रानगव्यांच्या विस्तारणाऱ्या 'पाऊलखुणा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020   
Total Views |
tiger_1  H x W:


आपल्याकडे वाघ-बिबट्यांचे स्थलांतर किंवा त्यांच्या बदलणार्‍या अधिवास क्षेत्रांबाबत बरीच चर्चा आणि ऊहापोह होतो. या चर्चेत इतर प्राणी दुर्लक्षित राहिले जातात. ‘रानगवा’ या त्यामधीलच एक प्राणी असून सद्यस्थितीत त्याच्या विस्तारणाऱ्या अधिवास क्षेत्राचा मुद्दा अधिक गंभीर आहे.

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रात विस्तारलेल्या पश्चिम घाटामधील ‘वन्यजीव भ्रमणमार्गा’चा (वाईल्डलाईफ कॉरिडोर) मुद्दा रानगव्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी रानगव्यांचा अधिवास हा कोयना, राधानगरी, चांदोली आणि दाजीपूर अभयारण्यासाठी प्रसिद्ध होता. मात्र, अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या ’फणसाड अभयारण्या’त नुकतीच त्यांची नोंद करण्यात आली. रायगडमध्ये रानगव्यांच्या अधिवासाची ही पहिलीच छायाचित्रीत नोंद आहे. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागाचा विचार केल्यास यापूर्वी केवळ महाबळेश्वरपर्यंत रानगव्यांच्या वावराची शास्त्रीय पुराव्यांसह नोंद होती. परंतु, त्यापुढेही आता उत्तरेच्या दिशेने फणसाड अभयारण्यापर्यंत त्यांचा अधिवास असल्याचे आढळले आहे. शिवाय किनारपट्टीलगतच्या प्रदेशातही गव्यांचा वावर निदर्शनास येत आहे. केवळ वावर नाही, तर या प्रदेशात त्यांचे प्रजनन होऊन गव्यांचे कळप त्याठिकाणी कायमस्वरुपी अधिवासही करत आहेत. सुरक्षित वन्यजीव भ्रमणमार्गांमुळे किंवा गव्यांनीच तो निर्माण केल्यामुळे पश्चिम घाटाच्या उत्तरकडे आणि किनारपट्टीलगत त्यांचा अधिवास वाढत असल्याचे मत वन्यजीव संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गव्यांमुळे निर्माण होणारा ’मानव-प्राणी’ संघर्ष वेळीच टाळण्यासाठी या भ्रमणमार्गांचा (स्थलांतराचे पट्टे) आणि त्यांच्या नेमक्या अधिवासक्षेत्रांचा शोध घेणे गरजेचे आहे.
 
 
 
(फणसाड वन्यजीव अभयारण्या’त आढळलेला रानगव्यांचा कळप)
tiger_1  H x W: 
 
 
 
