बोंबाबोंब करणारे गायब!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |
agralekh_1  H x



भाजपने इव्हीएम हॅक करून विजय मिळवल्याचे दावे काँग्रेस, आप आणि त्यांच्या हातातल्या माध्यमांनीही केले असते. चहूबाजूंनी इव्हीएमवर हल्ला करून त्याला ‘खलनायक’ ठरवले गेले असते. पण तसे काहीही न होता ही सगळीच मंडळी मौनात गेली आहेत.



अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील विजयानंतर भारतीय राजकारणात भाजपविरोधकांनी केलेला ‘इव्हीएम टॅम्परिंग’ हा वादाचा मुद्दा एकदमच गायब झाल्याचे दिसते. विधानसभेच्या निकालाआधी मात्र अशी परिस्थिती नव्हती, उलट ‘इव्हीएम’च्या नावाने बोंबाबोंब करण्याची जय्यत तयारी आपसह काँग्रेसनेही केली होती. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची इव्हीएमविरोधातील नाटके तर दिल्लीकरांना आणि देशवासीयांना मतदानाच्या दिवशीच पाहायला मिळाली. आपच्या कार्यकर्त्यांकडून इव्हीएमला छेडछाडीपासून वाचवण्याच्या नावाखाली मतदान केंद्रापासून स्ट्राँग रूमपर्यंत नजर ठेवली गेली. इतके करूनही आपच्या संजय सिंग यांना इव्हीएमच्या नावाने खडे फोडण्याची बुद्धी झाली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत इव्हीएमशी छेडछाड झाल्याचे दावे केले. आपचे हरियाणातील पक्ष प्रवक्ते आणि आयटी-सोशल मीडिया प्रमुख सुधीर यादव यांनी तर इव्हीएमविरोधात बोलताना बेशरमपणाचा नमुना दाखवला. “इव्हीएम प्रेग्नंट असून नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास आप जिंकेल आणि ऑपरेशन केले तर भाजप जिंकेल,” अशा शब्दांत त्यांनी अकलेचे तारे तोडले. परंतु, मंगळवारी दिल्ली विधानसभेचे निकाल लागले आणि पुन्हा एकदा आपची सत्ता येत असल्याचे निश्चित झाले. तेव्हा इव्हीएमवरून आक्रस्ताळेपणा करणारे विजयाच्या धुंदीत दंग झाले नि त्यांना इव्हीएमची साधी आठवणही राहिली नाही. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आपच्या सौरभ भारद्वाज यांनासुद्धा एकदाही इव्हीएमचा उल्लेख करावासा वाटला नाही. सौरभ भारद्वाज हे तेच महाभाग आहेत, ज्यांनी दिल्लीच्या विधिमंडळ सभागृहात बनावट इव्हीएम हॅकिंगचा कथित पराक्रम करून दाखवला होता. विधिमंडळ सभागृहात निवडणूक आयोगाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसताना आयोगाची खिल्ली उडवण्याचाच हा प्रकार होता. आज मात्र सौरभ भारद्वाज त्याच इव्हीएमच्या माध्यमातून जिंकून येत दिल्लीची परिस्थिती पलटविण्याची बडबड करताना दिसतात.


