विजयानंतर भानच हरपले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020
Total Views |
vedh_1  H x W:





दक्षिण आफ्रिकेमधील पोटचेफ्सट्रुम येथे पार पडलेल्या सामन्यात भारतावर तीन गडी राखून विजय मिळवत बांगलादेशच्या संघाने ‘अंडर-१९’ क्रिकेट स्पर्धेत आपले पहिले विजेतेपद मिळविले. बांगलादेशच्या युवा संघाने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केलेच पाहिजे. संयमाने क्रिकेट खेळल्यामुळे आणि पावसाच्या कृपेने बांगलादेशला अटीतटीच्या सामन्यात भारताविरोधात विजय मिळवता आला. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळालेल्या या पहिल्या जेतेपदानंतर बांगलादेशच्या संघाला भानच राहिलेले नसल्याचे या संघाच्या खेळाडूंनी दाखवून दिले. बांगलादेश संघातील काही राखीव खेळाडूंनी उच्छाद मांडत भारतीय संघाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. आक्षेपार्ह वर्तन केल्यानंतर भारतीय खेळाडू चिडले आणि याबाबत प्रतिस्पर्ध्यांना जाब विचारू लागले. भारत आणि बांगलादेशचे खेळाडू एकमेकांना भिडल्याची चित्रफीत यानंतर सर्व व्हायरल झाली आणि आयसीसीनेही या प्रकाराची दखल घेत चौकशी करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्राथमिक चौकशीच्या आधारावर आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी बांगलादेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची तयारी आयसीसीने चालविली आहे. या प्रकारानंतर बांगलादेशी खेळाडूंवर कारवाई झाल्यास ती योग्यच म्हणावी लागेल. विजयानंतर प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्याची बांगलादेशची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान बांगलादेशच्या खेळाडूंनी हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर भर मैदानातच ‘नागीण डान्स’ करत बांगलादेशच्या खेळाडूंनी श्रीलंकेला डिवचले होते. याचा परिणाम दोन्ही देशांतील संबंधांवरही झाला. बांगलादेशच्या अनेक खेळाडूंवर त्यावेळी आयसीसीने काही सामन्यांची बंदी घातली होती. विजयानंतर जल्लोष साजरा करण्याबाबत वाद नाही. मात्र, तो साजरा करताना प्रतिस्पर्धी संघाला डिवचणे हे कितपत योग्य? याबाबत ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र विजयानंतरही खेळाडूंनी भान बाळगायला हवे, असे मत अनेक क्रिकेट समीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.



गरज नेमकी कुणाची?

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळविल्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच मालिका जिंकत इतिहासाला गवसणी घालणारा भारतीय संघ कौतुकास पात्र होता, यात शंकाच नाही. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पुन्हा भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. मालिकेतील दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. हे दोन्ही सामने भारताला एकहाती जिंकता आले असते. मात्र, दोन्ही संघांत खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्याने भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्याने भारताला प्रतिस्पर्ध्यांपुढे ३४८ धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. न्यूझीलंड इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांचे चार फलंदाज टप्प्याटप्प्याने तंबूत परतले. भारत एकतर्फी विजय मिळवेल, असे वाटत होते. मात्र, गोलंदाज कुलदीप यादवने रॉस टेलरचा झेल सोडला आणि भारताला नेमके हेच भारी पडले. त्याने केलेल्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. फिरकी गोलंदाज हे भारताचे प्रमुख अस्त्र मानले जाते. मात्र, भारताची पूर्ण मदार असणारा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा मारा नेमका यावेळी निष्प्रभ ठरला. त्याच्याच गोलंदाजीवर सर्वाधिक धावा करण्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी यश मिळवले. परिणामी, भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसर्‍या सामन्यात कुलदीपऐवजी युझवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले. यावेळी गोलंदाजांनी न्यूझीलंडला कमी धावांवर रोखण्यात यश मिळविले. मात्र, फलंदाजांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार न पाडल्याने भारताला दुसर्‍या सामन्यातदेखील पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर मालिकाही भारताने गमावली. आता तिसर्‍या सामन्यात ‘व्हाईटवॉश’ टाळण्यासाठी भारताला संघात नेमके काय बदल केले पाहिजेत, याबाबत तज्ज्ञ मंडळी तर्कवितर्क लढवत आहेत. मात्र, संघात आता नेमकी गरज कुणाची, याकडेही समीक्षक लक्ष वेधत असून अनुभवी खेळाडूंना आता तरी संधी देण्याचे मत व्यक्त करत आहेत.


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@