पश्चिम घाटाच्या कुशीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020
Total Views |

tiger_1  H x W:
 
 
 
 
 
सिंधुदुर्ग (हेमंत ओगले) - जैवविविधतेच्या श्रीमंतीने नटलेले व अतिशय संवेदनशील असणारे असे ३६ भूभाग या पृथ्वीवर आहेत. त्यापैकी एक आपला ’पश्चिम घाट.’ अरबी समुद्राला समांतर असणारा डोंगरांचा एक मुलुख. खरेतर पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेत या ३६ भूभागांचे प्रमाण १५.७ टक्के होते. पण माणसाच्या हव्यासामुळे यातील ७० टक्के अधिवास कधीच नष्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रमाण आता अत्यल्प असे २.३ टक्के इतके उरले आहेत.
 
 
 
आपला हा ’पश्चिम घाट’ सुरू होतो गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून. हिमालयापेक्षाही प्राचीन असलेल्या या भूभागाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. सदाहरित, निमसदाहरित वने, पानगळीची जंगले, कातळसडे, पाणथळ जागा येथे उगम पावणार्या असंख्य नद्या अशा अनेक प्रकारचे अधिवास या भूभागावर आहे. प्रदेशनिष्ठ व अधिवासनिष्ठ प्राणी आणि वनस्पती लाखो वर्षे इथे आपले अस्तित्व टिकवून आहेत. ढोबळपणे संपूर्ण पश्चिम घाटाची विभागणी गुजरातकडचा उत्तर, महाराष्ट्रामधील मध्य आणि कर्नाटक व केरळकडचा दक्षिण पश्चिम घाट अशा प्रकारे केली जाते. उत्तरेकडील गुजरातपासून महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंतच्याया रांगांना ‘सह्याद्री’ म्हटले जाते. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागात, भारतात आढळणाऱ्या झाडांच्या प्रजातींपैकी एक तृतीयांश प्रजाती आढळतात. सापांच्या निम्म्या प्रजाती तर बेडकांच्या तीन चतुर्थांश प्रजाती इथे सापडतात. मागील काही वर्षांच्या संशोधनांमधून सरपटणार्या प्राण्यांच्या १० आणि बेडकांच्या सात प्रजातींची इथे भर पडली आहे.
 
 
 
 
भारतात आढळणाऱ्या पुष्पांच्या ६४ प्रजातींपैकी २४ प्रकार सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमध्ये सापडतात. येथील सर्वात उंच शिखर समुद्रसपाटीपासून १,६०० मीटर इतके असून या भागातील डोंगरांची उंची सरासरी ९०० ते १०० मीटर इतकी आहे. इथल्या डोंगर माथ्यावरील जंगले मध्यम उंचीची निमसदाहरित असून अंजनी जांभूळ यासारख्या वनस्पती विपुल प्रमाणात आढळतात. याउलट या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील उतारावर अधिक उंचीची सदाहरित निमसदाहरित व पानगळीची जंगले आहेत. या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये कोयना टोड, आंबोली टोड, उत्तर घाटी डान्सिंग फ्रॉग यासारख्या बेडकांच्या प्रजाती आढळतात. ज्या जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त इथेच दिसतात. त्याचप्रमाणे अनेक सापांच्या प्रजाती उदा. क्यास्टोज कोरल स्नेक, खैरेज शील्डटेल ही जगाच्या पाठीवर इथेच दिसून येतात. पक्षी व फुलपाखरांच्या अडीचशेहून अधिक प्रजाती तसेच रानगवे, सांबर, खवले मांजर, अस्वल, बिबट्या, वाघ, उदमांजर, शेकरू अशा सस्तन प्राण्यांच्या असंख्य प्रजाती येथे नांदतात.
 
 
’युनेस्को’ने जाहीर केलेल्या जागतिक नैसर्गिक वारसा असा दर्जा मिळवलेले ’कास’सारखे कातळावरील पुष्पपठार, ’सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’सारखा प्रकल्प, भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान असणार्या मोजक्या ठिकाणांपैकी असणारी ’आंबोली’ आणि गगनबावडा यासारखे वर्षा वनं घनदाट अरण्य, वनस्पती, प्राणी किटकांच्या असंख्य प्रकारांनी समृद्ध असे अद्भूत विश्व आहे. मात्र, या नाण्याची दुसरी बाजू ही तेवढेच भकास आहे. नियोजनशून्य विकास, औद्योगीकरण, रस्त्यांचे होणारे रुंदीकरण, प्रस्तावित रेल्वे मार्ग व घाट मार्ग यामुळे ही अपरिमित हानी होत आहे आणि भविष्यातही होत राहणार आहे. मुंबईसारखी आर्थिक राजधानी तसेच सुरत, पुणे, कोल्हापूर, नाशिक यांसारखी महत्त्वाची शहरे याच भागात वसलेली आहेत. या शहरांमधील जल व वायुप्रदूषणाचा प्रभाव जैवविविधतेवर होत आहे. खरंतर अर्ध्याहून अधिक भारताची तहान भागवणार्या गोदावरी, कोयना, कृष्णा यासारख्या असंख्य नद्यांचे उगमस्थान असणारा हा भूभाग आहे. खनिज खाणी, अननस, रबर व काजूच्या लागवडीसाठी होणारी बेसुमार वृक्षतोड, अवैध शिकार यामुळे इथला निसर्ग व त्यावर अवलंबून असणारे प्राणी-विश्व यांना भविष्यात खूप मोठा धोका संभवतो. ही निसर्गसंपदा वाचवणे ही काळाची गरज आहे.
 
 
(लेखक वन्यजीव निरीक्षक आणि उभयसृपशास्त्रज्ञ आहेत. )

@@AUTHORINFO_V1@@