अवघे धरू सुपंथ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

vishal kadane_1 &nbs



कोरोनाकाळात हजारो गरजूंना सर्वतोपरी मदत करणारे विशाल कडणे हे मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक असून उच्च विद्याविभूषित आहेत. DCE, BE, ME, AMIE, FIV अशी शैक्षणिक गुणवत्ता असलेले विशाल हे पेशाने इंजिनिअर आहेत. त्यांनीही कोरोनाकाळात समाजासाठी महत्त्वपूर्ण सेवाकार्य केले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा हजारो गरजूंनी लाभ घेतला.तेव्हा, या कोविड योद्ध्याच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...


विशाल विजय कडणे
जबाबदारी : संचालक, मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन
कार्यक्षेत्र : ईशान्य मुंबई
संपर्क क्र. : ९५९४०२०८८८


किसी के मुस्कराहटो
पे हो निसार
किसी का दर्द
हो सके तो ले उधार
जीना इसीका नाम है...
एक लोकप्रिय गीत, या गीतपंक्तीनुसार आजकाल आपलं आयुष्य कोणी मार्गक्रमण करत असेल का? तर वाटते की, भौतिकतावादाच्या चक्रात निःस्वार्थी समाजसेवा करण्याचे दिवस केव्हाच दूर गेलेत, निरलस सेवाकार्य कुणी करत नसेल. पण, भांडुपचे विशाल कडणे मात्र याला अपवाद आहेत. कोरोनाकाळात त्यांनी ईशान्य मुंबईमध्ये केलेल्या सेवाकार्याला तोड नाही. जात, धर्म, वंश, प्रांत आणि वर्गीयस्तर असे भेद न करता विशाल सदासर्वकाळ जनतेच्या सेवेला तत्पर राहिले. विशाल यांचा हा सेवाभाव केारोना काळात अतिशय संवेदनशीलरीत्या प्रगट झाला. इतर दिवसांतील सेवाकार्य आणि कोरोनाकाळातील सेवाकार्य यामध्ये खूपच अंतर आहे. हे अंतर विशाल यांनी जाणले. कोरोनाकाळात हतबल झालेल्या गरजू लोकांना नेमकी काय मदत करायला हवी, याचा त्यांनी स्वानुभव घेतला. त्यातूनच मग विशाल यांनी ६५० लोकांना रेशन किट वाटप, पाच हजारांपेक्षा जास्त लोकांना, सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांना मास्क वितरण, ५०० गरजू नागरिक, हाऊसिंग सोसायट्यांना ऑक्सिमीटरचे वितरण केले. भांडुपमध्ये ‘कोविड’ रुग्णांसाठी रुग्णालय व्हावे म्हणूनही विशाल यांनी प्रयत्न केले. ३५ हजार हाऊसिंग सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे ते सर्वात तरुण तज्ज्ञ संचालक आहेत. या काळात हाऊसिंग सोसायटीसाठीही कोरोनाची वेगळी नियमावली जाहीर झाली.



 
हाऊसिंग सोसायटी आणि त्यातील रहिवाशांसाठी ही नियमावली नवीन होती. त्यात अनेक निर्बंध होते. ही नियमावली हाऊसिंग सोसायटीतील घराघरांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. या कामासाठी विशाल यांनी पुढाकार घेतला. ईशान्य मुंबईतील गृहनिर्माण संस्थांची ऑनलाईन मिटिंग आयोजित केली. त्यात जनप्रतिनिधींनाही आमंत्रित केले. हेतू हाच की, कोरोनाकाळात पाळावयाचे नियम समाजाला माहिती व्हावेत, व्यापक प्रमाणात कोरोनासंदर्भात जागृती व्हावी. या मिटिंगमुळे लाखो लोकांपर्यंत कोरोनाची जागृती झाली. अन्नदान, आरोग्यसेवा, जागृती या सर्वच स्तरावर काम करणार्‍या विशाल यांना हे काम का करावेसे वाटले? तर त्यालाही पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा गोपीनाथ हे सहकारी क्षेत्रात अग्रेसर होते. वडील विजय आणि आई जयश्री हे समाजशील आणि समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असत. समाजाशिवाय आपण शून्य आहोत. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या जाणिवेने आयुष्यात समाजाला धरून राहिले तरच उत्कर्ष होतो, ही शिकवण विशाल यांना आईवडिलांकडून मिळाली होती. विजय बँकेत कामाला होते. पण, त्यांनी शेकडो लोकांना नोकरीला लावले, कितीतरी कुटुंबांची घडी बसवून दिली. आपल्याकडे मदत घेण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती विन्मुख होऊन जाऊ नये, असा विजय यांचा दंडकच! त्यांनी आपल्या मुलांवरही हेच संस्कार केले. या संस्कारामध्ये वाढलेल्या विशाल यांच्या मनातही समाजाबद्दल आदर आणि प्रेम असणे यात काही नवल नाहीच.


