विद्या बाळ : एका दिव्याचा प्रवाह...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020   
Total Views |
vidya bal_1  H




ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या अग्रणी विद्या बाळ यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने विद्याताईंच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याबरोबरच, महाराष्ट्रातील तसेच पाश्चात्य स्त्रीमुक्ती चळवळीचा या लेखाच्या माध्यमातून घेतलेला हा धांडोळा...


विद्या बाळ या महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या मार्गदर्शक व अग्रभागी उभे राहून नेतृत्व करणार्‍या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. कोणतीही चळवळ व आंदोलन वैचारिक आधार वा सैद्धांतिक बैठक असल्याशिवाय दीर्घकाळ परिणामकारकरित्या चालू शकत नाही. विद्याताईंचे वैशिष्ट्य असे की, एका बाजूला त्यांनी आपल्या चिंतनातून व अभ्यासपूर्ण वैचारिक लेखातून स्त्रीमुक्ती चळवळीला तात्त्विक आधिष्ठान दिले आणि दुसर्‍या बाजूला संस्था आणि संघटना उभारून व चळवळींच्या माध्यमातून स्त्री-पुरूष समानतेसाठी व स्त्रियांच्या न्यायहक्कांसाठी लढे उभारले. त्यासाठी त्यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा पाच दशकांहून अधिक काळ अतिशय बारकाईने व प्रत्यक्ष अनुभवाधारित असा अभ्यास केला. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी लेखन, वाचन, संपादन, भाषणे संवाद व समाज संघटन या सनदशीर व लोकशाही मार्गाचा संयमपूर्वक अवलंब केला. म्हणूनच ‘प्रतिभासंपन्न विचारवंत’ आणि ‘कृतिशील कार्यकर्ती’ म्हणून त्या महाराष्ट्रात ओळखल्या जातात.

त्यांचे जीवन व कार्य यांचा परिचय करून देण्यापूर्वी विद्याताईंनी आयुष्यभर स्त्रीविषयक समस्यांच्या सोडवणुकीसाठी जो संघर्ष केला, जे लढे उभारले, ज्या चळवळी केल्या, त्यांचे नेमके मूळ कशात आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या सर्व समस्यांची मुळे स्त्री-पुरुष विषमतेत आणि स्त्रियांवर होणार्‍या अन्यायात आहे. हे सर्व पुरुषप्रधान संस्कृतीचे व पुरुषांच्या अहंमन्य मानसिकतेचे फलित आहे. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा अनुदार दृष्टिकोन याला कारणीभूत आहे. ही समस्या सनातन असून ती केवळ भारतीय समाजजीवनापुरती सीमित नाही. जगभरातील पुरुषवर्गाला या अहंकाराने ग्रासले होते आणि आजही त्यात बदल झालेला नाही. स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात स्त्रियांमध्येच जागृती होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच पुरुषांच्या मानसिकेत होणारे परिवर्तनही अपरिहार्यपणे आवश्यक आहे.

पुरुषांच्या स्त्रीविषयकअनुदार भूमिकेचे परिणाम स्पष्ट करणारी दोन उदाहरणे देतो. भारतीय संस्कृतीत एका बाजूला ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।’ असे म्हणून तिचा गौरव केला जातो आणि दुसरीकडे ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति।’ म्हणत तिच्यावर अन्याय केला जातो. एक तर तिला देव्हार्‍यात बसवावे किंवा पायाची दासी समजून तिला स्वातंत्र्य आणि समानता नाकारायची, अशी ही पुरुषप्रधान संस्कृतीतील दुटप्पी भूमिका आहे. यात स्त्रीला माणूस म्हणून आवश्यक असणारी प्रतिष्ठा नाकारली जाते. हे कालचे नव्हे, तर आजचेही जमिनीवरील वास्तव आहे. दुसरे उदाहरण ब्रिटिशांचे आहे. तेराव्या शतकाच्या प्रारंभी ‘मॅग्ना कार्टा’ आल्यापासून इंग्लंडमध्ये लोकशाहीची बीजे रुजली व त्यानंतरच्या अनेक शतकात ती विकसित होत गेली. मात्र, या सर्व विकासक्रमात स्त्रियांचा सहभाग नाकारण्यात आला. स्त्रीवर्गाला लोकशाहीचा प्राण असलेल्या मतदानाचा म्हणजे स्वयंनिर्णयाचा, लोकशाही प्रक्रियेतील सहभागाचा हक्क मिळायला विसाव्या शतकातील पहिले दशक उजाडावे लागले. मुस्लीम देशातील परिस्थिती तर अधिकच दयनीय आहे. आजही स्त्रियांकडे शरीरसुखाचे साधन किंवा वस्तू म्हणूनच बघितले जाते. त्यांना कमी लेखण्याची व त्यांच्यावर अन्याय करण्याची पुरुषी मानसिकता आजही कमी झालेली नाही. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क-दर्जा मिळत नाही, पण कर्तव्याचे ओझे मात्र त्यांना वाहावेच लागते. पाश्चात्य जमावात स्त्रीमुक्तीची जी चळवळ गेल्या शतकात उभी राहिली, तिची कारणे पुरुषी मानसिकतेत अंहमहकितेत दडलेली आहेत. भारतातही स्त्रीमुक्ती चळवळीने स्वातंत्र्योत्तर काळात चांगळेच मूळ धरले आहे. विद्याताई या महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रवर्तक आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

