विकसनशील व्यवस्थापनाचा वैशिष्ट्यपूर्ण विकास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |
managment_1  H





वैयक्तिक जीवनातील व्यवस्थापनाबरोबरच व्यावसायिक पातळीवरील ‘व्यवस्थापन’ ही अधिक शास्त्रीय आणि व्यापक प्रकिया. तेव्हा, विशेषत्वाने उद्योजक, अधिकारीवर्ग तसेच व्यवस्थापकीय स्तरावर कार्यरत मंडळींसाठी आजपासून दर शुक्रवारी ‘व्यवस्थापननीती’ या नव्या सदरांतर्गत अनुभवी व्यवस्थापन सल्लागार दत्तात्रय आंबुलकर यांचे खास मार्गदर्शन...


बदलत्या व्यावसायिक परिस्थितीच्या संदर्भात व्यवस्थापनक्षेत्रातही मोठे व लक्षणीय बदल घडताना आपल्याला सर्वत्र दिसत आहेत. या बदलांमध्ये व्यावसायिक बदल, बदलते तंत्रज्ञान-कार्यपद्धती, कर्मचार्‍यांच्या बदलत्या व वाढत्या जबाबदारीसह असणारी व्यापक भूमिका इत्यादी प्रकर्षाने जाणवतात. या बदलत्या पैलूंमधूनच व्यवस्थापन क्षेत्रात विविध संदर्भात जे विकासात्मक बदल होत आहेत, ते मुळातून तपासून पाहण्यासारखे व अभ्यासनीय ठरले आहेत.


या बदलत्या कार्यशैलीमध्ये प्रचलित वा प्रस्थापित तंत्रज्ञान व कार्यपद्धती, वाढत्या आव्हानांपर परिस्थितीला केवळ सामोरेच न जाता त्यावर यशस्वीपणे मात करणे, व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांची पूरकच नव्हे, तर प्रेरक भूमिका व मुख्य म्हणजे कर्मचार्‍यांना केवळ कार्यप्रवणच नव्हे, तर जबाबदार बनविणे या सार्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.


वरील संदर्भात बदलत्या व विकासपूरक व्यवस्थापनाचे ‘पंचशील’ म्हणून पुढील पाच मुद्द्यांचा विचार व अवलंब करणे अपरिहार्य ठरते.


सक्षम व दूरदर्शी नेतृत्व

व्यवस्थापन व्यवस्थेअंतर्गत व्यवस्थापकांना आपल्यासह काम करणार्‍या सहकारी-कर्मचार्‍यांना केवळ अपेक्षित काम करण्याशिवाय त्यांनी सामूहिक स्वरूपात व संस्थागत स्तरावर उद्दिष्टपूर्ती करावी, यासाठी प्रोत्साहित करावे लागते. वरिष्ठांचे प्रोत्साहन- मार्गदर्शन हे त्यांच्यासह काम करणार्‍यांसाठी नेहमीच प्रोत्साहनपर ठरते.


वरिष्ठ म्हणून व्यवस्थापक मंडळी आपल्या कर्मचार्‍यांना वेळेत व सातत्यपूर्ण संवादासह मार्गदर्शन करणे, त्यांना बदलत्या स्थिती- परिस्थितीची जाणीव करून देणे, त्यांच्याशी उभयपक्षी व वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन करणे, हे सारे आवश्यक असते.


कर्मचार्‍यांशी नेमाने व नियमितपणे बोलणारे व ऐकून घेणारे व्यवस्थापक नेहमीच यशस्वी होतात, हे एक अनुभवसिद्ध सत्य आहे. व्यवस्थापकांच्या अशा वागण्या-बोलण्याने ते आणि त्यांच्या सहकार्‍यांमध्ये परस्पर विश्वासाचे वातावरण तर निर्माण होतेच, शिवाय अशा वातावरणाचे फायदे या उभयतांसह संस्थेला पण निश्चितपणे होत असतात.


नव्या व कल्पक विचारांसह काम करण्यास प्रेरणा-प्रोत्साहन देणे

वरिष्ठ म्हणून व्यवस्थापकांनी आपल्यासह काम करणार्‍यांच्या कल्पना आणि सुधारणाविषयक प्रस्तावांचे स्वागतच करायला हवे. यासाठी खुली व मोकळी मानसिकता अर्थातच अत्यावश्यक ठरते. कर्मचार्‍यांची सृजनशीलता व कल्पक कार्यपद्धतीला चालना देणेसुद्धा महत्त्वाचे ठरते व अशा प्रकारे चालना दिल्याने अनेक आव्हाने व प्रसंगी अशक्यप्राय बाबी पण सहजशक्य होतात, ही बाब लक्षात घेणे आवश्यक असते.


व्यवस्थापक मंडळींकडे सर्वसाधारणपणे मोठा अनुभव असतो. हा अनुभव तुलनेने दीर्घकालीन व प्रत्यक्ष कामावर आधारित असतो. त्याचवेळी नव्याने येणारे कर्मचारी, त्यांना मिळणारे प्रगत शिक्षण व नव्या कल्पना-आकांक्षांसह येत असतात. अशा वेळी नवीन कर्मचार्‍यांचे ज्ञान व वरिष्ठांचा कामाचा संदर्भातील प्रत्यक्ष अनुभव यांचा उचित समन्वय साधणे, ही बाब उभयतांसाठीच नव्हे, तर संबंधित संस्थेसाठीदेखील उपयुक्त ठरते.