विशाल यांनी कोरोनाकाळात सेवाकार्याला सुरुवात कशी केली, तर कोरोना आपल्या देशात येण्याआधी, म्हणजे साधारणतः डिसेंबर २०१९ साली विशाल काही कामानिमित्त परळला गेले होते. रात्री परतताना त्यांनी पाहिले की, टाटा हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलच्या आजूबाजूला खूप सारे लोक थंडीने कुडकुडत बसले होते, झोपले होते. ते बहुतेक सगळे टाटा किंवा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक होते. मुंबईत राहायला निवारा नाही, म्हणून ते पदपथावर पथारी टाकून राहिले होते. विशाल यांचे मन द्रवले. त्यांनी एक संदेश बनवला, त्यात या गरजूंना ब्लँकेट वितरण करायचे आहे, असे आवाहन केले. थोड्याच कालावधीत समाजातील सज्जन शक्तींनी भरूभरून मदत केली. बहुतेक सर्वच गरजूंना ब्लँकेट वितरण करण्यात आले. ब्लँकेट वितरण करताना कितीतरी लोकांनी विशाल यांचा संपर्क क्रमांक मागून घेतला. पुढे विशाल आपल्या कामात मग्न झाले. मार्च महिना उजाडला आणि देशात, मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला. कोरोनाची माहिती कुणालाच नव्हती, सर्वत्र भय आणि चिंता दाटून राहिलेली. ‘लॉकडाऊन’ सगळ्यांनी पाळलेले. अशातच विशाल यांना एक फोन आला. फोन करणारी व्यक्ती सांगत होती, “तुम्ही आम्हाला ब्लँकेट वाटली होती.


vishal kadane_1 &nbs

माझ्यावर माझे वडील विजय आणि आई जयश्री यांचा प्रभाव आहे. त्यांची समाजशीलता पाहत पाहतच मी घडलो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर समाजाचे देणे लागतोच, याची जाणीव त्यांनी मला दिली. त्यामुळेच आज मी समाजासाठी निःस्वार्थीपणे कार्य करू शकतो. मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संचालकपदाची जबाबदारीही मी याच समाजभावनेतून पार पाडण्याचा १०० टक्के प्रयत्न करतो.


थंडीत आम्हाला खूप आधार मिळाला होता. आजही आम्ही तिथेच आहोत. पण, आता कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे आजूबाजूची सगळीच दुकाने, हॉटेल बंद झाली आहेत. पैसे तर आमच्याकडे जास्त नव्हतेच; पण त्या थोड्या पैशात आम्ही एकवेळ तरी पोट भरायचो. आता ‘लॉकडाऊन’मुळे आमची उपासमार होत आहे. कृपया, आम्हाला मदत करा. आता उपासमार सहन होत नाही. तुम्हीच आम्हाला वाचवू शकता.” त्यावेळी कोरोनाचा कहर वाढलेला होता. मात्र, विशाल यांनी ठरवले की, आपण या लोकांना मदत करायलाच हवी. देवाने आपल्याला थोडे दिले आहे, ते वाटून संपणार नाही. त्यामुळे स्वखर्चाने विशाल यांनी अन्नधान्य वाटप, औषध वितरण आणि अन्य सुविधा या लोकांना पोहोचविल्या. विशाल यांचे काम लोकांना कळू लागले. त्यामुळे अनेक गरजू विशाल यांच्याकडे मदत मागू लागले. विशाल यांनी ठरवले की, आता मागे वळायचे नाही. समाजाने आवाज दिला आहे तर त्या आवाजाला आपण प्रतिसाद द्यायचाच. आपलेच भाऊ-बहीण आहेत, त्यांना असे मरू द्यायचे नाही.


याच काळात केंद्र सरकारनेही अनेक उपाययोजना केल्या होत्या. विशाल यांनी या योजना आणि त्यांचा फायदा लोकांना पोहोचविण्यासाठी मदत केली. पुढे ५०० ऑक्सिमीटरचे वाटप का केले, तर प्रत्येक सोसायटीमध्ये प्रवेश करताना येणार्‍या व्यक्तीचे तापमान तपासणे अनिवार्य होते. प्रत्येक सोसायटी किंवा सोसायटीतील संस्था ऑक्सिमीटर उपलब्ध करू शकेल असे नव्हतेच. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी ऑक्सिजन स्तर तपासून व्यक्तीला सोसायटीमध्ये प्रवेश देणे गरजेचे होते. त्यामुळे विशाल यांनी ५०० गरजू व्यक्तींना आणि सोसायटीमध्ये ऑक्सिमीटर वितरण केले. त्यामुळे सोसायटीतील एखादी जरी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीचे ऑक्सिजन स्तर तपासणे सोयीचे झाले. कोरोना असेल म्हणून तपासणी करायला नकार देणारे लोक मग साधा ताप आहे म्हणून का होईना, दवाखान्यात जाऊ लागले. त्यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार होऊ लागला. उत्तर पूर्व मुंबईमध्ये कोरोनाकाळात असे सर्वांगीण काम करणारे विशाल कडणे यांच्या कार्याला सलाम आणि मनातील सेवाभावी आत्मविश्वासाचे खरोखर अभिनंदन!
@@AUTHORINFO_V1@@