संकटकाळात मदत हे आमचे ब्रीद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

amar shah_1  H



संकटकाळात संस्थेचे काम आणि माणसातली माणुसकी, याचा प्रत्यय येत असतो. कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाने प्रत्येक जण हादरून गेला असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लोकसेवेला वाहून घेतले. या संकटकाळात त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यापैकीच एक म्हणजे भाजयुमो, उत्तर मुंबईचे अध्यक्ष अमर शहा. तेव्हा, त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...

अमर शहा
राजकीय पक्ष :भाजप
पद : अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर मुंबई
कार्यक्षेत्र : उत्तर मुंबई (मालाड ते दहिसर)
संपर्क क्र. : ८३२३४८४२३४



‘लॉकडाऊन’च्या काळात पहिलाच प्रश्न निर्माण झाला तो रोजंदारीवर काम करून जे आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होते त्यांचा. कारण, त्यांच्या जेवणाचे वांदे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीमार्फत सकाळी दोन हजार पॅकेट आणि संध्याकाळी दोन हजार पॅकेट पुरवायला सुरुवात केली. नंतर यात वाढ झाली. ‘लॉकडाऊन’मुळे ज्या लोकांना फटका बसला, असे लोक हुडकून काढून त्यांच्यासाठी काम करणे भाग होते. दिवसभर काबाडकष्ट करून कमविणारे डबेवाले, कुली यांच्यावर ‘लॉकडाऊन’चा मोठा परिणाम झाला. मेहनतीने कमविणारे हे लोक मागून खाणारे नव्हते. अन्नासाठी हात पसरणे त्यांच्या तत्त्वात बसणारे नव्हते. अशा लोकांना शोधून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. बोरिवली आणि दहिसर विभागात तृतीयपंथीयांची वस्ती आहे. सुमारे १२५ पर्यंत त्यांची संख्या आहे. त्यांना शोधून मास्क, सॅनिटायझर, ‘आर्सेनिक अल्बम-३०’ आणि दोन वेळचे जेवण शहा यांच्याकडून पुरविण्यात आले.

लहान मुलांची काळजी

एखादे कुटुंब ‘क्वारंटाईन’ झाले, तर त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलांची आबाळ व्हायची. त्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, म्हणून त्यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने चारकोप आणि दहिसर ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये भारतीय जनता युवा मोर्चातर्फे लहान मुलांसाठी सकाळ-संध्याकाळी दूध आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात आला.


पंडित-पुजार्‍यांनाही साह्य

कोरोनाकाळात मंदिरे बंद, धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने पंडित-पुजार्‍यांचीही उपासमार होऊ लागली. त्यांना तयार अन्न देऊन भागण्यातले नव्हते. त्यांना शहा यांनी धान्याचे किट पुरविले.

अंध-अपंगांची सेवा

‘इंडियाज ब्लाईंड असोसिएशन’ची २० कुटुंबे मालाड-दहिसर परिसरात राहतात. त्यांचे नातेवाईक येथे कोणीही नाहीत. कोरोनाकाळात ते निराधार झाले. त्यांच्याशी शहा यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनाही अत्यावश्यक वस्तूंसह ६० दिवसांचे धान्य पुरविण्यात आले. बोरिवली-दहिसरमध्ये अपंग लोक राहतात. त्यांची असोसिएशन आहे. सायकलवरून फेरीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करायचे. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांची उपासमार होऊ लागली. त्यांच्यासाठी शहा यांनी दोन वेळचे जेवण आणि धान्याचे किट पुरविले.


औषधेही घरपोच

कोरोनाकाळात ‘रेमिडिसीवर’ आणि ‘टेविंझिंदाल’ ही इंजेक्शन उपयोगी पडायची. पण, ती मिळायची नाहीत. आजारच मोठा असल्याने त्यापासून बचावासाठी लोकांची इंजेक्शन खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडायची. इंजेक्शन कुठे मिळतात, याबाबत शहा यांचे कार्यकर्ते सोर्सिंग करून ठेवायचे. तसेच कोरोनाकाळात शहा यांनी दहा हजार सॅनिटायझरच्या बाटल्यांचे वितरण केले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सॅनिटायझर वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.


पोलीस बांधवांनाही मदत

उत्तर मुंबईत झोन ११ आणि झोन १२ मध्ये जेवढी पोलीस ठाणी आहेत, त्या सर्व ठिकाणी शहा यांनी आयुष काढा, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज, फेसशिल्ड, फेस मास्क यांचे वाटप केले. शिवाय, अतिरिक्त पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयातही कोरोनापासून संरक्षणार्थ साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबईत ठरावीक ठिकाणी नाकाबंदी होती. एप्रिल ते जून महिन्यांतील तापदायक उकाड्याने पोलीस हैराण व्हायचे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोड येथे नाकाबंदीसाठी असलेल्या पोलिसांकरिता शहा यांचे कार्यकर्ते मोटारसायकलने जाऊन इलेक्ट्रॉल पावडरची पाकिटे, सरबतच्या आणि पाण्याच्या बाटल्या पुरवायचे.


