‘या’ अभिनेत्याने संविधानाच्या साक्षीने बांधली लगीनगाठ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020
Total Views |
chetan_1  H x W







लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आठवण भेट म्हणून दिली संविधानाची एक प्रत



मुंबई : लग्नसोहळा म्हटले की गर्दीने नटलेला एक वेगळाच थाट डोळ्यांसमोर येतो. मात्र पारंपरिक पद्धीतींना बाजूला ठेवत एका अभिनेत्याने वेगळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. कन्नड अभिनेता चेतन कुमार आणि मेघा यांनी नुकतेच एकमेकांना साथ देण्याचे वचन देत लग्नगाठ बांधली. १ फेब्रुवारीला त्यांनी विवाहबंधनात अडकत त्याच्याच दुसऱ्या दिवशी बंगळुरू येथील विनोबा भावे आश्रमात एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.


विशेष विवाह कायद्याअंतर्गत या जोडीचा लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या स्वागत सोहळ्यासाठी जवळपास ३ हजार पाहुण्यांनी उपस्थिती लावली. विवाहसोहळ्यामध्ये एकेमकांना वचनबद्ध करतेवेळी चेतन आणि मेघा यांना आशीर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी समुदायातील कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. आपल्याला जीवनात अनेकजण विविध टप्प्यांवर भेटतात. पण, विवाहसोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनेकांची ही उपस्थिती पाहून आपण भारावल्याची चेतनने म्हंटले आहे.


चेतन आणि मेघाच्या विवाहसोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे भारतीय संविधान. देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नगाठ न बांधता या अभिनेत्याने चक्क भारतीय संविधानाच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आठवण भेट म्हणून त्यांनी संविधानाची एक प्रतही दिली. समाजात एकोपा रहावा आणि तो जपला जावा, यासाठी आणि लोकांनी संविधान वाचून त्यातील मुल्यांचे आचरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत यासाठी आम्ही त्यांना ही खास भेट दिल्याचे चेतनने सांगितले.


चेतन आणि त्याची पत्नी मेघा यांना संविधानात आखून दिलेल्याच मार्गाने विवाहबद्ध व्हायचे होते. त्यामुळेच त्यांनी विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या नव्या नात्याची सुरुवात समाज, वैयक्तिक आयुष्य आणि निसर्ग अशा तीन महत्त्वाच्या घटकांची शपथ घेत केली. त्यांच्या या ‘अनोख्या’ उपक्रमाचे सर्व कलाकारांकडून कौतुक केले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@