरुंगवास यातून प्रेरणा घेऊन अनेक गुप्त क्रांतिकारक फौजा महाराष्ट्रात तयार झाल्या. सावरकर तर उघड उघड सांगत, “चापेकरांच्या फाशीतून आमचा जन्म झाला!” टिळकांच्या या तुरुंगवासामुळे ठिकठिकाणी टिळक भक्तांचे निरनिराळे गट तयार झाले. वक्तृत्त्व स्पर्धा, मेळे, विविध कसरतींचे खेळ सळसळत्या रक्ताच्या टिळकांच्या विचाराने भारलेल्या तरुणांना या गुप्त संघटनांमध्ये ओढण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव ही फार हुकमी माध्यमे होती.


१९०५ साली दसर्‍याच्या दिवशी विनायकराव सावरकरांनी केलेल्या विदेशी कपड्यांच्या होळीला टिळक स्वतः उपस्थित होते. तेव्हा सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकले होते आणि ‘केसरी’तून टिळकांनी टीकेची झोड उठवली होती. शिष्यवृत्तीसाठी टिळकांनीच सावरकरांची शिफारस केली होती, जशी त्यांनी काही वर्षांपूर्वी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे चापेकरांची केली होती अगदी तशीच!


सावरकरांनी टिळकांना जवळून पाहिले होते, अनुभवले होते. लोकांकडून हवे ते कार्य कसे करून घ्यायचे, हे टिळक नेमकेपणाने जाणत होते. ‘क्रिया करून करवावी बहुतांकरवी’ या समर्थवचनाने टिळक वागले. सावरकर लिहितात, “टिळकांची राजकीय प्रगट भाषा जरी या मागील पिढीचीच होती, तरी टिळकांचा राजकीय अंतरात्मा शिवाजीच्या वंशातला पडला. ते इंग्रजांशी मनातून केव्हाही ‘राजनिष्ठ’ नव्हते. ते इंग्रजांच्या राजास मनातून केव्हाही ना विष्णू, पृथ्वीपति समजत नव्हते. इंग्रजी राज्यापासून अनेक लाभ झाले. परंतु, त्याहून प्राणघातक तोटेच अधिक झाले, असे तर ते उघडच उपदेशीत. या ह्यूमप्रभृती राष्ट्रसभावाल्या इंग्रजांस ते हिंदुस्थानचे हितचिंतक समजत खरे आणि इंग्रज लोक आपली वचने आणि आपल्या घोषणा पाळतील, असे त्यास थोडेसे वाटेही. प्रथमतः तरी नेहमीच तसे जोरजोराने लिहीत, म्हणत हेही खरे. पण म्हणून इंग्रजांचे राज्य केव्हाही मनातून आवडत होते असे मुळीच नाही. त्या दिवशी जरी एखाद्या शिवाजीस अभिषेक होता तरी टिळक साखर वाटते. कोर्टातून मरेतो टिळक प्रतिज्ञेवर सांगत, मी बादशाहाचा एक राजनिष्ठ प्रजाजन आहे! पण टिळक आतून सदैव राजद्रोहीच होते आणि यातच त्यांचे टिळकपण होते!” सावरकरांनी आणखी एके ठिकाणी फार मार्मिकपणे आणि नेमक्या शब्दांत लिहिले आहे. ते म्हणतात, “लोकमान्य खड्गाची मूठ होते. आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ हे जरी पाते होऊ शकत नाही, तरी पाते हे मुठीच्या आधारे रणकंदनी लवलवते. पाते हे मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते.”


विनायकराव सावरकरांनी लिहिलेले ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ प्रकाशित करताना बाबा म्हणजेच गणेश सावरकरांनी टिळकांकडे ६०० रुपयांची आर्थिक मदत मागितली होती, तशी मागणी करणारे एक पत्र उपलब्ध आहे. पुढे ते पुस्तक इकडे प्रकाशित झाले नाही ती गोष्ट वेगळी! मात्र, टिळक त्यांना किती हक्काचे आणि जवळचे वाटत होते, याची साक्ष देणारे ते पत्र आहे.



टिळकभक्त क्रांतिकारकांची गुप्त मंडळे!

