दोन महान द्रष्टे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Ramdas Swamy_1  
 
 
 
समर्थांच्या मते, प्रत्येक शिष्याने उपासनेसाठी वैयक्तिक पातळीवर माया-ब्रह्म कल्पनेचा प्रथम अभ्यास करावा, या अभ्यासातून स्वत: आत्मज्ञानाची अनुभूती घ्यावी, आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर माणूस आपोआप ब्रह्मरुपच होऊन जातो. आत्मज्ञानाने त्याचे सांसारिक दु:ख नाहीसे होते. परिणामत: प्रापंचिक दु:खाने नाऊमेद होण्याचे अथवा खचून जाण्याचे प्रसंग त्यांच्यावर येत नाहीत. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपला देह तो प्रारब्धावर सोडून देतो आणि मनाने निवांत होतो.
 
 
 
रामोपासनेचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे, राम आणि हनुमान यांच्या कथा कीर्तनातून लोकांना सांगून त्यांच्यात धैर्य निर्माण करणे आणि लोकांना प्रपंचविज्ञानाची महती पटवून देणे हा समर्थ संप्रदायाचा हेतू होता. राम आणि हनुमान यांच्या भक्तीने, उपासनेने लोकांमध्ये उपास्य दैवताचे थोडेतरी गुण येतील, असा स्वामींचा विचार होता. सर्व बाबतीत हताश झालेल्या तत्कालीन समाजाला स्वधर्मरक्षणासाठी जागृत करणे आवश्यक होते, हे समर्थांच्या लक्षात आले. तो काळ असा होता की, परकीय राज्यसत्ता अमानुषपणे वागत होती. लोकांच्या मनात त्याची भीती होती. त्या भीतीमुळे आणि अंगीकारलेल्या दास्यत्वाच्या भावाने लोक अस्वस्थ होते. त्यांच्यातील आप-परभाव मावळला होता, तो आप-परभाव जागृत केल्याशिवाय या संकटाला तोंड देता येणार नाही, त्यासाठी लोकांना भक्तिमार्गाबरोबर प्रपंचविज्ञानाची म्हणजेच राजकारणाची जाणीव करुन दिली पाहिजे, असे समर्थांच्या मनात असावे, त्यासाठी समर्थांनी लोकांना रामोपासना, भक्ती अशा सात्विक पातळीवर एकत्र आणण्याचे काम सुरु केले. या सात्विक विचारांशिवाय आप-परभाव निर्मितीसाठी लोकांना एकत्र गोळा केले तर त्यातून द्वेष, मत्सर, सूडाची भावना इत्यादी अवगुणांची निर्मिती होऊन गोंधळाची परिस्थिती तयार होते. अशी अवस्था एकंदर समाजस्वास्थ्याला घातक ठरेल याची समर्थांना कल्पना असावी. आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार, ते कीर्तन, ग्रंथनिर्मिती व महंत याद्वारा करीत होते. जुलमी, हिंसक म्लेंच्छ राज्यसत्तेबद्दल भडकावू वक्तृत्व स्वामींनी कधी केले नाही. इस्लाम धर्माबद्दल स्वामींच्या मनात द्वेष नव्हता. पण हिंसकवृत्ती, जुलमी राज्यकर्ते, बळजबरीने धर्माचा प्रसार, स्त्रियांची विटंबना यांची स्वामींना विलक्षण चीड होती. या समस्यांचा स्वामींनी सखोल विचार केला असणार. त्यासाठी लोकजागृतीचा, लोकोद्धाराचा मार्ग त्यांनी निवडला. लोकोद्धारासाठी समर्थांनी शिष्य तयार केले, पण लोकोद्धाराच्या बाबतीत समर्थांची विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. समर्थांच्या मते, प्रत्येक शिष्याने उपासनेसाठी वैयक्तिक पातळीवर माया-ब्रह्म कल्पनेचा प्रथम अभ्यास करावा, या अभ्यासातून स्वत: आत्मज्ञानाची अनुभूती घ्यावी, आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर माणूस आपोआप ब्रह्मरुपच होऊन जातो. आत्मज्ञानाने त्याचे सांसारिक दु:ख नाहीसे होते. परिणामत: प्रापंचिक दु:खाने नाऊमेद होण्याचे अथवा खचून जाण्याचे प्रसंग त्यांच्यावर येत नाहीत. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपला देह तो प्रारब्धावर सोडून देतो आणि मनाने निवांत होतो.
 