याचा अर्थ स्त्रियांवर लादलेले अवलंबित्व किंवा त्यांची होणारी सर्वांगीण कुचंबणा या विरोधात या देशात इतिहासकाळात काहीच आंदोलने व प्रयत्न झाले नाहीत, असे नाही. मध्ययुगीन काळात भारतातील संतपरंपरेने विशेषत: स्त्रीसंत कवियत्रींनी स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर आळवला आहे. त्या काळात स्त्रियांच्या भोवती कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात तटबंद्या होत्या. भौतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील सुखापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले होते. अर्थात, भौतिक वा ऐहिक जीवनातील वंचनेपासून स्त्रीला मुक्त करणे त्यांच्या हातात नव्हते. तत्कालीन सामाजिक परिस्थिती त्याला पोषक नव्हती. त्यामुळे या कवियत्रींनी आपापल्या परीने अध्यात्म व परमार्थ क्षेत्रातील मुक्तीच्या कल्पना आपल्या कवनातून मांडल्या. त्यांनी लौकिक सुखाच्या आकांक्षेला पारलौकिक सुखाचा पर्याय शोधला. त्यांची मुक्तीची चळचळ ही दास्यभावाच्या विरोधातील बंडखोरीची होती. त्यातून त्यांच्या आंतरिक ऊर्मीचे स्वरूप स्पष्ट होते. या कवियत्रींच्या प्रयत्नांनी स्त्रीच्या पायातील धर्मक्षेत्रातील बेड्या तोडल्या होत्या. त्यासाठी जनमर्यादा सुधारली. बंडाची भाषा त्यांनी आपल्या कवनातून मुखर केलेली दिसते. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, संत सखू या महाराष्ट्रातील स्त्रीसंतांचा यात समावेश आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील दीडशे वर्षांत महाराष्ट्रात समाज प्रबोधन व सामाजिक परिवर्तन या पर्वाने गती घेतली. या काळातील चळवळींनी स्त्रीमुक्तीच्या संदर्भात आणखी एक पाऊल टाकलेले दिसते. विशेष म्हणजे, त्यांच्या या जीवनाच्या ऐहिक व भौतिक अंगावर भर देणारा होता. म. फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधकी, स्त्रीसुधारणावाद, छत्रपती शाहू महाराजांनी पुरस्कारलेला ब्राह्मणेत्तर बहुजन स्त्रीसुधारणावाद आणि डॉ. आंबेडकरांनी गती दिलेला दलित स्त्रीविषयक सुधारणावाद यांचे या क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यात पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, जना शिंदे, काशिबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक, मनोरमा मेधावी, कमलाबाई होसपेट, पार्वतीबाई आठवले, यांचा सक्रिय सहभाग अतिशय मोलाचा होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे स्त्रीमुक्तीची चळवळ चार पावले पुढे गेलेली दिसते.