भारतीय समाजाचे प्राचीन काळापासून ’गौ’ परिवारासोबत नाते राहिले आहे. या परिवारातील एक प्राणी म्हणजे ’रानगवा.’ हा प्राणी शाकाहारी भूचर असून भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश व आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो. सदाहरित, निम-सदाहरित, बांबू आणि उष्णकटिबंधीय कोरड्या जंगलांमध्ये त्यांचा अधिवास आहे. जंगलात अधिवास करणारा ’गवा’ही सर्वात मोठी गाय आहे. यामधील नराचे वजन एक हजार ते दीड हजार किलो आणि मादीचे वजन ७०० ते १००० किलोच्या दरम्यान असते. उंची साधारण १६५ ते २२० सेमींपर्यंत असते. ’भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत रानगव्याला प्रथम श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच या प्राण्याला वाघ-बिबट्यांच्या बरोबरीचे संरक्षण आहे. तसेच ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशनऑफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेने त्यांना जगातील ’संकटग्रस्त’ प्राण्यांच्या यादीत स्थान दिले आहे. महाराष्ट्रात रानगव्यांचा अधिवास हा विदर्भ आणि पश्चिम घाटांमध्ये आढळतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम घाटामधील रानगव्यांचे स्थलांतर आणि त्यांच्या बदलत्या अधिवास क्षेत्राचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे.
पश्चिम घाटाच्या दक्षिणेपुरते मर्यादित असलेले गवे गेल्या काही वर्षांमध्ये समुद्र किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात दिसून येत आहेत. संगमेश्वर, रत्नागिरी, गावखडीचा किनारा या परिसरांमध्ये गव्यांचा वावर आढळून आला आहे. बारवी आणि माहूली गडाचा परिसरातही काही वर्षांपूर्वी गवे आढळून आले होते. आता तर पश्चिम घाटाच्या उत्तरेकडे असलेल्या ’फणसाड अभयारण्या’तही गव्यांच्या अधिवासाचा शास्त्रीय पुरावा मिळाला आहे. ऑगस्ट, २०१८ मध्ये अभरण्यातील सूपेगावाजवळ गवे दिसल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावेळी वन्यजीव संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये गव्यांची पदचिन्हे आणि विष्ठा आढळली. मात्र, सप्टेंबर २०१९ मध्ये संशोधकांना सर्वेक्षणादरम्यान गव्यांची छायाचित्रे मिळाली. यावेळी कळपामध्ये असलेल्या नऊ गव्यांची छायाचित्रे टिपण्यात आली. ‘फणसाड अभयारण्या’त गव्यांचा अधिवासाचा हा पहिलाच पुरावा आहे.
 
 
 
संशोधकांच्या मते...
’फणसाड अभयारण्या’तील गव्यांच्या अधिवासाबाबत ’ऑर्गेनायझेशन फॉर वाईल्डलाईफ स्टडिज’चे वन्यजीव संशोधक कुणाल साळुंखे अभ्यास करत आहेत. त्यांच्या मते, काही दशकांपूर्वी गव्यांचा अधिवास हा संपूर्ण पश्चिम घाटामध्ये विस्तारलेला असावा. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे तो विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित झाला असेल. आता हे अधिवास क्षेत्र पुन्हा विस्तारत आहे. आपल्याकडे त्यासंबंधीचे शास्त्रीय पुरावे आहेत. गव्यांच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार म्हणजेच त्यांचे स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर पश्चिम घाटाच्या उत्तरेकडे आणि किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात होत आहे. या परिसरादरम्यान सुरक्षित वन्यजीव भ्रमणमार्ग असल्याने किंवा गवे ते निर्माण करत असल्याने त्यांचे स्थलांतर होत असल्याची शक्यता आहे. तसेच साळुंखे यांनी सांगितले की, स्थलांतरित क्षेत्रांमध्ये गव्यांच्या अधिवासात स्थिरता आली आहे. याठिकाणी ते प्रजनन करत आहेत. त्यामुळे या स्थिरतेच्या आणि स्थलांतराच्या पट्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही वन विभागाला लवकरच प्रस्ताव देणार आहोत. पश्चिम घाटामधील व्याघ्र अधिवासासंदर्भात संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी गव्यांच्या विस्तारणार्‍या अधिवासाची बाब सकारात्मक मानतात. त्यांच्या मते, गव्यांची विस्तारणारी अधिवास क्षेत्र ही आनंदाची बाब आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, या संपूर्ण पट्ट्यांमध्ये गव्यांचा कोणीच भक्षक नाही. गव्यांची शिकार करणारा वाघासारखाच प्राणी पश्चिम घाटाच्या उत्तर क्षेत्रात आणि किनारपट्टीलगत नसल्याने त्यांची संख्या जोमाने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित अधिवास क्षेत्र मिळत असल्याने गवे त्या क्षेत्रात कायमस्वरुपी अधिवास करत आहेत.
 
