जे. जे. स्कूल कार्यशाळेतील कलाकृती राजभवनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |


shefal article_1 &nb


विश्वविख्यात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे आणि त्यांचे सहकारी नेहमीच, तसेच नियमित त्यांच्या महाविद्यालयात उपक्रम राबवित असतात. सर्व सहाध्यायी अध्यापकांना विश्वासात घेऊन त्यांचे हे स्तुत्य उपक्रमांचे कार्य सुरू असते. वास्तविक 'जे. जे. स्कूल'प्रमाणेच इतरही 'जेजे'च्या नावाने या 'आर्ट स्कूल कंपाऊंड'मध्ये महाविद्यालये आहेत.


या अधिष्ठातांनी आणि दक्षिण मध्य क्षेत्र नागपूरच्या सांस्कृतिक कला कार्यालयप्रमुख खिरवाडकर यांनी 'जेजे'त (अर्थातच 'स्कूल ऑफ आर्ट'मध्ये उपयोजित कला महाविद्यालयात नव्हे) एकूण ३० कलाकारांची एक कार्यशाळा आयोजित केली आहे. या संदर्भात अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांनी पार्श्वभूमी विशद करताना सांगितले की, "राजभवन, महाराष्ट्र राज्य मुंबई येथील शासकीय कार्यालयांच्या प्रशस्त भिंतींना सजविण्यासाठी आणि कार्यालयीन गांभीर्यपूर्ण वातावरण जरा हलके करून सौहर्दपूर्ण सुसंवाद साधताना चित्रांची मदत होते. म्हणजे भिंतींवर जर सुंदर चित्राकृती पेंटिंग्ज असतील, तर वातावरणातील तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणून या कार्यालयांमध्ये वास्तववादी शैलीतील चितारलेल्या कलाकृती लावण्याचे राजभवन व्यवस्थापनाने ठरविले." मग हे उपक्रमासह प्रोत्साहन पूर्ण काम अर्थातच प्रा. साबळे यांच्याकडे आले. संधीचे सोने न केले तर ते 'साबळे' कसले? त्यांनी त्यांच्या ज्येष्ठ-कनिष्ठ कलाध्यापकांसह कला व्यवसायातील प्रथितयश कलाकारांवर जबाबदारी सोपविली.

 

सर्वसामान्य कलारसिकजनांना, समजणारी शैली अर्थातच 'रिअ‍ॅलिस्टिक' किंवा 'वास्तववादी.' मग या शैलीत काम करणाऱ्या कलाकारांना त्यांनी निवडले. या साऱ्या ३० सहभागी कलाकारांना विषय आहे - 'महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा.' मग महाराष्ट्राचे दैनंदिन जीवन-राहणीमान, वास्तु-मंदिरे वगैरे विषय निवडून सहभागी कलाकार या कला-कार्यशाळेत पेंटिंग्ज चितारत आहेत. दि. १ फेब्रुवारीपर्यंत 'सर जे. जे. स्कूल'च्या इमारतीत व परिसरात ही पेंटिंग्ज आकार घेत असतानाची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी कलाकार, कलारसिक आणि कला विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली आहे. दक्षिण मध्य-भारतात महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आणि छत्तीसगढ या राज्यांतील कलाकारांना या केंद्रांकडून सांस्कृतिक व कला क्षेत्रासाठी प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबविले नव्हे, तर सजविले जातात. हा एक उत्सव असतो. दि. २७ जानेवारीला या कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव, व्यक्तिचित्रकार अनिल नाईक यांच्यासह अनंत निकम, गोपाळ बेतावर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

 

मान्यवरांमध्ये सहाध्यायी अध्यापकांशिवाय मनोज सकळे, गणेश हिरे, नानासाहेब येवले अशा तरुण प्रथितयश आणि ज्येष्ठ ३० चित्रकारांच्या प्रात्यक्षिकांसह कलाकृती पाहता येतील. या साऱ्या कलाकृती महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राजभवनाच्या भिंतीवर भूमिका बजावणार आहेत. अगदी दीर्घकाळासाठी या कलाकारांना त्यांच्या कलासाधनेचा सन्मान करण्याच्या भावनेतून उचित मानधनदेखील प्रदान करण्यात येत आहेत. सर्वच कलाकरांना जरी 'पद्म' पुरस्कार देणे शक्य नसले तरी अशा प्रकारच्या प्रोत्साहन दिल्या जाणाऱ्या उपक्रमांद्वारे मानधनासह सन्मान दिला गेला तरी थोडेफार उत्सवी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. अधिष्ठाता साबळेंचे या बाबतीत कौतुक आहेच. ते ज्येष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न मानता सर्वच सहाध्यायींना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेत असतात. ही कार्यशाळा कलासृजनाचे एक केंद्र झाली आहे. या साऱ्याच सहभागी कलाकारांचे अभिनंदन...!!

 

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@