तैवानने ललकारले चीनला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Taiwan_1  H x W
तैवान अमेरिकेसह भारत, जपान व ऑस्ट्रेलियाकडेही आशेनेच पाहत असल्याचे स्पष्ट होते. फक्त जग त्याला प्रतिसाद कसा देते, हे लवकरच समजेल. मात्र, हे होत असतानाच तैवानने आमच्या मदतीला कोणी आले नाही, तरी आम्ही चीनविरोधात लढण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला टक्कर दिल्यास, त्याला धुळीस मिळवण्यास तयार असल्याचे आपल्या कृतीतून, ललकारातून दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
“हिंमत असेल तर आमच्यावर वार करुनच दाखवा, आम्ही स्वागतासाठी तयार आहोत,” असे आव्हान तैवानने चीनला दिले. मागील कित्येक दशके आणि नजीकच्या काळात घडलेल्या घडामोडींवरुन तैवान आणि चीनमधील संबंध कमालीचे तापल्याचे दिसते. तथापि, आकार चिमुकला असूनही तैवानने सध्या तरी चीनला शिंगावर घेण्याची तयारी पूर्ण केल्याचे म्हणता येते. कारण, कोरोना विषाणूच्या उद्भवावरुन तैवानने प्रथमपासूनच चीनला घेरण्याचे काम केले. तैवानच्या या भूमिकेने मात्र, चीनचा संताप झाला नि त्याने जोर-जबरदस्ती, दडपशाहीचे धोरण अवलंबले. तैवानच्या सागरी व हवाई क्षेत्रात चीनने कित्येकदा घुसखोरीचे प्रयत्न केले. हेरगिरी जहाजांपासून ते लढावू विमानांनी घिरट्या घालून तैवानला घाबरवण्याचे उद्योग चीनने केले. तथापि, चीनने घुसखोरीचे, भीती दाखवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी तैवानने अतिशय निधडेपणाने त्याचा सामना केला व सार्‍याच कारवाया निष्फळ केल्या, चिनी मनसुब्यांची पोलखोल केली.
 
 
नुकतीच बदलते जग व चीनकडून सातत्याने होत असलेल्या दमनाच्या पार्श्वभूमीवर तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी ‘द गार्डियन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत वू यांनी चीनविरोधातील आपली आक्रमकता तर दाखवलीच, पण संपूर्ण जगानेही एकत्रित आघाडी उघडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या व समोर आलेल्या माहितीवरुन तरी जो बायडन अध्यक्षपदी येणार असे दिसते, तर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका, निर्णय घेतले, कारवाई केली व त्या देशाला अद्दल घडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातूनच तैवानला शस्त्रास्त्र विक्री करण्याच्या धोरणालाही अमेरिकेने मंजुरी दिली. पण या सगळ्यात अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाऐवजी डेमोक्रेटिक पक्ष सत्तेवर येण्याचे स्पष्ट झाले व भावी अध्यक्ष चीनविरोधात सौम्य वर्तन ठेवतील, असे कयास लावले गेले. पण तैवानी परराष्ट्रमंत्र्यांची विधाने पाहता ते, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प असो वा नसो किंवा जो बायडन अध्यक्षपदी येवो, आम्ही मात्र कोणतेही आक्रमण परतवून लावण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण तयारी केल्याचेच सांगताना दिसतात.
 
दरम्यान, दक्षिण चीन समुद्रातील हद्दीचा, कृत्रिम बेट निर्मितीचा, मासेमारी किंवा खन्यकर्माचा मुद्दा असो वा, भारताबरोबरील लडाख सीमेवरील गुंडगिरी असो वा हाँगकाँगमधील जनतेच्या हक्क, अधिकार, स्वातंत्र्याचे दमन असो या सर्वच घडामोडी चीन आपल्या साम्राज्यवादी, विस्तारवादी महत्त्वाकांक्षेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हेच दाखवून देतात आणि याच मालिकेअंतर्गत तैवान हे चीनचे पुढचे लक्ष्य आहे, तैवानला हडपण्याचे चीनचे स्वप्न आहे. गेल्या काही वर्षांतील चीनची तयारी पाहिल्यास तो तैवानवर हल्ला करण्यासाठी सज्ज असल्याचे व योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे, तसेच त्या दिशेने पावले उचलत असल्याचे दिसून आले. जोसेफ वू यांनी चीनच्या याच इतरांची भूमी बळकावण्याच्या, कब्जा करण्याच्या, ताब्यात घेण्याच्या कारस्थानाची माहिती दिली व त्यापासून केवळ तैवानलाच नव्हे तर शेजारच्या सर्वांनाच व जगालाही धोका असल्याचा इशारा दिला. तो नक्कीच गांभीर्याने घ्यावा असाच. कारण, रक्ताला चटावलेल्या श्वापदाला भूक भागवण्यासाठी त्याशिवाय अन्य काहीही नको असते. चीनचेही तसेच होऊ शकते व त्याआधीच त्याला वेसण घालणे सर्व मानवजातीचे कर्तव्य ठरते.
 