 
 
(गेल्या आठवड्यात महाबळेश्वरमध्ये आढळलेला रानगवा. मानवी वसाहतीत हा गवा शिरल्याने भटके कुत्रे त्याच्या मागे लागले. त्यामुळे गव्याने तिथून धुम ठोकली.)
tiger_1  H x W: 
 
 
 
संगमेश्वरमध्ये गव्यांची हत्या
कोकणपट्ट्यामधील सह्याद्रीच्या पायथ्याला लागून असणार्‍या संगमेश्वरमध्ये गव्यांचे अधिवास क्षेत्र निर्माण झाले आहे. या परिसरात मानवी वसाहतीनजीक गव्यांचा वावर वाढल्याची माहिती येथील वन्यजीव निरीक्षक प्रतीक मोरे यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून मोरे या परिसरात वन्यजीव निरीक्षणासाठी ’कॅमेरा ट्रॅप’ लावत आहेत. या ’कॅमेरा ट्रॅप’मध्ये गव्यांसह त्यांच्या पिल्लांचीही छायाचित्रे टिपली जात आहेत. मानवी वसाहतीनजीक गव्यांचा वावर असल्याने या परिसरात गव्यांशी निगडीत ’मानव-प्राणी’ संघर्ष होत आहे. जानेवारी महिन्यात वन विभागाला संगमेश्वरमधील कुंभारखाणी गावात पुरलेला गवा आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, गवा शेतीचे नुकसान करतो म्हणून गावातल्याच पाच लोकांनी त्याला विजेचा झटका देऊन मारल्याचे समजले. पुरावा नष्ट करण्यासाठी गव्याचा मृतदेह पुरण्यात आला. या प्रकरणात गावच्या सरपंचांचाही समावेश होता.
 
 
(संगमेश्वरमधील देवरुखमध्ये प्रतीक मोरे यांनी लावलेल्या ’कॅमेरा ट्रॅप’मध्ये कैद झालेले गव्याचे पिल्लू)
tiger_1  H x W: 
 
 
 
रत्नागिरीतून गव्याची सुटका
जानेवारी महिन्यामध्ये रत्नागिरीतील भोके गावात विहिरीत पडलेल्या गव्याची वन विभागाने सुटका केली होती. यावेळी जेसीबी खोदून विहिरीच्या एका बाजूने मोठी चर खोदण्यात आली. यावेळी घाबरलेला गवा त्या चरीतून बाहेर पडला आणि धूम ठोकून जंगलाच्या दिशेने पळाला. या प्रकरणामध्येही या परिसरात गवा कसा आला, याबाबत गावकर्‍यांसह वन विभागाला प्रश्न पडला.
 
 
(रत्नागिरीतील भोके गावामधील विहिरीत पडलेला गवा)
tiger_1  H x W: 
 
 
गावखडीच्या किनाऱ्यावर वावर
समुद्री कासवांच्या विणीसाठी रत्नागिरीतील गावखडीचा किनारा प्रसिद्ध आहे. या किनार्‍यावर गाव वावरत असल्याचे येथील कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांच्या निदर्शनास आले आहे. कासवांच्या घरट्यांच्या शोधार्थ किनार्‍यावर ग्रस्त घालताना डिंगणकरांना गव्याची पदचिन्हे आढळून आली आहेत. तसेच गव्याची एक मादी आणि तिच्या पिल्लाचेही दर्शन त्यांना घडले आहे.
 
 
 
मुरबाडमध्ये चाहूल
२०१७ मध्ये मुरबाड तालुक्यातील मासले गावाच्या हद्दीत रानगवा आढळला होता. प्रथमदर्शनी अनेकांना तो बैल वाटला. मात्र, ‘अश्वमेध प्रतिष्ठान’चे रोहन हरड आणि विशाल हरड या कार्यकर्त्यांनी अधिक तपास केला असता हा रानगवा असल्याचे सिद्ध झाले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून हा गवा येथे आल्याची शक्यता ‘अश्वमेध प्रतिष्ठान’चे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक अविनाश हरड यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. तसेच वन विभागाच्या अधिकार्‍यांना यापूर्वी शहापूरजवळील माहुली गडाच्या जंगलात २०१० मध्ये गवा असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, नंतर तो गवा कुठे गेला याची माहिती मिळाली नव्हती.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@