शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती म्हणजेच आरोग्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020
Total Views |
human health_1  







‘देही आरोग्य नांदते। भाग्य नाही यापरते।’ आरोग्याविषयी इतके यथार्थ वर्णन दुसरे कोणतेच नसावे. केवळ सहाच शब्दांमध्ये आरोग्य आणि व्यक्तीचे भाग्य यांचा संबंध किती अतूट आहे, याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे.



आदिमानवापासूनच आरोग्यविषयक काळजी घेतली जात होती. प्रकृतीची हेळसांड करून जमणार नाही याचे उपजत ज्ञान गुहेमध्ये राहणार्‍या अप्रगत मानवाकडे होते. त्याप्रमाणे निसर्गनियमाला अनुसरून जीवनशैली विकसित होत गेली. उत्क्रांती होत गेली आणि झपाट्याने राहणीमानात बदल घडून आले. काळ कोणताही असेना ‘आरोग्य’ हा विषय मानवाच्या केंद्रस्थानी होता, आहे आणि राहील...!


आरोग्य म्हणजे नेमके काय? तर ‘एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, सामाजिक द़ृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य किंवा आरोग्य म्हणजे शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात़ वरील व्याख्या ढोबळ मनाने सर्वांना माहीत असतात. प्राचीन काळापासून ते आत्ताच्या Ultra Morden युगातदेखील हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा, आवडीचा, काळजीचा ठरलेला आहे. केवळ वैयक्तिक जीवनाचा नव्हे तर समाज जीवनाचा तो एक भरभक्कम पाया आहे. सर्वार्थाने आरोग्यपूर्ण असणारा समाज हा सदैव प्रगतिपथावर राहणारच यात कोणतेही दुमत नसावे. शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करता हल्ली सगळेच ’हेल्थ कॉन्शस’ झालेत ही एक समाधानाची बाब आहे.


एखाद्या व्यक्तीचे आरोग्यपूर्ण जीवन हे केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या कुटुंबासाठी, तिच्या समाजासाठी आणि त्या राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपली कार्यक्षमता ही केवळ आपल्या आरोग्यावर अवलंबून असते. शरीर आरोग्यासोबतच एखाद्याचे मानसिक स्वास्थ्य पण ठीक असावे आणि समाज स्वास्थ्यही चांगलेच असायला हवे. या तिन्ही अंगांचा परिणाम व्यक्तीच्या जडणघडणीवर होत असतो. थोडक्यात, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. प्रवास करताना बर्‍याचदा आपण फलकावर ’नजर हटी, दुर्घटना घटी’ हे वाचलेले असेल. मला वाटते इतके व्यवधान आरोग्याच्या बाबतीत आपण सर्वांनी पाळायला हवे. माझा आरोग्याचा मुद्दा पटावा म्हणून अगदी उदाहरण द्यायचे तर आपल्या घरातील दुचाकी अथवा चारचाकी वाहन घेऊ.


भरपूर पैसे खर्च करून आपण हौसेने वाहन घेतो. या वाहनाची अंतर्गत संरचना, बाह्य संरचना जसे चाक, ब्रेक्स्, इंजिन, पेट्रोल टाकी, काचा, सुस्थितीत आणि परस्परांस पूरक असतील तरच ती गाडी कार्यक्षम राहू शकेल. वेगाने पळू शकेल, पण समजा यातील एखादी गोष्ट बिघडली असेल तर त्याचा उपयोग होईल का? वारंवार बिघाड निर्माण झाल्यामुळे गॅरेजमध्ये न्यावी लागणारी अथवा गॅरेजमध्येच पडून असणारी गाडी आणि दवाखान्याचे हेलपाटे घालणारी व्यक्ती अथवा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असणारी व्यक्ती सारख्याच आहेत, नाही का ?


एखाद्या कर्त्यासवरत्या व्यक्तीचे आरोग्य बिघडले तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनावर होतो. याबाबतीत त्या कुटुंबाला किती दुष्परिणाम भोगावे लागतात याची कल्पनाही करवत नाही ’जावे त्यांच्या वंशा’ हेच खरे !