चीनने तैवानवर आक्रमण केले व त्यात तैवानचा पराभव झाला तर काय होऊ शकते? या मुद्द्यावरही जोसेफ वू यांनी आपले मत व्यक्त केले. असे झाल्यास चीनचा दक्षिण चीन समुद्रासह प्रशांत महासागरात दबदबा वाढेल. सोबतच त्यानंतर चीन हिंदी महासागरावरही आपले एकहाती वर्चस्व गाजवण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करणार, हे निश्चित. कारण, चीनची साम्राज्यलालसा अफाट आहे नि तो फक्त समोरच्याचा घास गिळण्याचेच ध्येय बाळगतो. मात्र, यामुळे अमेरिका, युरोप, जपान व ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारतासमोरही बिकट परिस्थिती निर्माण होईल. तसेच सध्याच्या जागतिक व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी चीनला त्यातून प्रोत्साहन मिळेल. आताच चीन वन बेल्ट वन रोड, प्रचंड वस्तूनिर्मिती व निर्यात आणि कर्ज-मदतीचे जाळे या माध्यमातून जगाच्या राजकारणात, अर्थकारणात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. त्यातच त्याच्या मनात विजयाचा अहंगंड निर्माण झाला तर चीन आपल्या जगावर राज्य करण्याच्या माओपासूनच्या इराद्याला प्रत्यक्षात आणू शकेल. अर्थातच ते व्हावे, हे तैवानच काय कोणालाही वाटणार नाही व यासाठीच तो देश आक्रमक भूमिका घेताना दिसतो. मात्र, एकट्या तैवानचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत व याची जाणीव तैवानलाही आहेच. म्हणूनच चीनविरोधातील एखाद्या जागतिक कराराचा आपण भाग व्हावे, असे तैवानला वाटते व जोसेफ वू यांनी तसे संकेतही दिले.
 
“जे कोणी चिनी साम्राज्यवादाने त्रासलेले, पिडलेले आहेत, ते या देशाशी आर्थिक संबंध ठेवून आपला नेमका काय फायदा झाला, हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारतील. मला विश्वास वाटतो की, जपान, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलियासह युरोपातील कित्येक देशदेखील आता चीनशी निराळ्या पद्धतीने वागण्याची वेळ आली आहे, असा विचार करत असतील,” असे वू म्हणाले. सोबतच, “या सगळ्याची निश्चितच सर्वांनाच किंमत मोजावी लागेल, जशी ऑस्ट्रेलियाने चुकवली. चीनने ऑस्ट्रेलियाच्या कोळशावर निर्बंध घातले व त्या देशाच्या दारु-विशेषत्वाने वाईनवरील कर शुल्कात वाढ केली. मात्र, अशा परिस्थितीतच परस्परांतील आंतरराष्ट्रीय संबंधांची अधिक आवश्यकता आहे. कारण एकट्याने लढून काही फायदा नाही,” असेही जोसेफ वू म्हणाले. अर्थात तैवानसारख्या देशाने इतरांनी आपल्या मदतीला यावे, अशी अपेक्षा करण्यात काहीही गैर नाही. उलट तैवान अमेरिकेसह भारत, जपान व ऑस्ट्रेलियाकडेही आशेनेच पाहत असल्याचे यातून स्पष्ट होते. फक्त जग त्याला प्रतिसाद कसा देते, हे लवकरच समजून येईल. मात्र, हे होत असतानाच तैवानने आमच्या मदतीला अन्य कोणी आले नाही, तरीही आम्ही चीनविरोधात लढण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला टक्कर दिल्यास, त्याला धुळीस मिळवण्यास तयार असल्याचेही आपल्या कृतीतून, ललकारातून दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@