भारतात जशी स्त्रियांच्या जागृतीची वाटचाल सुरू झाली होती तशीच ती पाश्चात्य जगतातही विसाव्या शतकात विशेष प्रभावीवणे सुरू होती. सिमॉन द बूव्हा, बेटी फ्रीडन, केट मिलेट, शूलानिथ फायरस्टोन, ज्युलियेट मिशेल, शीला रोबॉथम या पाश्चात्य स्त्रीमुक्ती क्षेत्रातील विचारवंत कार्यकर्त्या. त्यांनी तिकडे ही चळवळ सैद्धांतिक व व्यावहारिक पातळीवर एका नव्या टप्प्यावर आणून ठेवली. त्यांनी या चळवळीला ऐहिक व भौतिक आशय प्राप्त करून दिला. त्यांचा भर समूह परिवर्तनावर व बाह्य भौतिक परिस्थिती परिवर्तनावर होता. त्यांच्या या कार्यावर साम्यवादी व समाजवादी सिद्धांताचा विशेष प्रभाव होता. परिवर्तनासाठी चळचळींबरोबच बंडाचा वा क्रांतीचा मार्गही त्यांना वर्ज्य नव्हता. मात्र, त्यांचा भर प्रबोधनापेक्षा कृतिशीलतेवर अधिक होता. या व्यापक पार्श्वभूमीवर विद्या बाळ यांच्या प्रबुद्ध नेतृत्वाखाली चाललेल्या महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळचळींचा विचार होणे आवश्यक आहे.

विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी पुण्यात झाला. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ या विषयात बीएची पदवी संपादन केली. पुढे दोन वर्षे त्या पुणे आकाशवाणी केंद्रात निवेदन व कार्यक्रम निर्मात्या म्हणून कार्यरत होत्या. त्या काळात अनेक सामाजिक प्रश्नांचा त्यांना जवळून परिचय झाला. त्यानंतर त्या ‘किस्त्रीम’ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या परिवारात दाखल झाल्या. १९६२ ते १९८६ या काळात त्यांनी ‘स्त्री’ मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणून कार्य केले. पुढे १९८३-८६ या काळात त्या ‘स्त्री‘ मासिकाच्या मुख्य संपादकपदी होत्या. मुकुंदराव व शांताबाई किर्लोस्कर यांच्या प्रोत्साहनामुळे व मुक्त स्वातंत्र्यामुळे आपल्या अधिकाराचा उपयोग स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर तसेच चळवळींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी केला. समाजप्रबोधन आणि समाजपरिवर्तन या क्षेत्रात ‘किर्लोस्कर’ व ‘स्त्री’ या मासिकांचे योगदान अविस्मरणीय व उल्लेखनीय आहे. तो वारसा विद्याताईंनी समर्थपणे पुढे चालवला. आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याचे व्यासपीठ त्यांनी स्त्रियांना खुले करून दिले. पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क व प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांच्यात जागृती करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी या काळात केले. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून सार्‍याजणी’ हे मासिक सुरू केले. त्याच्या त्या संस्थापक-संपादिका होत्या. एका अर्थाने स्त्रीमुक्ती चळवळीचे ते मुखपत्रच होते व आहे. त्यांच्या यातील योगदानाचे स्वरुप वैचारिक व समाज जागरणाचे होते. वैचारिक व प्रबोधनात्मकदृष्ट्या स्त्रीमुक्ती चळवळीतील त्यांचे स्थान व योगदान मैलाचा दगड ठरणारे आहे. याबरोबरच त्यांनी कादंबरी व अन्य ललित लेखनही केले. त्यांनी केलेल्या वैचारिक लेखनाचा व संपादित ग्रंथांचा केंद्रबिंदू ‘स्त्री जीवन’ हाच प्रामुख्याने होता. काही पुस्तकांमध्ये सहलेखिका म्हणूनही त्यांचे योगदान आहे.