आव्हानांवर मात करणारी वातावरणनिर्मिती

आज कामाच्या संदर्भात केवळ आव्हानांना सामोरे जाणेच पुरेसे नसून विविध आव्हानांवर यशस्वीपणे मात करणे गरजेचे ठरते. कुठलेही आव्हान स्वीकारताना त्यामध्ये जोखीम ही असतेच. या जोखमीसह काम करून जी मंडळी आपापले काम केवळ पूर्णच नव्हे, तर यशस्वीपणे पूर्ण करतात, तेच भविष्यात वाढत्या जबाबदारीसह यशस्वी होतात व त्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल ठरते.


व्यवस्थापकांनी यासाठी आपल्या सहकार्‍यांना त्यांच्या कामाशी निगडित जबाबदारीची जाणीव करून देतानाच, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यापुढे आपल्या काम आणि यशस्वी कामगिरीचे उदाहरण प्रस्तुत करणे, ही बाब अनेकार्थांनी प्रेरणादायी ठरते. सहकार्‍यांचा आपले वरिष्ठ व व्यवस्थापकांवरील विश्वास तर यामुळे वाढतोच, शिवाय त्यांच्यात स्वतःबद्दलचा आत्मविश्वासही निर्माण होतो. ही बाब कामाच्या ठिकाणी इतरांसाठीदेखील प्रेरक, मार्गदर्शक ठरते व यातूनच कर्मचार्‍यांच्या कामाला प्रेरक आणि पूरक अशी वातावरणनिर्मिती होत जाते.



सातत्यपूर्ण सरावाद्वारे सफलता
सद्यस्थितीत काम करणारे कर्मचारी हे शिक्षित-प्रशिक्षितच न राहता ते कौशल्यपूर्ण असावेत, ही बाब तेवढीच गरजेची ठरते. आपल्या सहकारी-कर्मचार्‍यांना कौशल्यपूर्ण करून सक्षम-कार्यक्षम करण्याचे काम व्यवस्थापक मंडळीच अधिक प्रभावी व परिणामकारकरित्या करू शकतात. त्यामुळेच यासंदर्भातील व्यवस्थापकांचे प्रयत्न आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.


अर्थात, यासाठी दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे व्यवस्थापक त्यांच्या कामाच्या संदर्भात कौशल्यपूर्ण व तज्ज्ञ असावेत व दुसरे म्हणजे त्यांच्याजवळ आपल्या कर्मचार्‍यांना पण केवळ काम करणारेच न ठेवता त्यांना कौशल्यसज्ज बनविण्यासाठी प्रामाणिक कळकळ असावी. यामुळेच कौशल्यपूर्ण कामाद्वारे दर्जापूर्ण अचूक काम वेळेत करण्याचे संस्कार आपल्या सहकार्‍यांवर करण्यात व्यवस्थापक यशस्वी ठरू शकतात.


या ठिकाणी अन्य एक तेवढीच महत्त्वाची बाब म्हणजे, वरिष्ठांनी आपल्या सहकारी-कर्मचार्‍यांना केवळ मार्गदर्शन करणे, सूचना देणेच पुरेसे नसून वरिष्ठांच्या अनुभवसिद्ध मार्गदर्शनाची तेवढ्याच प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे संबंधित कर्मचार्‍यांसाठी आवश्यक असते व कर्मचार्‍यांनी त्यांच्या अशा प्रयत्नांत सातत्य टिकवून ठेवावे, यासाठी व्यवस्थापकांनी त्यांना प्रोत्साहित केले, तर त्याचा मोठा परिणाम व्यवसाय-व्यवस्थापन स्तरावर होत असतो.



बदलत्या परिस्थितीनुसार बदलणे

व्यावसायिक क्षेत्रात बदल हे मोठ्या प्रमाणात व सातत्याने होत असतात. या बदलांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग-प्रक्रिया, आर्थिक-व्यावसायिक पैलू, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा, व्यावसायिक ध्येय-धोरणे, वाढती स्पर्धा या सार्‍यांचा समावेश असतो. या सार्‍या व्यावसायिक बदलांमध्ये असणारी एक समान बाब वा शब्द म्हणजे ‘बदल.’ त्यामुळे बदलत्या संदर्भातील या बदलांचे महत्त्व व फायदे आपल्या कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांना या बदलांवर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रेरित करण्यावर आज व्यवस्थापक-व्यवस्थापनाने भर देणे ही काळाची गरज आहे.


कामाच्या संदर्भातील बदल व बदलाचे महत्त्व व संदर्भ लक्षात घेता, हे बदल कर्मचार्‍यांच्या कामकाजातच नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मानसिकतेमध्ये होणे तेवढेच गरजेचे असते व हे घडवून आणण्याची जबाबदारी बदलत्या परिस्थितीत व्यवस्थापकांनी यशस्वीपणे पार पाडणे, हा त्यांच्या कामाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.


काळानुसार कंपन्या बदलत्या आव्हानांना सामोरे जात असताना त्यांना त्यांच्या प्रयत्नांत खर्‍या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांनी आपल्यासह आपल्या सहकार्‍यांची कार्यशैली व त्यामागची मानसिकता बदलण्याची जबाबदारी त्यांना प्रामुख्याने व प्राधान्यतत्त्वावर पार पाडणे पण आता अटळ ठरते.




- दत्तात्रय आंबुलकर 
@@AUTHORINFO_V1@@