‘भरत’ एक लढवय्या कोरोनावीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Abhimanyu _2  H
 
 
 
 
स्थानिकांसह परप्रांतीय स्थलांतरित मजुरांसाठी सदैव मदतीचा हात देणारे भाजप नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक आणि ‘न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघा’चे संस्थापक व ‘तारामाउली सामाजिक सेवा संस्थे’चे संस्थापक भरत अभिमन्यू चव्हाण यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, होमियोपॅथिक औषध वितरणाची मदत केली. ‘कोविड’ काळात भरत चव्हाण यांनी केलेल्या या मदतकार्याचा हा सविस्तर आढावा...
 
 
नाव : भरत अभिमन्यू चव्हाण
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : नगरसेवक, ठाणे महानगरपालिका
कार्यक्षेत्र : कोपरी, ठाणे (पू)
प्रभाग क्रमांक : २० ड
संपर्क क्रमांक : ९८६७२६५३६५
 
 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ‘लॉकडाऊन’चा फटका देशातील किंबहुना, राज्यातील गोरगरिबांसह गरजू, कामगार, रोजंदारीवर काम करणारे पुरुष व महिला भगिनी, तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना बसला. या घटकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, या समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने धाव घेणार्‍या नगरसेवक भरत चव्हाण यांनी मदतीचा हात पुढे केला. यात त्यांना कार्यकर्त्यांची चांगली साथ लाभली. सुरुवातीला गरजवंतांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे ठरवून त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली.
 
 
जेणेकरून कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये. मागेल त्या प्रत्येक गरजूला मदत करण्याचे निश्चित केल्याने नगरसेवक चव्हाण यांच्या सहकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी हे आव्हान पेलण्याचा निर्धार केला. त्यानुसार, भरत चव्हाण यांच्या ‘तारामाउली सामाजिक सेवा संस्थे’सह इतर सहकार्‍यांनीही मदतीचा ओघ सुरू केला. ‘लॉकडाऊन’ काळात नगरसेवक चव्हाण यांनी तब्बल सात ते आठ हजार कुटुंबांना शिधावाटप किटचे वाटप केले. तसेच, संपूर्ण कोपरी प्रभागात नगरसेवक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसमवेत मदत पोहोचविण्याची दक्षता घेतली.
 
 
कोरोनाकाळात मदत केलेल्यांमध्ये बहुतांश जण हातावर पोट असणारे, भाजीविक्रेते बांधव, मोलमजुरी करणारे, वृत्तपत्र विक्रेते, प्रसारमाध्यमातील गरजू, ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आदींसह झोपडपट्टीतील गरीब नागरिकांचा समावेश आहे. रेशन किटचे वाटप करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी फळांचे वाटप, तसेच ‘कोविड’ व ‘नॉनकोविड’ रुग्णालयातील रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचार्‍यांनाही फळेवाटप करण्यात आले. हे करताना रुग्णालयांमध्ये जीव धोक्यात घालून काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना घरी जाता येत नव्हते. तेव्हा, माणुसकीचा विचार करून या ‘कोविड योद्ध्यां’च्या दोन वेळच्या भोजनाची सतत दोन महिने भरत चव्हाण यांनी स्वखर्चाने व्यवस्था केली. यामुळे या ‘कोविडवीरां’च्या पाठीमागे एक ‘कोविड योद्धा’ उभा ठाकल्याचे चित्र दिसून आले.
 
 
अन्नधान्य व रेशन किटचे विनामूल्य वितरण करण्यासोबतच २५० गृहनिर्माण सोसायट्यांना स्वस्त दरात भाजीपाला व फळे वितरणाचे कामही भरत चव्हाण यांनी केले. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे म्हणून ठाणेकरांच्या सोईसाठी पुढाकार घेत भाजीविक्रेत्यांना जगतगुरू तुकाराम महाराज क्रीडांगणात भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करून दिली. सोबतच रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजाविणार्‍या वाहतूक पोलीस व कोपरी पोलिसांना नियमित चहा, नाश्ता व बिस्किटे वाटप केले. तसेच सॅनिटायझर मशीनदेखील देण्यात आली.
 