दरम्यान, भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा जनादेश स्वीकारण्याची तयार नसलेल्या, मतदारांनी आपल्याला लाथाडल्याचे मान्य नसलेल्या सर्वांनीच इव्हीएमला दोष देण्याचे काम केले. इव्हीएमला बळीचा बकरा करत या पक्षाच्या नेत्यांनी ब्ल्यू टूथपासून रिमोट नि आणखी कशाकशाने इव्हीएम हॅकिंगचे दावे केले. राहुल गांधी, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग, ममता बॅनर्जी, मायावती या नेत्यांनी भाजपला जनता स्वीकारूच शकत नाही, असे म्हणत इव्हीएमविरोधाचा राग आळवला. बरं, या ढोंगबाजीत केवळ राजकीय पक्ष आणि नेतेच सामील नव्हते तर काँग्रेसच्या आश्रयाने बुद्धीमंत, विचारवंत, अभ्यासक, राजकीय विश्लेषक आदी विशेषणे पटकावणार्‍या शहाण्यांनीही आपल्या मालकाचीच री ओढली. त्यातले काही सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, तिथूनही थपडा खाऊन आले, तरी त्यांना आपण कुठे काही चुकीचे करत असल्याचे समजले नाही. पुढे सय्यद शुजा या कथित सायबर एक्सपर्टने तर लंडनमध्ये पत्रकार परिषद घेत इव्हीएम हॅकिंगचे प्रात्याक्षिक करून दाखवले. विशेष म्हणजे इव्हीएम हॅकिंगच्या या जागतिक प्रयोगावेळी काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील कपिल सिब्बल हेदेखील साक्षीदार म्हणून उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचा निकालच नव्हे, तर गेल्या पाच-सहा वर्षांत भाजप ज्या ज्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांत विजयी झाला, तिथेही भाजपला पाण्यात पाहणार्‍यांनी इव्हीएमविरोधाचाच कित्ता गिरवला. अरविंद केजरीवाल यांनी गोवा आणि पंजाबमधल्या पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडत निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयाने बिथरलेल्या विरोधकांनी त्याचे श्रेयही इव्हीएम घोटाळ्यालाच दिले, तसेच अखिलेश यादव यांनी निवडणुका पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या साह्याने घेण्याची प्रतिगामी मागणी केली. परंतु, इव्हीएमच्या नावाने आदळआपट करणार्‍यांनी निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅकिंगचे दिलेले आव्हान स्वीकारण्याची हिंमत कधीच दाखवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हॅकिंगचे आव्हान स्वीकारल्याच्या केवळ गर्जना केल्या. मात्र, तशी वेळ आली, तेव्हा कुठल्यातरी बिळात लपून बसणेच पसंत केले.


आज मात्र, भाजपच्या नव्हे तर इव्हीएमवर चिखलफेक करणार्‍या पक्षांच्या बाजूने निकाल लागला, तर एकाएकी इव्हीएमविरोधात कांगावा करणार्‍यांची तोंडे शिवली गेली. दिल्लीतून पक्षाचा भोपळाही फुटला नाही तरी काँग्रेस अरविंद केजरीवालांच्या विजयाने नव्हे तर भाजपच्या पराभवाने खुश झाली. काँग्रेसच्या कोण्या कपिल सिब्बल वा दिग्विजय सिंगांना आपल्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही तरी इव्हीएमवर संशय घ्यावासा वाटत नाही. परंतु, हाच निकाल जर भाजपच्या बाजूने लागता तर दिल्लीच नव्हे, तर देशातले चित्र निराळे दिसले असते. भाजपने इव्हीएम हॅक करून विजय मिळवल्याचे दावे काँग्रेस, आप आणि त्यांच्या हातातल्या माध्यमांनीही केले असते. चहूबाजूंनी इव्हीएमवर हल्ला करून त्याला ‘खलनायक’ ठरवले गेले असते. पण तसे काहीही न होता ही सगळीच मंडळी मौनात गेली आहेत. भाजपच्या विविध यशानंतर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी करणारे अखिलेश यादव आणि राजदचे तेजस्वी यादव आपचा विजय साजरा करत आहेत. म्हणजेच मतगणनेच्या एक दिवस आधी ज्या इव्हीएमच्या नावाने शिव्या दिल्या जातात, त्याच शिव्या मनाजोगते निकाल आले की गिळल्या जातात, असा हा मामला. भाजपने मात्र अशा प्रत्येकवेळी विवेकी भूमिका घेतली, जनादेशाचा आम्ही स्वीकार करत असल्याचे सांगितले. अमित शाह, मनोज तिवारी वा जगतप्रकाश नड्डा यांनी इव्हीएमकडे बोट दाखवले नाही. हे दिल्लीतील निवडणूक निकालानंतरच दिसले नाही तर याआधीही ज्या राज्यांत भाजपला सत्ता गमवावी लागली, तिथेही भाजपने हीच प्रतिक्रिया दिली. परंतु, एवढी परिपक्वता भाजपविरोधात इव्हीएमच्या नावाने बोंबलणार्‍यांनी स्वतःच्या विजयी क्षणाव्यतिरिक्त कधी दाखवली का? तर नाहीच. तसे त्यांनी केल्यास त्याला भारतीय लोकशाहीचा सुदिन म्हणावा लागेल; अन्यथा भाजपच्या यशानंतर इव्हीएमविरोधाचे तुणतुणे आणि स्वतःच्या यशानंतर इव्हीएमचे नावही न घेणे चालूच राहील.


@@AUTHORINFO_V1@@