जाहिरातीच त्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020
Total Views |

Advertisingis_1 &nbs
 
‘धन्नो चुडीयॉं नही, सपने बेचतीं है...’ असा एक संवाद ‘काला पत्थर’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्या तोंडी आहे. कोळशाच्या खाणीत दर आठवड्याला चार-दोन मजुरांचा मृत्यू होत असतो आणि बांगड्या विकणारी धन्नो, तिच्या बांगड्या ल्यायणारी अखंड सौभाग्यवती होते, असे सांगत बांगड्या विकते. दर आठवड्याला मजुरांच्या घरात सौभाग्यवतींचा आक्रोश अन्‌ मग दगडावर बांगड्या भरलेले हात आदळणे हे ठरलेलेच असताना, धन्नोच्या बांगड्या बायका घेतात... स्वप्नातही जे सत्य होणार नाहीत, अशी स्वप्नं दाखविणार्‍या त्या जाहिराती असतात. अर्थात, हे सवंग आणि सरसकट असे विधान झाले. या सगळ्याच चिंतनाचा संदर्भ खोट्या आणि आकर्षक जाहिरातींवर दंड ठोठावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, याच्याशी आहे. 2019 च्या डिसेंबरमध्ये याची सुरुवात झाली. खोट्या जाहिराती रोखण्यासाठी आधीच कायदा अस्तित्वात आहे. आक्षेपार्ह जाहिराती 1956 च्या कायद्यामध्ये आता दुरुस्ती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी औषधांच्या जाहिरातींच्या संदर्भात हा विचार करण्यात आला. त्यावर समिती गठन करण्यात आली.
आता त्यांनी दिलेल्या शिफारशींच्या अंगाने काही दुरुस्त्या या कायद्यात करण्यात आल्या आहेत. आता खोटेपणा तपासण्याच्या जाहिरातीत गोरे होणे, अकाली वृद्धत्व दूर करणे, एड्स बरा करणे, स्मरणशक्ती वाढवणे, उंची वाढवणे, लिंगवृद्धीचा दावा, केसगळती रोखणे, मानसिक आजारातून बरे करणे, आनुवंशिक आजार... आदी आजारांचा समावेश करण्यात आला आहे. अशा आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यात आता त्या जाहिराती करणार्‍या सेलिब्रेटींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांनाही दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
आपले उत्पादन विकण्यासाठी नानाविध क्लृप्त्या करण्यात येतात. तो अधिकार आहे. त्यासाठी तुम्ही वापरत असलेले तंत्र ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारे असावे, शब्द काळीज आणि मेंदूला एकाच वेळी भेदणारे असावे, हे तंत्र आहे. मात्र, हे सारे करत असताना सारासार विवेक बाळगला गेला पाहिजे. जागतिकीकरणानंतर बाजार या संकल्पनेची व्याप्ती वाढली. जग हीच बाजारपेठ झाली आणि प्रत्येक माणूस हा ग्राहक झाला. त्यातून स्पर्धा वाढली. आधीच्या काळी औद्योगिकीकरणाला वेग आला नव्हता तेव्हा गरजेपुरत्याच वस्तू निर्माण केल्या जायच्या. आता अनावश्यक वस्तू भरमसाट प्रमाणात निर्माण केल्या जातात आणि मग त्याची गरज निर्माण केली जाते. गरजेच्या आणि अजीबात गरज नसलेल्या वस्तू निर्माण करणे आणि त्याची गरज निर्माण करण्याच्या तंत्राला जाहिरात असे म्हणतात. कंपन्या टुंड्रा प्रदेशातही फ्रिजची विक्री करू शकतात. तशी गरज निर्माण करू शकतात. ती ग्राहकांची फसवणूकच आहे. एकतर एकाच प्रकारच्या अनेक उत्पादनांमधील स्पर्धा कंठछेदी झालेली आहे. ज्याची अजीबातच गरज नाही अशीही काही उत्पादने जाहिरातीच्या तंत्राने उपभोक्त्यांच्या केवळ माथीच मारलेली नाहीत, तर ती आता जीवनावश्यक झालेली आहेत. 20-30 वर्षांपूर्वी, शुद्धतेच्या नावाखाली मिनरल वॉटर 20 रुपये लिटरच्या भावाने विकत घेऊ आपण, असे सांगितले असते तर आपण भडकलो असतो. ताकही मोफत वाटण्याच्या काळात पाण्याची शुद्धता नाही म्हणत आजारांची भीती दाखवीत पाणी विकणे केवळ अशक्य होते. आता ते केवळ शक्यच नाही, तर जीवनावश्यक करून दाखविले गेले आहे. बाभळी, कडूिंलबाच्या काडीने दात घासले जात होते. सेंदव मीठ, चुलीतला लाकडी कोळसा, निलगिरीचे तेल आणि कापूर यापासून मंजन तयार केले जात होते. नंतर दातांचे इॅनॅमल खराब होते आणि थंड-गरम पदार्थ झोंबतात, असे सांगत जाहिरातीतले डेंटिस्ट टूथपेस्ट वापरायला सांगू लागले.
