काटा रूते कुणाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020
Total Views |
raj uddhav_1  H



हिंदुत्वाच्या लढाईत उडी घेऊन राज ठाकरेंनी जे कमावले आहे, तेच नेमके उद्धव ठाकरेंनी गमावले आहे.



“मी माझा झेंडा बदललेला नाही. माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची मला गरज नाही.” ही विधाने आहेत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री व शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची. भविष्यात अशा प्रकारची अजून विधाने आली तर बुचकळ्यात पडायचे कारण नाही. महात्मा गांधींचे वाक्य आहे, “आधी ते तुमच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी झगडतील आणि मगच तुमचा विजय होईल.” राज ठाकरे यांच्या पक्षाचा राजकीय प्रवास हा आजच्या नव्या अवतारात त्याच दिशेने सुरू आहे. आधी आलेल्या राजकीय यशापयशामुळे त्यांची पुरेशी चेष्टा झालेली आहे. आज जो काही नवा अवतार धारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण पाहिला तर लाभलेला लोकांचा प्रतिसाद आणि माध्यमांनी घेतलेली त्यांची दखल ही; राज ठाकरेंच्या विरोधकांच्या मनात चिंता निर्माण करणारी तर समर्थकांच्या मनात उत्साह निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या झेंड्यांचा रंग बंदलून हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याचे सांगितले, तेव्हापासून शिवसेनेची ही तारांबळ उडालेली आहे.


शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक व सध्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनीदेखील हेच म्हटले. ते म्हणाले की, “बेगडी हिंदुत्वाच्या पक्षाची आम्हाला भीती वाटत नाही.” गांधींचे वाक्य इथून ताडून पाहायचे तर ते तंतोतंत जुळताना दिसेल. राज ठाकरेंच्या या नव्या हालचालींमधून दोन ठिकाणी एक जबरदस्त संदेश गेला आहे. पहिला आहे शिवसेनेला आणि दुसरा आहे महाराष्ट्रातल्या ढोंगी पुरोगाम्यांना. मराठीतल्या एका अग्रगण्य संपादकाने राज ठाकरे कसे फसणार, यावर मुक्त माध्यमांवर भरभरून लिहायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा आपला झेंडा बदलला, तेव्हा ताबडतोब संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याची घोषणा करून टाकली. असे करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारले तरी होते का? असा प्रश्न पडावा, अशी ही स्थिती आहे, कारण ते किती तारखेला जाणार हा मोठा प्रश्न आहे.


यापूर्वी उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकारे घोषणा केली होती. मात्र, आपल्या नव्या ढोंगी सेक्युलर दोस्तांना काय वाटेल, या भीतीने ते अयोध्येला गेले नाहीत. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर सावरकरांबाबत जे काही झाले, ते केवळ क्लेषकारकच मानावे लागेल. शिवसेनेच्या माध्यमातून मराठी भाषा दिनानिमित्त सावरकरांवरचा जो कार्यक्रम होणार होता, तो स्थानिक लोकाधिकार समितीने नाकारला. यात मनोरंजन नाही, असे कारण त्यासाठी देण्यात आले. खरे तर मराठी भाषेसाठीचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान इतके मोठे आहे की, त्यांना नाकारून चालणारच नव्हते. मूळ मुद्दा खरे तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार्‍या उद्धव ठाकरेंचा होता. पूर्वी मेरूमणी वाटणारे सावरकर आता शिवसेनेला अडगळ वाटू लागले आहेत. कारण, सावरकरांच्या नामघोषामुळे नवे सोबती रूसले तर खुर्चीवरच गदा यायची. कर्तृत्वापेक्षा कारस्थाने करून पूर्ण केलेले आपल्या वडिलांचे स्वप्न उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता संपवित आहे ती अशी.


शिवसेनेसमोर यामुळे भविष्यात अनेक प्रश्न असतील. शिवसेनेचा मराठीपणाचा मुद्दा हिंदुत्वाशिवाय अपुरा आहे. हिंदू दहशतवादासारख्या संकल्पना रुजवून रूढ करू पाहणार्‍या, कोरेगाव भिमासारख्या प्रकरणातून दोन जातींत तेढ निर्माण करू पाहणार्‍यांचे समर्थन करणार्‍या मंडळींसोबत आज शिवसेना सत्तेची वाटेकरी आहे. यातून जो काय जायचा, तो संदेश शिवसेनेच्या कोअर मतदाराला दिला गेला आहे. आता यातून जे काही होईल, त्याची शिवसेनेला धास्ती आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका दीड-दोन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. ही महापालिका शिवसेनेच्या अस्तित्वाचे प्रमुख कारण आहे. मुंबईवरची शिवसेनेची पकड ढिली झाली तर भविष्यात शिवसेनेचे काही खरे नाही. शिवसेनेतून राज ठाकरेंच्या विरोधात येत असलेल्या या प्रतिक्रिया याचेच प्रतीक आहेत.

हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे काहीतरी अस्पृश्य गोष्ट, असा एक समज दूरवर होता. संघपरिवाराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो सोडला नाही. ‘मंदीर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे,’ हा उद्धव ठाकरेंचा चिमटा त्यावेळी अनेकांच्या जिव्हारी लागला होता, मात्र न्यायालयाला कायदा व सुव्यवस्थेचे काय होईल, याचा विचार करायला न लागता सत्याच्या बाजूने निवाडा देण्याची अनुकूलता कुठून आली, याचाही विचार केला पाहिजे. नियतीने हिंदुत्वाच्या राजकारण व समाजकारणाला अनुकूल असे वातावरण तयार करून ठेवले आहे. बाबराच्या आदेशाने मीर बाकीने मंदिर तोडून तिथे विवादास्पद ढाँचा उभा केला, असे सांगितले. त्यानंतर सुरू झालेल्या हिंदूंच्या संघर्षाला अद्याप विराम मिळालेला नाही. उलट ही लढाई आता समेवर येऊ लागली आहे.


राम मंदिर हा हिंदूंच्या या देशातल्या न्याय्य मागण्यांपैकी एक मुद्दा होता. यातून या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानणार्‍यांचा व त्याच्या विरोधात उभे राहाणार्‍यांचा असे दोन गट पुढच्या काळात स्पष्टपणे पडलेले दिसतील. कोण कुठे आहेत, यावरच त्यांचे भविष्यातील अस्तित्व ठरेल. नागरिकत्वासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करणे हाही त्यातलाच एक भाग पण त्यात कसे दोन भाग पडले आहेत, हे देशासमोर आहे. या देशातल्या प्रमुख साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे, अशी मुक्ताफळे मनमोहन सिंगांनी पंतप्रधान असताना उधळली होती. पाच-सात वर्षांतच अशी स्थिती आज आली आहे की, या देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार भारतीयांचाच असला पाहिजे आणि अन्य घुसखोरांनी इथून बाहेर पडले पाहिजे, असा विषय पुढे आला. विषय साधा आहे आणि खर्‍या अर्थाने सेक्युलरही, मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून याचा विरोध करायचे ठरविले आहे. राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका घेऊन मैदानात उतरणे पसंत केले आहे. हिंदुत्व ही केवळ एकाच राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. हिंदुत्वाच्या व्यापक भूमिकेला साजेसे काम मनसे करीत असेल तर तिचे स्वागतच करायले हवे.
@@AUTHORINFO_V1@@