‘स्व’राज्यात सुखाने राहू...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |
swarajya_1  H x




‘स्व’च्या म्हणजेच आत्म्याच्या राज्यामध्ये दु:खाचा यत्किंचितही लवलेश नाही. इथे तर आनंदच आनंद! याउलट ‘पर’ म्हणजे परक्यांचे किंवा मन व इंद्रिय यांचे राज्य. बाह्य विषयाकडे वळणारी इंद्रिये जेव्हा आत्म्याच्या अनुकूल वागू लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्थापना होईल.

स्वादोरित्था विषूवतो
मध्व: पिबन्ति गौर्य:।
या इन्द्रेण सयावरीर्वष्णवा मदन्ति शोभसे वस्वीरनु स्वराज्यम्॥
(ऋक् .१/८४/१०, साम.५/१/३/१, अथर्व, २०/१०९/१)


अन्वयार्थ
(गौर्य:) आत्मशक्तीने प्रकाशित इंद्रिय हे (इत्था) अशा प्रकारे (स्वादो:) स्वादिष्ट, ब्रह्मानंदरसाने रसाळ होऊन (विषूवत:) व्यापक (मध्व:) सोमरसाचा, शुद्ध भोग्यपदार्थांचा, मोक्षसुखाचा (पिबन्ति) आस्वाद घेतात, उपभोग घेतात. कारण (या:) जे इंद्रिय (स्वराज्यम् अनु) ‘स्व’ आत्म्याच्या राज्याचे अनुकरण करणारे बनून (वस्वी:) वसुरूप, निवासी होतात, ते आपल्या शोभेकरिता, तेजाकरिता (वृष्णा) बलवान अशा (इद्रेण) आत्म्याच्या (सयावरी:) सोबत चालणारे सहकारी होऊन (मदन्ति) आनंदाने रममाण होतात.


विवेचन
आजपर्यंत आम्ही ‘स्वराज्य’ या शब्दाचा अर्थ आपले ‘स्वत:चे राज्य’ म्हणजेच ‘स्वदेश’ या रूपाने अंमलात आणला आहे. ‘स्वराज्य प्राप्ती’ हे ध्येय प्रखर देशाभिमानी शौर्यवंतांचे असते. मातृभूमीच्या असंख्य नररत्नांनी प्राण तळहाती घेऊन ‘जिंकू किंवा मरू!’ हा मंत्र हृदयी जपला, तो स्वराज्याचे इप्सित साध्य करण्यासाठीच! म्हणूनच ‘स्व’राज्य स्थापन व्हावे ‘ही श्रींची इच्छा’ ही पवित्र भावना आजीवन हृदयी बाळगली, ती छत्रपती शिवरायांनी! असे अनेक नरवीर लढले, ते मातृभूमीवर ‘स्व’ राज्य स्थापण्याकरिता!



महर्षी दयानंदांनी ब्रिटिशांचे साम्राज्य असतानादेखील ‘स्वराज्य’ या शब्दाचा उल्लेख आपल्या ‘सत्यार्थ प्रकाश’ या अमरग्रंथात केला. नंतर दादाभाई नौरोजी व इतर राष्ट्रपुरुषांनी ही ‘स्वराज्या’चा उल्लेख केला. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य मिळविणे हा जन्मसिद्ध हक्क’ असल्याचे निक्षून सांगितले. इंग्रजांच्या जुलूमी राजवटीविरुद्ध आमच्या असंख्य राष्ट्रभक्तांनी प्राणांची आहुती दिली, ती ‘स्वराज्य’ म्हणजे स्वत:च्या राज्यप्राप्तीसाठीच! त्यांच्या बलिदानाने आम्हास ‘स्वराज्य’ मिळाले. पण पुढे स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांत काय झाले? हे आपण चांगलेच जाणतो.



‘स्वराज्य’ शब्दाच्या या उल्लेखामुळे व उच्चारणामुळे आपणा सर्वांची भावना फक्त ‘स्वत:चे राज्य’ या संकल्पनेभोवती फिरते, पण सर्वांच्या हे लक्षात यायला हवे की, ‘स्वराज्य’ हा शब्द सर्वप्रथम वेदात वर्णिला आहे! वेदज्ञान हे सार्वभौमिक, सार्वकालिक, सार्वजनिक असल्याने व्यापक अर्थाने ‘स्वराज्य’ हा शब्द जाणावयास हवा. याचा रूढार्थ त्यागून आध्यात्मिक व योगिक अर्थ स्वीकारावयास हवा. ‘स्व’ म्हणजे स्वत: किंवा आपण! तसेच ‘स्व’ म्हणजे ‘सुखस्वरूप आत्मा’ असा अर्थ वैदिक ऋषींना व चिंतकांना अभिप्रेत होता. इतका व्यापक अर्थ ग्रहित धरून जेव्हा तो आजही आचरणात आणला जाईल, तेव्हा निश्चितच सर्वत्र शाश्वत सुखाची व आनंदाची गंगा वाहत राहील.



