गरजूंसाठी ‘कृष्णाश्रय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
Krushna Patil _2 &nb

 
 
 
आजच्या युगात यावी, असं काम कृष्णा पाटील आणि नंदा पाटील या ठाण्यातील नगरसेवक दाम्पत्याने कोरोना कालावधीत केले आहे. प्रभागात आरोग्य शिबिरांचा रतीब घालून समाजातील विविध स्तरांतील गरजूंसाठी हे दाम्पत्य सरसावल्याचे दिसून आले. ‘कोविड योद्धा’ ठरलेल्या या दाम्पत्याच्या दातृत्वाचा हा छोटेखानी आलेख.
 
 
 
 
नाव : कृष्णा दादू पाटील
पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : नगरसेवक, ठाणे महानगरपालिका
कार्यक्षेत्र : खोपट, गोकुळनगर ठाणे (प)
प्रभाग क्र. : ११
संपर्क क्र. : ९८२१०८४९४९
 
 
 
‘कोविड-१९’चा प्रादुर्भाव वाढत असल्याचा धोका ओळखून दि. २२ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभी संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यू’ लागू केला. त्यानंतर २४ मार्चपासून पुन्हा पूर्णतः ‘लॉकडाऊन’ची घोषणा करताच देश स्तब्ध झाला. संपूर्ण जनजीवन घराच्या चार भिंतींच्या आत बंद झाले. तेव्हा, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, समाजसेवेचा वसा हाती घेत गरीब, मजूर, कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहात भाजपचे ठाणे महापालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य कृष्णा दादू पाटील व नगरसेविका नंदा कृष्णा पाटील हे दाम्पत्य माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी सज्ज झाले.
 
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्र. ११ मधील खोपट, गोकुळदासवाडी, कोलबाड, प्रताप सिनेमा, विकास कॉम्प्लेक्स, कॅसलमिल, श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी आदी परिसरांत प्राथमिक उपाययोजना म्हणून ठामपाच्या अत्याधुनिक यंत्रणांमार्फत विषाणुनाशक औषध फवारणी केली. त्याचबरोबर गोकुळनगर, आझाद नगर भागामध्ये व्हिन्सेन्स मशीनद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. कृष्णा पाटील यांनी हा रतीब आजतागायत कायम ठेवला असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास एकप्रकारे मदतच झाली.
 
 
 
प्रभाग क्र. ११ मध्येच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे खोपट एसटी बस आगार आहे. बघता बघता कोरोनाचा प्रादुर्भाव बस आगारात झाल्याने येथे कार्यरत एसटी कर्मचारी धास्तावले. याची माहिती मिळताच कृष्णा पाटील दाम्पत्याने क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि संपूर्ण एसटी बस आगारात जंतुनाशक औषध फवारणी करून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात संचारबंदी असल्याने अन्नधान्य, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंची आबाळ होऊन गृहिणींचे बजेट कोलमडून पडले. ही बाब लक्षात घेऊन कृष्णा व पत्नी नंदा पाटील दाम्पत्याने आपल्या प्रभागासोबतच समस्त ठाणेकरांसाठी थेट नाशिकच्या शेतकर्‍यांकडून मागवलेला भाजीपाला स्वस्त दरात थेट दारात उपलब्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारून व्यवस्था केली.
 
 
 
 
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत होते. या ‘कोरोना योद्ध्यां’चा ५० लाखांचा विमा काढावा, यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत ठराव मांडून, मंजूरदेखील करून घेतल्याने या दुर्लक्षित कोरोना लढवय्यांना जोमाने काम करण्याची उमेद कृष्णा पाटील यांच्यामुळे उपलब्ध झाली. हॉटेलमधील कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना चार महिने चहा, नाश्ता व भोजनाची विनामूल्य व्यवस्था केली. तसेच, आजवर ४००च्या आसपास रुग्णांना रुग्णवाहिका व बेड उपलब्ध करून दिले.
 