 

Abhimanyu _1  H
 
 
 
“दोन दशकांपूर्वी भाजीमार्केटच्या माध्यमातून समाजसेवेची कास धरून मी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून ठाणे मनपा परिवहन सेवेत सदस्यपदी नियुक्त झाल्यानंतर नगरसेवक म्हणून निवड झाली. २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून सलग तिसर्‍यांदा निवडून आल्यानंतर आजतागायत सामाजिक जाणिवा जपत समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिले. कोरोनाकाळात तर कोरोनाची लागण होऊनदेखील सर्व आघाड्यांवर आजही कार्यरत आहेत.“
 
 
कोरोना विरोधात लढण्यासाठी साडे चार हजार मास्क आणि बँक कर्मचार्‍यांना फेसशिल्ड, डॉक्टर व नाभिक बांधवांना मोफत ‘पीपीई किट’चे वाटपदेखील नगरसेवक भरत चव्हाण यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहावी, यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांच्या तब्बल सात हजार बाटल्यांचे मोफत वितरण करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रत्येकाच्याच मनात कोरोनाविषयी अनामिक भीती निर्माण झाली. कोरोनाची ही भीती घालविण्यासाठी भरत चव्हाण यांनी ठाणे महापालिका, तसेच आरोग्य यंत्रणेच्या मदतीने संपूर्ण कोपरी परिसरात पाच ते सहा आरोग्य शिबिरे भरवून कोरोना संशयितांच्या आरोग्याची चिंता वाहिली.
 
 
 
परिसरातील दुकाने, व्यापारी आस्थापने आदींना सॅनिटायझर पाऊचचे मोफत वाटप केले. यासोबतच ठाणे पूर्व रेल्वे स्थानकात मोफत अ‍ॅन्टिजेन तपासणी केंद्र सुरू करून परराज्यातून येणार्‍या नागरिकांसाठी मदतीचा हात दिला. त्याचप्रमाणे ऐन पावसाळ्यात परिसर स्वच्छ राहावा आणि कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता वारंवार जंतुनाशक फवारणी करून घेतली. हा आरोग्यदायी शिरस्ता आजतागायत कायम ठेवला असल्याने ‘कोविडमुक्त कोपरी’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप आल्याचे भरत चव्हाण यांनी सांगितले.
 
‘कोविड’काळात शाळा-महाविद्यालये बंद असतानाही पालकांकडे फी वसुलीसाठी तगादा लावणार्‍या शैक्षणिक संस्थांना शुल्क कमी करण्याबाबत भरत चव्हाण यांनी पत्रव्यवहार करून दिलासा दिला. आबालवृद्धांच्या मदतीसाठी धावून जात असताना भरत चव्हाण स्वतः कोरोनाबाधित झाले, तरीही न डगमगता त्यांनी रुग्णालयातूनही मदतकार्य सुरूच ठेवले. या काळात त्यांना त्यांचे सहकारी अ‍ॅड. अनिल निळे, विजय वैष्णव, मच्छींद्र कर्डिले, राहुल तमाचिकर, संजय लाड, अजय कचरे, वेल्लम राजू, मंदार पाटोळे, वरद कोळी, सतीश माळी, किशोर चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
 
‘कोविड’च्या काळात पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता भरत चव्हाण यांनी आपले सहा महिन्यांचे नगरसेवक मानधन दिले. तसेच आई तारामाउली हिच्या स्मरणार्थ सुरू केलेली रुग्णवाहिका संपूर्ण ‘कोविड’ कालावधीत २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. कोपरीतील भाजीविक्रेत्यांची एकजूट करून ‘न्यू गावदेवी भाजी मार्केट’ची स्थापना, तसेच भाजीमार्केटमध्ये वाचनालय व ‘तारामाउली पतसंस्था’ सुरू केली. ‘तारामाउली सेवा संस्थे’च्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. ‘कोविड’विषयक त्रिसूत्रीचा अवलंब करतानाच कोरोनाबाधितांचा योग्य सन्मान राखण्याचेही आवाहन भरत चव्हाण यांनी केले आहे.

 
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@