‘द’ १०२ @ १४७ : द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2020
Total Views |
shepal_1  H x W




‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या कला-कलाकार आणि कलाकृतींविषयक स्तुत्य उपक्रमांत्मक कार्य करणार्‍या, १०२ वर्षांच्या संस्थेने जहांगिर कलादालनात या सप्ताहात म्हणजे दि. १० ते १७ फेबु्रवारी या काळात भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मूळ हेतू पारदर्शक असेल तर उत्तमोत्तम कलाकृतींच्या दर्शनासह, काम करणार्‍या पदाधिकार्‍यांना भेटूनही आनंद होतो. हे प्रथमच विशेषत्वाने नमूद करून मग त्यांच्याविषयी लिहायला अधिक भार हलका झाल्यासारखा वाटेल.


‘भार हलका’ एवढ्याचसाठी शब्द योजला आहे की, अशाच प्रकारच्या इतरही कलासंस्था इतरत्र आहेत. त्यांचं कलाकार्य चाकोरीनुसार सुरू आहे. ही संस्था कदाचित भारतातील एकमेव असेल...! याचं कारण असं की, कलाकारांच्या कलाकृती मागविण्यापासून तर प्रदर्शन संपन्न झाल्यानंतर पुनश्च त्या थेट कलाकारापर्यंत कलाकृती पोहोचविण्यापर्यंतचा पाठपुरावा या संस्थेकडून म्हणजे या संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून अनुकरण करण्यासारखा आहे. शंभरीला पोहोचलेल्या किंवा जन्मशताब्दी असलेल्या ज्येष्ठ चित्रकारांस वा शिल्पकारांस ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करणं; नामवंत अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञ यांच्या कलाविषयक योगदानाची दखलदेखील ही संस्था अत्यादराने होते होते; कलाकारांच्या कलाकृतींचे ‘पारदर्शी’ परीक्षण आणि पारितोषिके प्रदान करण्यातील सच्चेपणा निश्चित अभिनंदनीय आहे. मी तर म्हणेल, कलाक्षेत्रात पाय ‘रोवू’ इच्छिणार्‍या उदयोन्मुख कलाकारांनी ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चं कायम सदस्यत्व स्वीकारावं. म्हणजे त्या त्या कलाकाराचा ‘कलाप्रवास’ हा दीर्घकालीन प्रवास ठरेल.


या संस्थेकडून वर्षाच्या दिनदर्शिकेचा विचार करून सातत्याने विविध आणि वैविध्यपूर्ण कलाकार्यक्रमांची आयोजने आणि उत्सवी-सादरीकरणे होत असतात. कलाविषयक अभ्यास दौरे, अभ्यास वर्ग, स्केचिंग क्लब्ज, नामवंतांची व्याख्याने-प्रात्यक्षिके, स्लाईड शो आदी भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी या संस्थेद्वारे वारंवार होत असते. अशा कार्यक्रमांना ‘फाईंडर्स वीक’ असं देखणं नाव दिल्याने कलाकारांचा उत्साह वाढला नाही तरच नवल...!!


यावर्षी ज्येष्ठ कलाकाराला ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी, ज्येष्ठ आणि सेवानिवृत्त प्राध्यापक काशिनाथ साळवे यांच्या कलाविषयक योगदानाचा सन्मान ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ने केला. या सन्मानाचं नावही मोठं समर्पक आहे. ‘कलासृजन पुरस्कार!’


साळवे यांना महाराष्ट्र शासनानेही ‘कला पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते, तेव्हा ते म्हणाले होते, “सुमारे साडेतीन तपांच्या कला अध्यापनात मी एकच गोष्ट प्रकर्षाने कृतीत आणायचो, शेवटून नंबर असणार्‍या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष ठेवून त्यांचा ‘परफॉर्मन्स’ कसा वाढेल हे पाहायचो, हुशार विद्यार्थ्यांकडे फारसं पाहावं लागत नाही. ते त्यांचं काम उत्तम चालू ठेवतात...!” सरांच्या या वाक्यावर मी पीएच.डी करण्याची तयारी करीत आहे.


‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ला मी यापुढे ‘द’ने माझ्यासाठी/माझ्यापुरता उल्लेख करणार आहे. ‘द’ म्हणजे इंग्रजीत ‘निश्चित’, ‘द’ म्हणजे ‘एकमेव’, ‘द’ म्हणजे ‘ठाम’ असे अनेक अर्थ या ‘द’मध्ये आहेत, जे या संस्थेला लागू आहेत. प्रा. काशिनाथ साळवे यांच्यासारख्या वंदनीय कलाध्यापक आणि कलाकारास म्हणूनच या संस्थेने निवडण्यात प्रासंगिकता दाखविली.


अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, उपाध्यक्ष रवी देव, अध्यक्ष प्रकाश घाडगे, सचिव विक्रांत शितोळे, सहसचिव किशोर नादावडेकर, सदस्य उदय पळसुळेदेसाई अशा भरीव कलाकार्य आणि कलायोगदान असलेल्या अकरा विश्वस्तांसह ‘द’च्या इतरही सर्वच सहभागी सदस्यांच्या सकारात्मकतेमुळेच सदर संस्थेने लिलया १०२ वे वर्ष साजरे केलेले आहे. कुठलेही कार्य हाती घेतल्यानंतर चढ-उतार असतातच. असे अनुभव पैसे खर्च करून मिळत नसतात. मात्र, अशा अनुभवांमुळे संभाव्य खर्च होऊ घातलेला पैसा मात्र वाचविण्यास मोठे बळ लाभते. या संस्थेचे यश यामध्येच आहे.


दि. १० फेब्रुवारीला झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून सुभाष देसाई लाभले होते, तर प्रमुख उपस्थिती परवेझ दमानिया यांची लाभली होती. यावेळी विरार येथील स्वीटा राय यांच्या कलाकृतीस सुवर्णपदक मिळाले, तर योगेश मुरकुटे (मुंबई) यांच्या कलाकृतीस रौप्यपदक आणि मुंबईच्याच मुकेश पुरव/पुरो यांच्या घरळिज्ञीहरप (कपिक्षान) या त्रिमिताकारास कांस्यपदक जाहीर झाले. कलाकारांना सन्माननीय व्यासपीठाने पारितोषिके प्रदान केली. तेव्हा उपस्थित मंत्रमुग्धतेने टाळ्यांचा गजर करीत होते. उत्तम नियोजनबद्ध कार्यक्रमाने शुभारंभ झालेल्या या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कलाविद्यार्थी आणि कलाकारापेक्षा असलेल्या दोन विभागांसाठी देशभरातून सुमारे ६५० कलाकृती पाठवून सहभाग नोंदविण्यात आला. त्यापैकी १४७ कलाकृती, या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. या कलाकृतींमधूनच एकंदर ३२ कलाकृतींना विविध नावांनी सुपरिचित असलेले पुरस्कार देण्यात आले.


भारतीय संस्कृती, भारतीय दैनंदिनी आणि भारतीय समाजजीवन या विषयांवरील कलाकृती पाहताना ध्यानात येते ती त्यांची शैली, तंत्रे आणि आशयगर्भता...!!


जहांगिर कलादालनात बव्हंशीवेळा एकल वा समूह (दोन दिवस) कलाकारांचे एकत्रित प्रदर्शन पहावयास मिळते. ‘द’च्या प्रदर्शनाने जहांगिरमध्ये तब्बल १४७ चित्रकरांच्या व शिल्पकारांच्या कलाकृती एकाच वेळी पाहता येतात, हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.


‘द’चा हा प्रवास ‘१०२’ वरून ‘२०२’, ‘३०३’ वगैरे सुरू राहीलच. मात्र, कलाकारांनी कलाकृती पाठवून अधिकाधिक सहभागी होण्याची तयारी दाखविली पाहिजे. शिवाय ‘द’सारख्या आशेचा किरण वाटणार्‍या संस्थेने अशा प्रकारची प्रदर्शने मुंबई-पुणे व्यतिरिक्त इतरही शहरांमध्ये, भारतीय स्तरावर आयोजिली, तर प्रतिसादात वाढ होईल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज पडणार नाही. ‘द’च्या इतरही उपक्रमांसह या प्रदर्शनाचा लाभ कलारसिकांनी घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. या प्रदर्शनास आमच्या शुभेच्छा...!!


- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@