कमलनाथची कुकृत्ये...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |
vedh_1  H x W:




महापुरुषांच्या अपमान, अवमानाचा जणू काँग्रेसने विडाच उचललेला दिसतो आणि याचे केंद्र दिल्ली नव्हे, तर दुर्देवाने मध्य प्रदेश म्हणावे लागेल. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये नुकताच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा चक्क जेसीबीने रात्रीच्या अंधारात, लोकांचा विरोधही न जुमानता उखडण्यात आला. या कुकृत्यासाठी कमलनाथ सरकारने मुद्दाम काळोखाची कास धरली. कारण, सूर्यप्रकाशात दिवसाढवळ्या अशा उद्दामपणामुळे जनक्षोभ उसळला असता आणि शिवाय माध्यमांच्या कॅमेर्‍यात ही दृश्ये कैद झाल्यामुळे संतापाची लाट उफाळून आली असती. म्हणूनच कमलनाथ सरकार आणि त्यांच्या भ्याड कर्मचार्‍यांनी रात्रीच खेळ करण्याचा कुटील डाव रचला. पण, तरीही शिवप्रेमींकडून या प्रकाराचा जोरदार विरोध झाला व नंतर या घटनेच्या निषेधार्थ नागपूर-छिंदवाडा महामार्गही तीन तासांपासून अधिक काळ रोखून धोरण्यात आला. पण, कमलनाथ सरकारला ना या गोष्टीची लाज, ना खंत ना खेद... लाज वाटेल तरी कशी म्हणा, कारण, महापुरुषांचा अवमान करण्याची काँग्रेसची तशी जुनीच खोड. कमलनाथांनीही हीच काळी परंपरा कायम ठेवत थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरच जेसीबी चालवला. सरकारच्या म्हणण्यानुसार महाराजांच्या पुतळ्याचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. त्याची शहानिशा केल्यावर सत्य समजेलही. पण, जरी तो पुतळा आपण अनधिकृत मानून चाललो, तरी अशाप्रकारे महापुरुषांच्या पुतळ्यावर जेसीबी फिरवण्याच्या या तुघलकी पाशवी वृत्तीचा धिक्कार करावा, तेवढा कमीच. छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या महाराष्ट्राचे दैवत नाही, तर आजचा मध्य प्रदेशही कोणे एकेकाळी याच मराठा साम्राज्याचा एक अविभाज्य भाग होता, हेही बहुदा कमलनाथांच्या गावी नसावेच. भगव्याला ‘दहशतवादी’ ठरवून बदनाम करणार्‍या काँग्रेसी मुखंडांकडून आणखीन अपेक्षा ती काय म्हणा... पण, सावरकरांवर मध्य प्रदेशातूनच प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेतून अश्लाघ्य आरोप करून झाल्यानंतर यांची मजल आता थेट महाराजांचा अपमान करेपर्यंत गेली. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात खरंच शिवरायांबद्दल तीळमात्रसुद्धा आदरभाव लोकशरमेपोटी का होईना शिल्लक असेल, तर त्यांनी या घटनेचा नुसता निषेध न करता, शिवरायांच्या पुतळ्याची त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना करून दाखवावी आणि ‘महाराष्ट्रधर्मा’ला जागावे.



सत्तेसमोर महापुरुषांचा विसर

‘सत्ता सर्वोपरी’ हीच नीती सध्या काँग्रेस आणि त्यांचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष शिवसेनेनेही अवलंबलेली दिसते. सोयीस्कररित्या महापुरुषांना व्होटबँकेच्या राजकारणासाठी जवळ करायचे, त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या उत्साहात साजर्‍याही करायच्या, मात्र त्यांचा अवमान-अपमान झाला की ‘किमान समान कार्यक्रमा’च्या सबबीखाली शेपूट घालायची, असा हा सगळा दुटप्पीपणा. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारच्या कारवाईवर महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेचा पाट लावणार्‍या शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तेथील महामार्ग रोखून धरला खरा, पण अद्याप उद्धव ठाकरे व इतर नेतेमंडळींकडून निषेधाचा एक साधा शब्दही कानी पडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्‍या, त्यांच्या गडकिल्ल्यांवर दारुबंदीचा निर्णय घेणार्‍या, अजूनही हिंदुत्वाचा त्याग केला नाही म्हणून मिरवणार्‍या शिवसेनेने कमलनाथ सरकारला खडे बोल सुनवून, माफी मागण्यास भाग पाडावे. पण, कमलनाथसारखे निगरगट्ट राजकारणी त्याला कितपत भीक घालतील, हीच मुळी शंका. सावरकरांच्या पुस्तिकेवरून निर्माण झालेल्या वादात शिवसेनेने मध्य प्रदेशच्या काँग्रेसला विरोध दर्शविला असला तरी त्याचे फलित शेवटी काय झाले? काँग्रेसने सावरकरांवर खालच्या पातळीवर टीका करणारी ती पुस्तिका मागे घेतली का? त्या पुस्तिकांच्या प्रतींची होळी पेटवली का? तर यापैकी काही एक झाले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या तोंडदेखल्या विरोधालाही राज्याबाहेर फारशी किंमत नाहीच. थेट मराठा साम्राज्याशी घनिष्ट नाते सांगणार्‍या, शूरवीर महादजी शिंदे ज्यांचे वंशज, त्या मध्य प्रदेशातील सिंधिया राजघराण्यानेही कमलनाथ सरकारच्या या मनमानी कारवाईचा कडक शब्दांत निषेध नोंदवून या प्रकरणी हस्तक्षेप करायला हवाच. शिवजयंतीपूर्वी महाराजांच्या पुतळ्याची त्यांनी विधीवत प्रतिष्ठापना करून राजघराण्याचे आदर्श, मराठा साम्राज्याप्रती त्यांची निष्ठा, मान याचा परिचय करून द्यावा. अशाप्रकारे सर्वच स्तरातून निषेधाचे सूर अधिकाधिक तीव्र झाले आणि जनमानस या विरोधात एकवटले, तर सरकारलाही अखेर मान झुकवावीच लागेल. जनतेने हे लक्षात ठेवावे आणि अशा सत्तेसमोर महापुरुषांचाही अपमान करणार्‍यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी.
@@AUTHORINFO_V1@@