समाजसेवा हे एक व्रत आहे. त्याची सुरुवात स्वतःच्या परिवारापासून झाली पाहिजे. पं. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांची गरिबातल्या गरीब माणसापर्यंत मदत करण्याची शिकवण होती. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झालो आणि आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यातून आपण या समाजाचा घटक आहोत आणि देशासाठी काही तरी केले पाहिजे, अशी प्रेरणा मिळाली.


श्रमिकांना अन्नपाणी

पहिल्या ‘लॉकडाऊन’ची मुदत संपताना जेव्हा दुसरा ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला, तेव्हा श्रमिकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. साहजिकच होते ते. कारण, कोरोना कधी जाईल आणि ‘लॉकडाऊन’ कधी उठेल, याची शाश्वती नव्हती. सुरुवातीचे २१ दिवस कसेतरी लोटले. पण, ‘पुढे काय?’ हा प्रश्न प्रत्येकापुढे होता. एकटे असणार्‍यांपेक्षा सहकुटुंब राहणार्‍या श्रमिकांची अवस्था तर फारच बिकट होती. रोजच्या कमाईवर संसार चालत असल्याकारणाने खायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. त्यामुळेच त्यांना त्यांच्या गावाची ओढ लागली. त्यातूनच १४ एप्रिल, २०२० रोजी श्रमिकांची वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याचे सर्वांना आठवत असेलच. असे मजूर मिळेल त्या वाहनाने, तर अनेक जण मुलाबाळांसह चालत त्यांच्या गावाकडे निघाले. रस्ता माहीत नाही, कधी पोहोचणार माहीत नाही, खिशात पैसे नाही. पण, इथे बेवारस मरण्यापेक्षा आपल्या पोहोचण्याची आस त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून कसलाही विचार न करता ते आपल्या गावाकडे निघाले. मदतीला मानव रूपातील देव धावून येईल, हा विश्वास होता. त्या भरवशावरच ते घराबाहेर पडले. त्यांना प्रवासात लागणारे खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या पुरविल्या. दहिसर चेकनाक्यावर शहा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्प लावला होता. तेथे पाण्याच्या बाटल्यांबरोबर इलेक्ट्रॉल पावडरचे पॅकेटही देण्यात आले.

बिहारच्या खासदारांकडून दखल

शहा सांगतात की, “बिहारचे ७०-८० जण येथे अडकले होते. खासदार राधामोहन सिंह यांचा त्यांना मदत करण्याविषयीचा दूरध्वनी आला. आमच्याकडून मदतीचा ओघ सुरुच होता. त्या मदतीची माहिती बिहारपर्यंत पोहोचली होती. मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना अन्नपाणी दिले. शिवाय, त्यावेळी डॉक्टरचे सर्टिफिकेट लागायचे. त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फॉर्म भरून दिले आणि त्यांना एकही पैसे न घेता डॉक्टरचे सर्टिफिकेट मिळवून दिले आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.”

पोलिसांना साहाय्य

श्रमिक ट्रेनने जाणार्‍या मजुरांसाठी त्यावेळी ई-पास आवश्यक होता. त्यासाठी पोलीस ठाण्यात फॉर्म भरून द्यावा लागत असे. ‘लॉकडाऊन’च्या बंदोबस्तावर पोलीस असल्याने अशा कामांसाठी मनुष्यबळ कमी पडायचे. त्यामुळे श्रमिकांची आणि बाहेर जाणार्‍या इतर लोकांची गैरसोय होऊ नये, त्यांना वेळेत पास मिळावा यासाठी बोरिवली आणि दहिसर पोलीस ठाण्यात अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या कामासाठी (फॉर्म भरण्यासाठी) उत्तर मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाने कार्यकर्ते दिले. श्रमिकांना फॉर्म भरून दिले. शिवाय, जे मजूर रात्रभर रांगेत असायचे त्यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि जेवण आणि पाणीही पुरविले.



यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाबरोबरच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे विराधी पक्षनेते प्रवीणभाऊ दरेकर, दहिसरच्या आमदार मनीषाताई चौधरी, बोरिवलीचे आमदार सुनील राणे, कांदिवली (पूर्व)चे आमदार अतुल भातखळकर, चारकोपचे आमदार योगेश सागर, विधान परिषदेचे आमदार भाई गिरकर आणि नगरसेवक यांचा मोलाचा सहभाग लाभला. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकलो, असे ते म्हणतात. ‘लॉकडाऊन’ काळात भारतीय जनता युवा मोर्चामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात आले. शहा सांगतात की, “संकटे सांगून येत नसतात, ती अचानक येत असतात. अशा वेळी अडल्यानडल्यांच्या मदतीसाठी धावून जाणे, ही आमच्या पक्षाची आणि पक्षनेतृत्वाची शिकवण आहे. शेवटी हा भारतीय जनतेचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत. जनतेसाठी धावून जाणे हे आमच्या पक्षाचे ब्रीद आहे.”


- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@