विद्याताई या मुख्यत: चळवळींशी जोडलेल्या कार्यकर्त्या होत्या. पुस्तकी मांडणी इतकाच प्रत्यक्ष व्यवहारांवर त्यांचा भर होता. १९८१ साली ‘नारी समता मंचा’ची स्थापना करून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ त्यांनी निर्माण केले. याद्वारे स्त्रीविषयक प्रश्नांचे प्रदर्शन तयार करून जनजागृतीसाठी महाराष्ट्रासह दौरे केले, भाषणे केली, परिसंवाद योजले. ग्रामीण महिलांचे आत्मभान जागृत करण्यासाठी ‘ग्रोईंग टूगेदर’ हा प्रकल्प राबविला. महिलांना व्यक्त होण्यासाठी ‘बोलते व्हा‘ हे खुले व्यासपीठ त्यांनी सुरू केले. २००८ मध्ये ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू करून त्यांनी पुरुषांच्याही अभिव्यक्तीची सोय करून दिली. पथनाट्य, मोर्चे, परिषदा, परिसंवाद, निदर्शने, प्रभातफेरी यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी सातत्याने स्त्रीमुक्ती चळवळ जागती ठेवली. समृद्ध परिणामकारक ठेवली. ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ’सखी सार्‍या जणी’, ‘साथ साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यास वर्ग’ यांसारख्या लोकाभिमुख उपक्रमांद्वारे जनजागृतीचे व्रत त्यांनी जीवनभर राबविले. त्यांच्या सामाजिक कार्याचा वेध ‘विद्याताई आणि.... ’या ग्रंथाद्वारे घेण्यात आला आहे. ‘मिळून सार्‍याजणी’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण ४५ लेखांचा संग्रह ‘स्त्रीमिती’ या नावाने प्रसिद्ध झाला असून स्त्रीमुक्ती चळवळीचा तो महत्त्वाचा दस्तावेज आहे.

शेवटचा मुद्दा. लो. टिळकांचे सहकारी व ‘केसरी’चे पुढचे संपादक साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे विद्याताईंचे आजोबा. घरातच त्यांना हिंदू महासभेचे व हिंदुत्वाचे वातावरण अनुभवायला मिळाले. त्यांचे पती व बंधू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय कार्यकर्ते होते. जनसंघाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ म्हाळगी यांच्या आग्रहावरून त्यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती, असाही उल्लेख आढळून येतो. त्या प्रभावातून मुक्त होऊन त्या समाजवादी व डाव्या विचारसरणीकडे कशा वळल्या, हे एक कोडे आहे. त्यांचा पिंड सामाजिक कार्याला पोषक होता. हे त्याचे एक कारण असू शकते. घरातील मुक्त व स्वतंत्र वातावरणाचाही तो परिणाम असू शकतो. या वातावरणाचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या कार्यशैलीवर व कार्यपद्धतीवर पडलेला असू शकतो. लोकशाही मार्गाने संयमित लढा देता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. संघर्षापेक्षा समन्वय, सहकार्य व संवाद यासह त्यांच्या विशेष भर होता, स्त्रीमुक्तीचा लढा म्हणजे ‘स्त्री विरुद्ध पुरुष’ अशी लढाई, असा संघर्ष त्यांना अभिप्रेत नव्हता, म्हणूनच ‘स्त्रियांनी आणि पुरुषांना स्वत:शी व परस्परांशी संवाद साधावा यासाठी’ हे ‘मिळून सार्‍याजणी’चे घोषवाक्य होते. त्या ‘दिव्यांचा प्रवास’ या लेखात म्हणतात, “सभोवती असलेल्या परिस्थितीचा प्रश्नांचा आपण खुल्या मनाने, सजगपणे, पूर्वग्रह न ठेवता, परंपरेचे ओझे न बाळगता आपण विचार करायला लागूया. त्याबद्दल मनात अडसर न बाळगता चर्चा-संवाद करूया. यासाठी केवळ आपल्या मतासारखी मतं असणार्‍यांच्या कोंडाळ्यापलीकडे जाऊन संवाद व चर्चा करूया. कदाचित त्याहून काही नवं समजण्याची शक्यता लक्षात घेऊया. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ या सुभाषिताचा अर्थ हाच की, अमूक वादाबाबत संवाद साधला तर त्यातून काही बोधकतत्त्व, तथ्य सापडू शकते. माझा संवादावर प्रचंड विश्वास आहे. कधी तो सफल होतो, तर कधी विफल ही होतो. माझ्या, मते संवादाला चर्चेला, मारामारी, धमक्या, हत्या हा पर्याय नाही.” हिंदू संस्कृतीतील गार्गी, मैत्रेयी यांच्या रांगेत बसू शकणार्‍या या विद्वान संवादिनीला शतश: प्रणाम! ज्या स्वेच्छा मरणाची चळवळ त्यांनी चालवली, त्याचा स्वेच्छा मरणाच्या आधी त्या मृत्यूला सामोर्‍या गेल्या, यातच त्यांच्या जीवनाची कृतार्थता दिसून येते.
@@AUTHORINFO_V1@@