टिळकांना मानणारी, त्यांच्या सल्ल्याने आणि विचाराने भारलेली तरुण मंडळी गावोवावी होती. अशांनी स्थापन केलेली क्रांतिकारक मंडळे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावात होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. बीड आणि कोल्हापुरात टिळकांचे क्रांतिकारकांशी संबंध होते हे आढळून येते. शाहू महाराजांचा त्याला बराच पाठिंबा होता, असे दिसते. विठ्ठलकाका भिडे यांच्यामार्फत शाहू छत्रपतींनी टिळकांशी संबंध जोडला होता. रा. ग. भिडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, “दामू जोशी व इतर लोक दरोडे घालत. याला शाहू महाराजांची मूक संमती होती. स्वतः शाहू महाराजांनी चुपचाप पाच-सात हप्त्यात काही बंदुका टिळकांच्या सूचनेप्रमाणे पाठवल्या होत्या. तसेच काही पैसेही पाठवले होते. विठ्ठलकाका मध्ये तीन-चार वेळा टिळकांकडे पैसे घेऊन गेले होते.” (शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांचे परस्पर संबंध पान क्र. ९-११ ) नंतर पुढच्या काळात टिळकांचे आणि शाहू महाराजांचे बिनसल्यानंतर शाहू महाराजांना या क्रांतिकारकांना पकडणे भाग पडले असावे.


वर्ध्याला पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या पुढाकाराने ‘आर्यबांधव समाज’ ही गुप्त संस्था काढली.नागपुरात हीच संस्था ‘समर्थ शिवाजी समाज’ या नावे कार्य करत असे. १९०५ साली ‘आर्यबांधव समाजा’च्या तरुणांनी घेतलेल्या निर्णयावरून हनुमंत नायडू यांना जपानला पाठवले होते. स्फोटक पदार्थांविषयी अधिक माहिती मिळवावी यासाठी टिळकांच्या सल्ल्याने त्यांनी परदेशगमन केले असल्याचे सांगतात. वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती येथे दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे स्नेही. त्यांच्याही पुढाकाराने ही संस्था हलत असे. स्वामी आनंदानंद नावे एक सोळा- सतरा वर्षांचा तरुण ‘हिंद स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक चालवत असे. त्याची आणि टिळकांची भेटही झाली होती. बाबा सावरकरांनी त्याला लिहिलेले एक पत्रही सापडते. वीर वामनराव जोशी आणि इतर टिळक भक्तांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. नंतर मात्र ब्रिटिशांनी त्याला पकडले आणि त्याचाही धीर सुटला. हैदराबादला वैद्यकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणांचा एक क्रांतिकारी गट होता, तोही टिळकांना प्रचंड मानत असे. पुढच्या काळात नावाजलेले ‘माझे रामायण’कर्ते दत्तो वामन तुळजापुरकर आणि पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचाही या हैदराबादी क्रांतिकार्यात सहभाग होता.


रघुनाथ आमडेकर हे टिळकभक्त स्वातंत्र्यासाठी चोर्‍या करायचे आणि त्यातून मिळवलेले दागिने विकून शस्त्रे खरेदी करायचे. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले. गुलबर्ग्याला माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबकराव गोगटे, औरंगाबाद तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे बी. ए. यादवराव, निजामाबादच्या तंत्रनिकेतनचे काशिनाथ पाध्ये या सगळ्या टिळकभक्तांना सरकारने नोकरीवरून बडतर्फ केले. काळे यांनी तर ताई महाराज प्रकरणात फार महत्त्वाची साक्ष दिली होती. गोव्यालासुद्धा टिळकभक्त होते. पांडुरंग कोलबाळकर हे टिळकभक्त असून इंग्रजांविरुद्ध कारवाया करत आहेत, याची माहिती सरकारला होती.


असे कितीतरी क्रांतिकारक गुप्तपणे कार्यरत होते, ज्यांची नोंद इतिहासात नाही. त्यांचा किती आणि कुणी शोध घ्यावा? यांचे संबंध एकमेकांच्यात इतके खोलवर रुजले होते की, एकाच्या शोधात जावे तर त्यातून आणखीन नवे काहीतरी समोर येई. एकामधून एक संदर्भ लागत आणि मग मुळाशी जाणे अवघड होऊन जाई, याची कबुली अनेकदा इंग्रज अधिकार्‍यांनीसुद्धा दिलेली आहे.

(क्रमश:)



- पार्थ बावस्कर