गणित बिघडलेले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020
Total Views |
shubhangi_1  H







ही वेळा आपण अचानक शेजार्‍यांच्या कटकटीने, रस्त्यावरच्या हलकल्लोळाने कुणीतरी कुणाच्या त्रासलेल्या शिव्यागाळीने विटून जातो. आक्रंदतो... आपल्या मनातून आपसूक एक आवाज येतो की, हे लोक मला अजिबात आवडत नाहीत. यांचा मी दुस्वास करतो, राग-राग करतो. अर्थात, असे आपल्याला वाटत असेल तर आपण नक्की एकटे नाही आहोत. कधी कधी आपण नशीबवान आहोत की, आपल्याला आवडू शकणारी माणसं आपल्या अवतीभवती दिसून येतात. पण, बर्‍याच वेळा आपल्याला न आवडणार्‍या, पसंत नसणार्‍या लोकांबरोबर आपले अस्तित्व टिकवावे लागते. त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. त्यांच्याबरोबर काम करावे लागते. यात तसे पाहिले तर काही गैर वाटत नाही. आपल्याला सगळेच कसे आवडू शकतात? आपल्यासारखे दयाळू, प्रामाणिक, लाघवी, सत्यवचनी व इमानदार म्हणजे आपल्याला आपल्यात जे जे चांगले भासते, ते ते दुसर्‍यात सापडेल असे नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाला पोषक अशा व्यक्ती आपल्याला भेटतील, याची काही ‘गॅरेंटी’ आपल्याला ‘वरच्या बाबा’ने दिलेली नाही. कारण, ते त्याच्याही ताकदीपलीकडे आहे. देवबाप्पा असला म्हणून काय झाले. त्याच्याही शेवटी काही मर्यादा आहेतच. पण, आपण जेव्हा इतरांचा दुस्वास करतो, तेव्हा लोकांना नावडते करण्यामागची कारणे काय असावीत, याचा ऊहापोह करायला पाहिजे. किंबहुना, आपणही कुणाला ना कुणाला तरी आवडत नसू हे सत्य स्वीकारून हा ऊहापोह करायलाच हवा.


सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कोणाला नावडतो वा आपल्याला कोणी नावडतो याची- म्हणजे केवळ मतभिन्नता. आपले वैचारिक दुमत! आपल्यापैकी काहींची वैचारिक पातळी उच्चप्रतीची असतेही. आपल्याला दुसर्‍यांची मते समजून घेण्याची निकोप प्रवृत्ती असली तरी कधीतरी आपण दुसर्‍यांच्या वैचारिक क्षमतेची टीका करतोच. ‘असा कसा कोणी आपल्याला न पटणारा विचार करू शकतो’ हा उत्तर नसणारा प्रश्न आपल्या मनात उभा राहतोच!! आणखी महत्त्वाचे म्हणजे काही लोक आपल्याला दर्शन देताच चिडवतात वा डिवचतात. ते अढीबाज असतात, खोटारडे असतात. ‘फेक’ असतात वा दुष्ट असतात. अशा लोकांबद्दल आपल्या मनात नक्कीच चीड व अढी निर्माण होते. खरेतर मानसशास्त्रात आवडणार्‍या व्यक्तींबद्दल बौद्धिक क्षमता, आकर्षक व्यक्तिमत्त्व किंवा प्रसन्न चित्तवृत्तीपेक्षा त्याच्यात उमटलेला प्रामाणिकपणा, पारदर्शकता, सहृदयता व दुसर्‍याला समजून घ्यायची प्रवृत्ती या गुणांचा प्रभाव अधिक दिसून येतो. म्हणजे त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यापेक्षा त्यांचा भावनांक जास्त महत्त्वाचा असतो. आपल्याला द्वेष्ट्या व्यक्ती का भेटतात, याची अनेक कारणे आहेत. आपली ‘फीलॉसॉफी’ वा यशसुद्धा.


आपल्यापैकी प्रत्येकाला एक कामयाब जीवन जगायचे असते. प्रत्येकाच्या मनात ‘हम होंगे कामयाब एक दिन...’ हे तत्त्वज्ञान असते. पण, हे तत्त्वज्ञान असून काय उपयोग? हे तत्त्वज्ञान कामयाब जीवनासाठी जादू तर करणार नाही. त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी फक्त बोटावर मोजता येणार्‍या लोकांची असते. बाकीच्यांसाठी ते तत्त्वज्ञान फक्त एक स्वप्न असते. कामयाब होणार्‍या लोकांना मग सहजपणे असे द्वेष्टे लोक भेटतात. सर्वसाधारण लोकांना कष्ट करायचे नसतात आणि यशस्वी लोकांना देवाने खास शुभाशीर्वाद दिले आहेत, यावर त्यांचा विश्वास असतो. आपले अपयश म्हणजे दुर्दैव व त्यांचे यश म्हणजे सुदैव असे त्यांना वाटते. नशिबाने साथ दिली म्हणून त्यांनी यश चाखले, या विचाराने ही अपयशी माणसे यशस्वी माणसांचा द्वेष करतात.


काही मंडळी खर्‍या अर्थाने अतुलनीय असतात. कालपर्यंत इतरांच्या छत्रीखाली वावरणारी ही माणसे कधी आकाशाला गवसणी घालतात, हे कळत नाही. त्यामुळे ज्या माणसांना पार करून ही माणसे आकाशाची मर्यादा मानतात तेव्हा साहजिकच ज्यांच्या कवेत तुम्ही जगत होता, ती माणसं बिचकतात. आजपर्यंत यशाच्या शिडीवर तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या पायर्‍यांवर होता आणि अचानक आता तुम्ही त्यांच्याहीपेक्षा वरच्या पायर्‍यांवर पोहोचलात, हे काही त्यांना पचत नाही. कारण, आता त्यांचा अभिमान दुखावतो. त्यांची सामाजिक परिस्थिती बिघडते. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. मग मात्र त्यांना तुम्हाला खाली खेचण्यातच आनंद वाटतो. तुम्ही सामाजिक शिडीवर ज्या क्षणी वर चढता त्या क्षणी तुमची सर्वांगीण प्रगती झालेली असते. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली असते. तुमच्यावर प्रेम करणार्‍या माणसांना याचा खरा आनंद होईल. पण, सर्वसाधारण लोकांना मनातून खूप असुरक्षित वाटेल. त्यांना आपला पराभव झाला आहे, असे वाटेल. साहजिकच या पराभवाचा बदला घेण्यासाठी ते सज्ज होतील. त्यांना तुमच्यावर असलेला पूर्वीचा ‘पॉवरकंट्रोल’ मिळवायचा असतो. म्हणूनच ते तुमचा द्वेष करतील. तुमचा विनाश करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या वेगाने चालणार्‍या गाडीला ‘ब्रेक’ लावण्याचा प्रयत्न करतील. कारण, त्यांचे ‘पॉवर’चे गणित आता बिघडलेले आहे.
(क्रमशः)
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@