 
 
 
‘लॉकडाऊन’ काळात सर्वसामान्य जनता हतबल झाली होती. या नागरिकांना मदतीचा हात म्हणून कार्डधारकांसह ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशानाही महिनाभर पुरेल इतक्या धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. इतकेच नव्हे तर शहरातील तृतीयपंथीयांना कृष्णा व नंदा पाटील यांच्याकडून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील धर्माचा पाडा, तुरफा पाडा, चिमाचा पाडा, आमराईनगर या भागातील हातावर पोट असणार्‍या गोरगरिबांना अन्नधान्याचे किट वाटले. मजुरांना त्याच्या मुळगावी जाण्यासाठी लागणारा ई-पास व मेडिकल सर्टिफिकेट स्थानिक डॉक्टर व पोलिसांच्या मदतीने राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करुन १० हजार मजुरांना पास मिळवून देण्यास मदत केली. शहरातील १०० वृत्तपत्र विक्रेत्यांना मोफत अन्नधान्याचे वाटप केले. पंतप्रधान पथविक्रेता ‘आत्मनिर्भर योजने’च्या नोंदणी अभियानात प्रभागातील २१२ पथविक्रेत्यांना लाभ मिळण्यासाठी सहकार्य केले.




Krushna Patil _1 &nb
 
 
 
“पूजनीय वडील दादू पाटील आनंद दिघेंचे कट्टर समर्थक होते. त्यांचा आदर्श मानून २००६ साली मी समाजकारणात आलो. २००७ साली आई शारदा पाटील ठाणे महापालिकेच्या नगरसेविका बनल्याने राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून भाजपची कास धरली. ठाणेकरांच्या अलोट प्रेमाची पावती म्हणजे आम्ही दोघेही पती-पत्नी आज नगरसेवक म्हणून कार्यरत आहोत.”
आयुष मंत्रालयाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक औषध ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधी गोळयांचे वाटप करण्याचे सुचवताच पाटील दाम्पत्याने आपल्या संपूर्ण प्रभागातील झोपडपट्टी तसेच सोसायट्यांमधील घराघरात स्वखर्चाने तब्बल २५ हजार बाटल्या मोफत वाटल्या.
 
 
 
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असल्यामुळे दवाखाने बंद होते. त्यामुळे, प्रभागातील रुग्णांची हेळसांड होऊन त्रास सहन करावा लागत होता. याची जाणीव होताच कृष्णा पाटील यांनी परिसरातील दवाखान्यांच्या डॉक्टरना पीपीई किट देऊन सुरक्षेची काळजी घेत रुग्णांना अविरत सेवा देण्यास मदत केली. ऐन पावसाळ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दर महिना प्रभागात घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली. कोरोना कालावधीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रभागातील नालेसफाईची, गटारांची आणि सार्वजनिक शौचालये व मलनिस्सारणवाहिन्यांची सफाई मोहीम राबवली. याच धामधुमीत प्रभागातील एक इमारत धोकादायक झाली.
 
 
 
भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठामपा अधिकारी-कर्मचार्‍यांसह पोलिसांच्या मदतीने या इमारतीतील रहिवाशांना तत्काळ महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले. कोरोनाची बाधा झालेला रुग्ण उपचार घेऊन १५ दिवसांनी घरी परतल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी त्या रुग्णाच्या आजूबाजूच्या घरातील नागरिकांना विलगीकरण कक्षात घेऊन जाण्यास येत. ज्याला कोरोना झाला, तो रुग्ण उपचार घेऊन घरी परतला असतानाही शेजार्‍यांना ‘क्वारंटाईन’ करण्याचा अट्टाहास करणार्‍या अधिकार्‍यांना, स्थानिक नगरसेवक म्हणून कृष्णा पाटील यांनी धारेवर धरताच, महापालिकेचे पथक रिकाम्या हाती परत गेले.
 
 
 
पंतप्रधानांच्या अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी ‘एक दिवा आपल्या दारी’ या आवाहनानुसार, कोरोनाच्या दहशतीदेखील प्रभागात दिव्यांची रोषणाई करून नकारात्मकतेला त्यांनी नष्ट केले. कोविडच्या संसर्गाबाबत ठाणे शहरासह जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत पाटील दाम्पत्याने कोविड व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयामधील मृतदेह अदलाबदली व रुग्णालय व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या, भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनाकडे आवाज उठवण्यासह आ. डावखरेंसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.


- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@