व्यर्थ मरणे नको, यशस्वी जगणे हवे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Vedamrut_1  H x
 
 
 
 
आयुष्यायुष्कृतां जीवायुष्मान् जीव मा मृथा।
प्राणेनात्मन्वतां जीव मा मृत्योरुदगा वशम्॥
 
(अथर्ववेद- १९.२७.८)
अन्वयार्थ
 
हे मानवा! तू (आयु : कृतां) आयुष्याचे निर्माण करणाऱ्या थोर महामानवांच्या (आयुष्या) आयुष्याकडे पाहत, त्यांच्याकडून प्रेरणा घेत (जीव) जीवन जग. (आयुष्मान्) उत्तम आयुष्याचा बनत (जीव) यशस्वीपणे जग. तू (मा मृथा:) व्यर्थ मरू नकोस! (आत्मन्वतां) जे आत्मशक्तीने परिपूर्ण झाले आहेत, अशांच्या (प्राणेन) जीवन सामर्थ्याची संयुक्त होत (जीव) जग! (मृत्यो:) मृत्यूच्या (वशम्) वशीभूत (मा उत् अगा:) अजिबात होऊ नकोस.
 
विवेचन
 
मानव हा बुद्धिमान प्राणी समजला जातो. बुद्धीच्या बळावर तो मोठमोठी कामे करू शकतो. मग ती चांगली असोत की वाईट! ज्याची बुद्धी सन्मार्गाने कार्यरत असते, त्याकडून श्रेष्ठ कामे घडतात. पण ज्याची बुद्धी वाईट दिशेने वाटचाल करते, त्याच्याकडून मात्र अनिष्ट व विनाशकारी कामे होतात. बुद्धीचा वापर कोणत्या प्रकारे व कशा तर्‍हेने करायचा? हे मात्र मानवाच्या हाती आहे. यासाठीच तर त्याने विवेकशील व्हावयास हवे. परमेश्वराने त्याला हेे सोनेरी आयुष्य प्रदान केले आहे. या अमूल्य अशा आयुष्याच्या माध्यमाने त्याने जीवनभर यशस्वी व गौरवशाली कामे करावीत. कारण उत्कृष्ट आयुष्याच्या माध्यमानेच तो फार मोठे ऐतिहासिक कार्य करून जगाच्या इतिहासात अजरामर होतो.
 
वरील वेदमंत्र माणसाला उत्साहाने जगण्याची आणि यशवंत होण्याची प्रेरणा देतो. मानव जीवन हे कर्म व भोग या दोन्हींकरिता बनले आहे. या जगात त्याला कर्मही करायचे आणि भोगही भोगायचे आहे. म्हणूनच शास्त्रात म्हटले आहे -भोगावपवर्गार्थं दृश्यम्! या जगात येण्याचा उद्देश भोग आणि अपवर्ग असा दोन्ही आहे. यासाठी माणसात तशा प्रकारची योग्यता व पात्रतादेखील हवी. प्रयत्न व पुरुषार्थाने तो अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो. त्यादृष्टीने हा वेदमंत्र माणसाला जगण्यासाठी नवी उभारी देणारा आहे. यातील पहिला उपदेश आहे -
 
आयुष्कृताम् आयुषा जीव!
 
ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनाची निर्मिती केली आहे, अशा थोरामोठ्यांच्या आयुष्याकडे पाहत तू जीवन जग. भारताचा प्राचीन काळ व नंतरचा इतिहास जाज्वल्य स्वरूपाचा आहे. असंख्य सत्पुरुषांनी, क्रांतिकारकांनी व साधु-संतांनी आपल्या जीवनाचे सोने केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी नवा इतिहास घडविला. ते केवळ स्वतःपुरते जगले नाहीत, तर समाज, देश व राष्ट्राकरिता त्यांनी आपले आयुष्य वेचले. म्हणूनच ते अजरामर ठरले. त्यांनी आपल्या आयुष्याला महान बनविले. यासाठीच त्यांचे अनुकरण करणे आपले कर्तव्य आहे. दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या अशा थोर महापुरुषांकडून प्रेरणा घ्यावयास हवी.
 
थोर महात्मे होऊन गेले,
चरित्र त्यांचे पाहा जरा!
आपण त्यांच्या समान व्हावे,
हाचि सापडे बोध खरा!!
 
भारतभूमी ही नक्षत्रासमान तेजस्वी अशा नररत्नांची खाण आहे. आपल्या चैतन्यदायी जगण्यातून असंख्य नरसिंहांनी इथे स्फूर्तिदायी इतिहास उभा केला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी आपली धर्मपत्नी सीता व अनुज लक्ष्मण यांच्यासह १४ वर्षांचा घनघोर वनवास सहन केला. भरत, शत्रुघ्न, उर्मिला, वीर हनुमान, बिभीषण यांनीदेखील या समर्पणयज्ञात आहुती दिली. संकटांची शृंखलाच या सर्वांच्या जीवनी अवतरली. तरी पण भावनेपेक्षा कर्तव्य हे अतिशय कठोर असते आणि ते पूर्ण केलेच पाहिजे, हे त्यांनी आपल्या पवित्र जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून अभिव्यक्त केले. म्हणूनच लाखो वर्षानंतरदेखील श्रीरामायण कथा आजदेखील कोट्यवधी भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य करीत आहे. पुढे महाभारतात योगेश्वर श्रीकृष्णांनी सत्य धर्माची स्थापना व अधर्माचा नाश हेच आपल्या जगण्याचे ध्येय बनविले.
 
