जनसेवेचा खरा कार्यकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

pawar_1  H x W:
नागरी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये राष्ट्रवादी विचाराने भारावलेले भाजपचे भटके-विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक नरेंद्र बाबूराव पवार यांनी, आपले आयुष्य नागरिकांची सेवा करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ म्हणत, त्यांनी कोरोनाकाळात अनेकांचे दुःख दूर सारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र, या लढाईत कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ते जनसेवेत रुजू झाले.


नरेंद्र बाबूराव पवार
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजपचे भटके-विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक
मतदारसंघ : कल्याण पश्चिम विधानसभा
पद : माजी आमदार
संपर्क क्र. : ९९२०९२३९३९

कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये गरीब, कामगार, मजूर, रोजंदारीवर काम करणार्‍या व्यक्तींना मोठा फटका बसला. अशा एकूण साधारणपणे २२ ते २३ हजार नागरिकांना सुरुवातीच्या काळात नरेंद्र पवार यांनी दोन महिने अन्नधान्यांचे वाटप केले. त्यानंतर पुढच्या चार महिन्यांत गरजूंना भोजन देण्याचा उपक्रम राबविला. आठ ते नऊ हजार लोकांना दररोज दुपारचे आणि रात्रीचे जेवण पुरविण्यात आले. त्यासाठी चार सेंटर केले होते. या सेंटरवरून जेवण पुरविण्यात येत असल्याने एका ठिकाणी गर्दी होत नव्हती. क्रीडा शिक्षक, कनिष्ठ वकील आणि पुरोहितांवर उपासमारीची वेळ आली होती, त्यांना अन्नधान्य पुरविले. नागरिकांना मदत करताना कोणताही जात, धर्म, पंथ पाहिला नाही. कोरोनाविरोधात लढण्यासाठी एक लाख कुटुंबांना ‘आर्सोनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले. कडोंमपाच्या ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये माधव रसायनच्या गोळ्या ‘कोविड रुग्णा’च्या कुटुंबीयांना दिल्या. या गोळ्यांचेही नागरिकांना वाटप केले. कल्याण पश्चिमेतील सर्व विभागातील सोसायट्या सॅनिटाईझ केल्या. ज्या सोसायटीत कोरोना रुग्ण आढळून आले, तिथे ‘पीपीई’ किट वापरून त्या घरात व त्या सोसायटीतही जंतुनाशक फवारणी केली जाते. हे काम आजही सुरू आहे. कल्याण पश्चिमेत त्यांनी आठ वेळा अ‍ॅन्टिजेन चाचणी शिबीर केले होते. त्यात अनेक जण ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजले. त्यामुळे त्यांना योग्य वेळी उपचार मिळण्यास मदत झाली.

नाशिक येथील शेतकर्‍यांची भाजी थेट सोसायटीच्या दारात उपलब्ध होत होती. शेतातील भाजी थेट दारात येत असल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणात तिची खरेदी करीत होते. याशिवाय कोणताही अडत्या किंवा दलाल यामध्ये नसल्याने ही भाजी स्वस्तात ग्राहकांपर्यंत पोहोचत होती. सुमारे ६०० सोसायट्यांमध्ये स्वस्तात चांगला भाजीपाला उपलब्ध करून दिला. मजुरांना आपल्या गावी जाता यावे, याकरिता नरेंद्र पवार यांनी प्रयत्न केले होते. त्यांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट लागत होते. ते सर्टिफिकेट देण्यासाठी शिबीर घेतले होते. या शिबिरातून २५ हजार मजुरांना सर्टिफिकेट दिले व त्यांना प्रवासाकरिता लागणारा ई-पासही जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून दिला. या मजुरांची यादी तयार करणे, त्यांना भोजन देणे, गाडी मंजूर करण्याचे काम करून घेतले. डॉक्टरांना मानधन देण्यात यावे, हंगामी शिक्षकांचे अडकलेले वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.
कल्याण-डोंबिवली हा विभाग ‘रेड झोन’मध्ये येत असल्याने ‘कोविड रुग्णां’ची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. रुग्णांना बेड मिळवून देणे हे एक मोठे आव्हान होते. काही रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात होती. त्या रुग्णांची बिले कमी करून देण्यासाठी रुग्णालयाशी पवार यांनी संवाद साधला. ‘कोविड रुग्णां’चा मृत्यू झाल्यास, त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एक टीम तयार केली होती. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. या व्यक्तींची यादी तयार केली आहे. प्लाझ्मा न मिळाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. प्लाझ्मा रक्तदाते मोठ्या प्रमाणावर मिळावेत, यासाठी समाजातील विविध स्तरातून आवाहनही केले. पवार यांनी स्वत: आणि काही संस्थांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी या सर्व काळात खर्च केला आहे. या कामात कडोंमपा व विविध संस्थांकडून सहकार्य मिळाले. सोसायटी सॅनिटायझर करण्यासाठी लागणारे सॅनिटायझर सुरुवातीला महापालिकेकडून पुरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेले ‘आत्मनिर्भर भारत’ हेही शिबीर घेतले. हे काम आजही सुरूच आहे.