८४ लक्ष योनीच्या फेर्‍यातून मानवजन्म प्राप्त होतो, असे आपले अध्यात्म सांगते. ‘मोक्षप्राप्ती’ केवळ मनुष्य जन्मातच मिळू शकते. प्रगल्भ मेंदू आणि बुद्धीचे वरदान केवळ मनुष्यालाच आहे. त्यामुळे इतर प्राणिमात्रांपेक्षा वैचारिक प्रगल्भता मनुष्याकडे आहे म्हणून आपण सर्वश्रेष्ठ आहोत. आपली शारीरिक तंदुरुस्ती ही किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव केव्हा होते? जेव्हा आपण खूप दिवस आजारी पडतो आणि भरमसाठ पैसा घालवूनही आपल्याला बरं वाटत नाही. पायाच्या नखापासून ते डोक्यावरील केसापर्यंत कोणत्याही व्याधी आपले मानसिक संतुलन बिघडवू शकतात. परिणामी, कामकाजातील लक्ष उडून जाते. याचा विपरीत परिणाम सर्व बाबींवर जाणवायला लागतो. दैनंदिन जीवनाची घडी अगदी विस्कटून जाते. म्हणूनच आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावयास हवी. Prevention is better than cure हे सूत्र लक्षात ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच कराव्यात. अगदी सर्व काळजी घेऊनही काही समस्या उद्भवली तर तिचा सामना करावा. येथे मनाचे सामर्थ्य फार मोठे आहे. खंबीर मन आणि सकारात्मक द़ृष्टिकोन आपणाला कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीतून बाहेर काढते. ‘नमनालाचा घडाभर तेल’ असं व्हायला नको. परंतु समाजात अशा चर्चांची गरज आहे. माझा जन्म उद्योजक घराण्यात झाला. एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे आम्ही अनुभवले. माझ्या आजोबांनी म्हणजे केशव विष्णु पेंढरकर यांनी आयुर्वेदाचे जीवनातील महत्त्व ओळखले होते. त्या काळात नोकरी करायचं सोडून स्वत:चा व्यवसाय करायचा ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती़ सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या माझ्या आजोबांनी समाजस्वास्थ्याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून समाजोपयोगी आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करण्याचा चंग बांधला. एका मराठी माणसाने असे व्यापक उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून फार मोठा पायंडा पाडला होता, असे मला वाटते. मागील पिढ्यांचे ॠण हे असे असतात़ के. व्ही. पेंढरकर यांनी आयुर्वेदाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखले आणि त्याचा शुद्ध स्वरुपात वापर करून लोकांचे आयुष्य आरोग्यपूर्ण आणि सुखद बनवले. आज ‘विको’ची उत्पादने केवळ आपल्या देशापुरती मर्यादित न राहता सातासमुद्रापार जगभरात प्रसिद्ध आहेत़ आज ‘विको’ ब्रॅण्डनेम आहे. यामागे माझ्या आजोबांची दूरद़ृष्टी, आयुर्वेदावरची निस्सिम आणि अढळ श्रद्धा, त्यासाठी त्यांनी घेतलेली अविश्रांत मेहनत, सोसलेले अपार कष्ट आहेत़ त्यानंतर माझे वडील ग़जानन केशव पेंढरकर आणि माझे सर्व काका यांनीदेखील कायमच आयुर्वेदावर भर दिला.


संपूर्ण जगाला आयुर्वेदाचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळेच आज जगभरात आयुर्वेदिक उत्पादने आवर्जून वापरली जातात. ’जे शाश्वत असतं ते कायम टिकतं’ निसर्गाने बहाल केलेली वनसंपदा, त्यातील औषधी वनस्पती आणि त्यांचा नेमका व पुरेपूर वापर हेच तत्त्व आपल्याला अंगीकारायचे आहे. ‘सस जींज हसपजजमते पे दवज ळवसक’ अर्थात ’चकाकते ते सारे सोने नसते’ त्यामुळे बाह्य देखाव्याला भुलून जाण्यात काही अर्थ नसतो. एकदा फसगत झाली की पुन्हा निसरड्या वाटेकडे कोणी फिरकत नाही. जिथे आरोग्याचा, आपल्या जीवन-मरणाचा संबंध येतो तिथे कोणतीही तडजोड करू नये कारण ’जीवन अमूल्य आहे.’ उद्योजक घराण्यात जरी आमचा जन्म झाला असला तरी घरातील वातावरण पूर्णत: मराठीच होते. ज्येष्ठांचा सक्रिय सहभाग व्यवसायात होता़ आम्हा मुलांवर बालपणापासून कळत-नकळत व्यवसायाचे संस्कार घडत होते. ‘विको’ परिवारात आयुर्वेदाचे स्थान कायम अढळ राहिले़ आरोग्याची गुरुकिल्ली आम्ही सांभाळून ठेवली आहे. तो आमचा वारसा आहे.



अतिसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत ‘विको’ उत्पादनांनी घराघरात अढळ स्थान मिळवलं. या सदराच्या निमित्ताने आपण दर मंगळवारी भेटणारच आहोत. काही संस्मरणीय घटना, मनोरंजक गोष्टी मी सांगणार आहे़ ‘आरोग्य’ हा विषय केवळ व्यक्तीच्या शरीराशी संबंधित नाही, तर समष्टीचा परिणाम प्रत्येकावर होत असतो़ यासंदर्भात आपण नक्कीच भेटणार आहोत. धन्यवाद!
(क्रमश:)

- संजीव पेंढरकर
(लेखक विको लॅबोरेटरीजचे संचालक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@