इतिहासाच्या याच प्रेरक प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेच्या रक्षणासाठी जुलमी मुगल साम्राज्याला सुरुंग लावला आणि राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा मोठ्या शौर्याने पूर्ण केली. मेवाडचा इतिहास तर फार मोठा क्रांतिकारी आहे. महाराणा प्रतापांनी मातृभूमीसाठी आपले शौर्य गाजविले. झाशीची राणी अखेरपर्यंत झुंज देत राहिली. वीर सावरकरांची ती अपार देशभक्ती किती उच्च कोटीची आहे? अशा या थोर महात्म्यांच्या जगण्यालाच तर जगणे म्हणतात. या शूरवीर क्रांतिकारकांबरोबरच या भूमीतील ऋषी, महर्षी, संत, सुधारकांनीसुद्धा राष्ट्रोद्धार व समाजाच्या नवनिर्मितीसाठी आपले आयुष्य वेचले आहे. म्हणूनच या महान सत्पुरुषांच्या जगण्यातून प्रेरणा घेणे व आपले जीवनदेखील त्याच पथावरून चालविणे हे आमचे कर्तव्य आहे.
 
वेदमंत्राचा पुढील उपदेश आहे - आयुष्मान् जीव, मा मृथा! हे माणसा! तू चिरंजिवी होऊन जग. आपली जीवनयात्रा व्यर्थपणे संपवू नकोस. आयुष्मान हो. दीर्घजीवी बनून जीवनज्योती उजळव! भगवंताकडून तुला शत (१००) आयुष्याचे देणे लाभले. यातील एक- एक क्षण अतिशय मोलाचा आहे. आयुष् म्हणजेच जीवनशक्ती! याच प्राणशक्तीमुळे जीवात्म्याला प्राणी असे म्हणतात. या प्राणबळाद्वारे माणसाने स्वतःतील सामर्थ्याला ओळखावे आणि उच्च आदर्शांचे पालन करीत आपले जीवन यशस्वी करावे. निरर्थक जगू नये आणि व्यर्थ मरु नये. यासाठीच एक कवी आपल्या गीतातून म्हणतो -
 
सूरज ना बन पाए तो,
बनके दीपक जलता चल।
प्यार दिलों को देता है,
अश्कों को दामन देता है।
जीना उसका जीना है,
जो औरों को जीवन देता है॥
 
मानवदेह प्राप्त झाला आहे, तो शुभ कर्मांसाठी! अशुभ कर्म करीत जगणे म्हणजे या दुर्लभ देहाचा अपमान होय. ध्येयहीन जगणे म्हणजे साक्षात मृत्यूच आहे. काहीही कार्य न करता आळशी बनून जगणे कोणत्याच कामाचे नाही. या जगण्याला जगणे म्हणत नाहीत. नीतिकारांनी म्हटले आहे -
 
काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुङ्क्ते!
 
कावळासुद्धा दीर्घकाळापर्यंत जीवंत राहतो आणि तो नैवेद्य वगैरे खात कसेतरी जगतोच! मग काय त्याची ही जीवनशैली आहे काय? याला जगणे म्हणत नाहीत. यासाठीच तर मंत्राचा संकेत आहे - माणसाने कधीही अकाली मृत्यूला स्वीकारू नये...
 
वेदांनुमोदित जीवेत शरदः शतम् । हा पल्ला गाठावयाचा आहे. विनाकारण मृत्यूला बळी पडायचे नाही. मृत्यू तर अनिवार्य आहेच. पण नानाविध रोग, व्यसने, सवयी, मानसिक क्लेश, चिंता, भय, वाद-विवाद, हिंसा इत्यादींपासून दूर राहत विचारपूर्वक सुखासमाधानाने जगावे. मृत्यूला जवळ करू नये. आजकाल थोड्या थोड्या कारणाने लोक आपले आयुष्य संपवत आहेत.आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. स्वतःला का संपवावे? भगवंताने दिलेले हे वरदानरुपी आयुष्य आनंदाने घालवावे. यासाठीच शेवटी म्हटले आहे -
 
मृत्यो: उदगा वशम्!
 
म्हणजेच मृत्यूच्या तावडीत सापडू नकोस. ज्ञान, विद्या, अध्यात्म, योगाभ्यास, पुरुषार्थ यांद्वारे आपल्या जीवनाला यशस्वी बनव. यातच खऱ्या अर्थाने तुझ्या जगण्याचे सार्थकत्व दडले आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणूस शाश्वत सुखापासून दूर आहे. सर्व काही पैसा आणि पैसाच! या मनोवृत्तीतून त्याने आपले चैतन्याचे जगणे विस्मृत केले आहे. म्हणूनच हा मंत्र त्याकरिता नवसंजीवनी प्रदान करणारा आहे. शेवटी कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतून मंत्रानुरुप आशय ग्रहण करू या -
 
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानांचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर!
नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी तार्‍यांची,
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची!!
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
@@AUTHORINFO_V1@@