मिठाने दात खरवडतात, असे सांगितले जायचे. कडूिंलबाच्या काडीने हिरड्यांना दुखापत होते, असे सांगितले जायचे. आता पेस्टमध्ये नीम आलेले आहे, प्लॅस्टिकच्या तंतूंचे ब्रश आले आणि टूथपेस्टवालेच विचारू लागले आहेत- ‘आपके टूथपेस्ट मे नमक हैं क्या?’ बाजारीकरणाने पारंपरिक साधने काढून घेतली आणि कारखान्यांत बनलेली उत्पादने माथी मारली. अशी खूपसारी उदाहरणे देता येतील. मागे एका संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरांचा सर्वे केला होता. त्यात त्यांच्या घरी महिन्याला किमान तीनशे रुपयांच्या घरात खर्च कॉस्मॅटिक्सवर होत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यात विविध तेल, साबण, टूथपेस्ट, ब्रश, फेसपावडर, कांती उजळून टाकणारे मलम यांचा समावेश होता. 100 रुपये रोजाने कापूस वेचायला जाणारी महिला कांती गोरी व्हावी म्हणून (त्वचा टॅन होते म्हणे!) किमान 3200 रुपये किलोचा भाव असणारे मलम वापरते. त्यासाठी मग पाऊच संस्कृतीचा जन्म झाला. अंगाचे साबण वेगळे आणि डोईवरच्या केसांची निगा राखण्यासाठी शॅम्पू आले. पाचेक रुपयांच्या पाऊचमध्ये उपलब्ध असणार्‍या या वस्तूंचा किलोचा भाव डोळे पांढरे करणाराच असतो. आयोडिनयुक्त मिठाचे उत्पादन करणार्‍यांनी 50 पैशांत मिळणारे मीठ आता 50 रुपये किलोच्या भावात नेऊन ठेवले आहे. शीतपेेयांपासून मॅगीपर्यंत अनेक वस्तू गरजेच्याच नव्हत्या. कुठले शीतपेेय प्यायल्याने तुफानी ताकद येते का? पेेयजलाची मारामार असताना आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या शीतपेेयांच्या निर्मितीसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते.
जाहिरातीचा ग्राहकांच्या आवडी-निवडीवर खोलवर परिणाम होतो, हे निर्विवाद सत्य आहे; पण आकर्षक, मोहक वाटणार्‍या जाहिराती सांगत असलेलं सर्व खरंच असतं असं नाही. अनेकदा जाहिराती खोटे, भ्रामक आणि अवास्तव दावे करतात. त्यांना ग्राहक भुलतात आणि स्वत:चं नुकसान करून घेतात. अशा भ्रामक जाहिरातींना आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जाहिराती जागरूकपणे बघणं आणि काही चुकीचं वाटल्यास त्याची तक्रार करणं, याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यासाठी विशिष्ट व्यवस्थाही आहे. त्या जाहिराती करणार्‍या नामवंतांनाही दम दिलाच पाहिजे. अनेक अभिनेत्री त्वचा उजळ करण्याचा दावा करणार्‍या मलमांच्या जाहिराती करणार नाही, असे जाहीर करतात. त्यामागे नैतिकता कमी आणि या कायद्याचा धाकच अधिक आहे. मागे, महेंद्रिंसह धोनी ब्रॅण्ड अँम्बेसेडर असलेल्या आम्रपाली या गृहनिर्माण कंपनीच्या फसवणुकीचे प्रकरण खूपच गाजले. आताही धोनीच्या विरोधात या कंपनीने फसगत केलेल्यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केलेली आहे.
दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना आळा घालण्यासाठी 1985 साली अँडव्हर्टायिंझग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ही एक स्वयंसेवी वैधानिक नियामक संस्था आहे. यात जाहिरातदार, प्रसिद्धिमाध्यमं, जाहिरात कंपन्या आणि अन्य जाहिरातक्षेत्राशी निगडित तज्ज्ञांचा समावेश आहे. या संस्थेने भारतातील सर्व माध्यमांतील जाहिरातींसाठी नीतिनियम केले आहेत. ते पाळण्याची जबाबदारी जाहिरातक्षेत्राशी निगडित सर्वांची आहे. या संस्थेची ग्राहक तक्रार निवारण समिती ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करते. जाहिरातींना प्रमाणपत्र देते. जाहिरातींनी नीतिनियमांचं उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येते.
चांगल्या जाहिरातीची लक्षणं थेट सांगितलेली आहेत. आज आपण टीव्ही किंवा इतर माध्यमांत ज्या जाहिराती बघतो त्यांत यांचे किती पालन केले जाते? जाहिरातीतील माहिती सत्याला धरून आणि प्रामाणिक असावी. ती फसवी नसावी. जाहिरात ज्या समाजात दाखवण्यात येते तेथील सामाजिक/सांस्कृतिक मूल्यं, परंपरा यांचा अनादर करणारी नसावी. जाहिरातींनी त्यांच्यावरील सामाजिक जबाबदारीचं भान ठेवावं. समाजाला धोका असलेल्या उत्पादनाची जाहिरात करू नये. कोणत्याही जाहिरातीत जाती-जमाती, वर्ण, राष्ट्रीयत्व, राष्ट्रध्वज यांची विटंबना नसावी. मुलांच्या बाबतीतील जाहिरातीत कोणतेही हानिकारक स्टंट नसावेत. अश्लील आणि विकृत नसावी... ही तत्त्वं आहेत. आजच्या जाहिरातीत ती किती प्रमाणात पाळली जातात? जवळपास प्रत्येकच जाहिरातीत कामभावनेचा प्रेरक म्हणून सर्रास वापर केलेला असतो. अगदी कारच्या जाहिरातीतही अर्धनग्न स्त्रीची काय गरज?
@@AUTHORINFO_V1@@