‘स्व’च्या म्हणजेच आत्म्याच्या राज्यामध्ये दु:खाचा यत्किंचितही लवलेश नाही. इथे तर आनंदच आनंद! याउलट ‘पर’ म्हणजे परक्यांचे किंवा मन व इंद्रिय यांचे राज्य. बाह्य विषयाकडे वळणारी इंद्रिये जेव्हा आत्म्याच्या अनुकूल वागू लागतील, तेव्हा खर्या अर्थाने स्वराज्याची स्थापना होईल. हा आत्मा इंद्र म्हणजेच ऐश्वर्यसंपन्न आहे. इंद्रियांचे कल्याण व पूर्ण हित हे, तर या आत्म्याच्या अधीन राहून कार्यमग्न होण्यातच आहे. इंद्रियांकरिता ‘गौरी’ असा शब्द सदरील मंत्रात आला आहे. कारण, इंद्रिय हे नेहमीच शुभ्र, धवल व प्रकाशमान होणारे आहेत. ‘गौर्य:’ हे ‘गौरी’ शब्दाचे बहुवचनी रूप होय. इंद्रिय हे चंचल व जड आहेत! सत्व, रज, तम हे त्रिगुण (त्रिदोष) प्राकृतिक असतात. इंद्रियांची ओढ ही प्रकृतीकडे म्हणजेच बाह्य विषयाकडे असते. त्यांना प्रकाशित करणार्या ज्ञानयुक्त चैतन्यशाली इंद्राकडे जावेच लागते, अन्यथा प्रकृतीच्या जड विश्वात व माया-मोहाच्या जंजाळात अडकलेले इंद्रिय माणसाचे समग्र जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही.



ज्याचे इंद्रिय हे स्वराज्यात म्हणजेच आत्मरूप इंद्राच्या दरबारात वावरतात. ते सर्वस्वी स्वर्गात वास्तव्य करतात. ‘स्व’चा अन्य एक अर्थ सुखविशेष भोग्य पदार्थ आणि त्यांची साधने असाही होतो. विशेष प्रकारच्या सुखाकडे म्हणजेच शाश्वत अशा आत्मसुखाकडे गमन करणे म्हणजे स्वर्ग होय. जी इंद्रिय आत्म्याच्या अनुकूल राहून त्याच्या आज्ञेने सतत कर्मरत असतात, ती स्वर्गाला प्राप्त होतात. माणसाने अशाच आत्मसुखात राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडे व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या नावाअगोदर ‘स्व’ हे अक्षर जोडण्याची परंपरा आहे. मग ती व्यक्ती चांगली असो की वाईट! त्याचे परलोक हे स्वर्गाकडे की नरकाकडे हे कोण जाणतो? पण, हे निश्चित की मृत्यूनंतर संचित सत्कर्मानुसार पुढील सुखपूर्ण व्यवस्थेत जन्म घेऊ शकतो. म्हणजेच तो स्वर्गात जाऊ शकतो. पण, ज्याने नेहमी दुष्कर्मेच केली आहेत, अशी व्यक्ती निश्चितच नरकाला म्हणजे पापमय जन्माला, दु:खाला प्राप्त होते. मग त्याच्या नावाअगोदर ‘स्व’ का म्हणून लावावे?



खरे तर जीवंतपणीदेखील स्वर्गात म्हणजे ‘स्व’सुखात रममाण होता येते. यालाच ‘स्व’राज्याची व्यवस्था म्हणतात. सात्त्विक व शुद्ध अशा ब्रह्मानंदरूपी रसाचा आस्वाद घेत याच सुख विशेषात ते इंद्रिय मग्न असतात, ते खरोखरच धन्य होत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशांपूसन ते दूर असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, इर्ष्या, अहंकार या सहा शत्रूंना ते आपल्या जवळदेखील येऊ देत नाहीत. आत्म्याच्या राज्यात वावरणारा माणूस खर्या अर्थाने जगाच्या त्रिविध दु:खांपून, बंधनांपासून सर्वथा मुक्त असतो. कितीतरी संकटे आली तरी तो घाबरत नाही. सुख-दु:खामध्ये तो समदृष्टी ठेवतो. स्थितप्रज्ञाची लक्षणे योगेश्वर श्रीकृष्णांनी गीतेत सांगितली आहेत-



दु:खेषु अनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह:।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते॥


आज प्रत्येक मानव इंद्रियांच्या म्हणजेच परक्यांच्या (बाह्य) राज्यात वावरतोय. सारे जग भौतिक भोग पदार्थांच्या प्राप्तीसाठी धडपडताना स्वराज्याची उपेक्षा करते. विषयसागरात बुडालेली ही दुनिया जणू काही भल्या मोठ्या अनर्थकारी दु:खांनाच आमंत्रणे देत आहे. स्वराज्यापेक्षा परकीयांचे अर्थातच मन व इंद्रियांचे राज्य त्याला अतिप्रिय आहे. म्हणूनच काय करावे? कुठे जावे? याबाबत त्यांचा संभ्रम आहे. जोवर स्वत:चे (आत्म्याचे) राज्य आम्ही मान्य करून त्यात वावरणार नाहीत, तोवर अज्ञान व दु:ख दारिद्य्राचे जीणे जगावेच लागणार...!



‘स्वराज्य’ शब्दाचा प्रचलित अर्थ ‘स्वत:चे’, ‘आपले राज्य’ किंवा ‘आपला देश’ म्हणून स्वीकारला तरी याबाबतही आपण दिशाहीनच आहोत. कारण ‘स्व’ म्हणजे स्वत:च्या आपल्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा, सांस्कृतिक मूल्यांचा अंगिकार आज या राज्यात केला जातो आहे का? याविषयी आपला संभ्रमच आहे.



‘स्वराज्या’चा हा व्यापक अर्थ आपण व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विक पातळीवर लक्षात घेतला व आचरणात आणला तर निश्चितच सर्वत्र सुखासमाधानाचे व आनंदाचे राज्य निर्माण होईल व प्रत्येक नागरिक आत्मकल्याणात आणि राष्ट्रकल्याणात अग्रणी राहील.



- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य  
@@AUTHORINFO_V1@@