pawar_1  H x W:


‘कोविड’काळात अनेकांनी काम केले. पण, मी आपली समाजाप्रति बांधिलकी लक्षात घेता एक कर्तव्य म्हणून हे काम केले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी निरपेक्ष भावनेने मदत केली. प्रत्येकाने निरपेक्ष भावनेने काम करण्याची गरज आहे.



पवार यांना या कामात त्यांच्या कुटुंबीयाची मोठी साथ लाभली. त्यांच्या पत्नी हेमा पवार याही सामाजिक कामात कायम अग्रणी असतात. ‘कल्याण विकास प्रतिष्ठान’च्या त्या अध्यक्षा आहेत. पवार यांना घरातून पाठिंबा असला, तरी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी पूर्णपणे काळजी घेतली होती. त्यासाठी ‘माधव रसायन’ या गोळ्यांचे सेवन करीत असत. त्यांचे कोरोनाकाळातील सोबती किंवा कार्यकर्ते यांनादेखील ‘माधव रसायन’ या गोळ्या सेवन करण्यास सांगत असत. मग त्या ‘आर्सोनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे सेवन असो किंवा काढा सेवन करणे, तसेच स्वच्छतेचीही पूर्णपणे काळजी घेतली होती. ‘कोविड’काळात काम करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील व इतरही पक्षश्रेष्ठीचे मार्गदर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी या कामात खूप मदत केली. पवार यांना त्यांच्या ‘कोविड’काळातील कामात कार्यकर्त्यांनी साथ दिली होती. हे सर्व काम करताना त्यांचे शेकडो कार्यकर्ते सक्रिय होते. अनेक जणांना ‘कोविड’ची लागण झाली होती. या कामात कार्यकर्त्यांशिवाय अनेक संस्थांनीही हातभार लावला. त्यात डॉ. विजय पंडित यांची संस्था, माहेश्वरी युवक संघटनेचे दिनेश सोमणी, राजू गवळी यांनी खूप मदत केली. मोहने मंडलाचे अध्यक्ष सुभाष पाटील, छत्रपती शिक्षण मंडळ, जनता सहकारी बँक, विश्व हिंदू परिषद, मेडिकल असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, डायमंड रोटरी क्लब कल्याण, सॅटरडे क्लब, जायंट्स क्लब कल्याण, बाजारपेठ मित्रमंडळ, भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारातील अनेक संस्था, व्यक्तींनी या कार्यात पवार यांनी सक्रियपणे मदत करीत मोलाची साथ दिली.
कोरोनाकाळात मजुरांनी पायी जात आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मनाला खूप वेदना झाल्या. त्यांच्या पायाला चालून चालून फोड आले होते. मजूर तरीही आपल्या लहान मुलांना घेऊन प्रवास करीत होते. पवार यांचा एक कार्यकर्ता अनंता पाटील यांचे संपूर्ण कुटुंबीय कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले होते. अनंताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या काळात त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. अनंताला रुग्णालयात असताना आईवडिलांच्या मृत्यूची बातमी सांगितली नाही. रुग्णालयातून घरी आल्यावर ही गोष्ट सांगितली. असा मन हेलावून टाकणारा प्रसंग पवार सांगतात. पवार यांना हे काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अन्नधान्य, गोळ्या हे सर्व वाटप कार्यक्रमात कार्यकर्ते कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने घाबरत होते, त्यामुळे त्यांचे प्रबोधन केले. महापालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्याचे काम रा. स्व. संघाने केले, त्यामध्ये त्यांना मदत केली. अन्नधान्य पॅकिंग करण्यासाठीही पवार यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. पवार यांच्या कार्याला समाजातील गरजूंनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या कामाचे कौतुकही केले.

- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@