त्या ब्रह्मबोधे ब्रह्माचे जाला।
संसारखेद तो उडाला।
देहो प्रारब्धी टाकिला।
सावकास॥ (दा. ६.२.४२)
 
असा हा निवांत ज्ञानी पुरुष लोकोद्धाराचे काम करण्यास योग्य असतो. थोडक्यात सांगायचे तर स्वामींच्या मते प्रत्येकाने प्रथम आत्मोद्धार करून घ्यावा व नंतर लोकोद्धाराच्या कामाला लागावे. देह प्रारब्धावर टाकून ध्येयाने प्रेरित झालेली, आत्मज्ञान प्राप्त झालेली माणसेच समाजासाठी अलौकिक कार्य करू शकतात. अन्यथा धर्माच्या लोकोद्धाराच्या नावाखाली लोकांना फसवून स्वतःची संपत्ती निर्माण करणार्‍यांची समाजात कमतरता नाही. साडेतीनशे वर्षांपूर्वी लोकोद्धारासाठी महंत घडवताना समर्थांना या धोक्याची कल्पना होती. म्हणून महंतांना उपदेश करताना त्यांच्या हातून असली स्वार्थी, भ्रष्टाचारी कृत्ये घडणार नाहीत, याची समर्थ काळजी घेत. महंतांनी आपल्या कार्याच्या दरम्यान काय करायचे नाही, यावर दासबोधात सविस्तर चर्चा केली आहे. रामदासी महंत होणे हे एक प्रकारचे व्रत होते. व्रताचा अंगीकार करताना स्वार्थाचे विचार बाजूला सारावे लागतात. लोकांचे आणि इतरही नाना आघात सोसून महंताला रामोपासनेचे, राम व हनुमान यांच्या भक्तीचे तसेच प्रपंच विज्ञानाचे महत्त्व सांगून समाजाला जागृत करण्याचे काम करायचे होते. या सर्व प्रकारांचा विचार करून समर्थ सांगतात की, ‘महंती सुखाची नाही, हे प्रत्येक शिष्याने ध्यानात ठेवणे जरूर आहे.’ आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी जे काम करायचे आहे, ते त्यांनी अत्यंत निःस्पृहपणेच केले पाहिजे, असा समर्थांचा आग्रह असे-
 

महंती सुखाची नाही।
येथे दुःखे उदंडही।
उदंड दुःख लोकांचे।
ऐकता ऊर फाटतो॥
 
महंताच्या दुःखापेक्षा लोकांची दुःखे अपार आहेत. महंताने त्या लोकांची दुःखे ऐकून घ्यावी. ती दुःखे ऐकल्यावर आपले अंतःकरण विदीर्ण झाले तरी हरकत नाही. पण, त्यांची दुःखे ऐकून घ्यावी. त्यांच्या दुःखांना वाट मिळाल्याने लोकांचा दुःखभारहलका होतो. लोकांची प्रापंचिक दुःखे हलकी करायची होती. पण, स्वामींच्या मनात वेगळ्याच सामाजिक-सांस्कृतिक समस्येला कसे तोंड द्यायचे, यासंबंधी विचार चालू होते. तत्कालीन मुस्लीम राज्यकर्त्यांमुळे राजकीय आक्रमणाचा रेटा होताच. पण, त्याचबरोबर त्यांच्या धर्मप्रसाराच्या धडाक्याने सांस्कृतिक आक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला होता. राजकीय आक्रमणं उघड्या डोळ्यांना दिसत होती. त्याचा मुकाबला करता येत होता. पण सांस्कृतिक आक्रमणाचे तसे नसते. ते सहजपणे दिसत नाही. ती समाजावर हळूहळू परिणाम करीत असतात. आक्रमणाचा दृश्य परिणाम दिसायला अनेक वर्षांचा काळ जावा लागतो. जेव्हा हे सांस्कृतिक आक्रमण समाजाला ग्रासून टाकते तेव्हा त्याची कटू फळे अनुभवाला येऊ लागतात. मुसलमानांच्या धर्माचा स्वीकार असाच लादला गेला तर आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे कठीण जाईल, हे रामदासांनी ओळखले होते. सांस्कृतिक आक्रमणाचा धोका टाळण्यासाठी आपल्या संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजवून ठेवावी लागतात. त्या काळात महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर महाराष्ट्राच्या सुदैवाने भागवत धर्मातील ज्ञानेश्वर ते तुकाराम या सर्वच संतांनी संस्कृती रक्षणाचे महान कार्य केलेले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील. परंतु, इ. स. १५२६ साली आलेला बाबर व त्यानंतरच्या मुघल वावटळीपुढे भागवत धर्मातील संतांनी चालवलेले संस्कृती रक्षणाचे कार्य हिंदुस्तानच्या दृष्टीने पुरेसे नव्हते. तत्कालीन मुस्लीम समाजात सुफी पंथीयांचे प्रस्थ माजले होते. धर्मप्रसार आणि हिंदूंना बाटवून मुसलमान करणे हा सुफींचा उद्योग होता. राजकीय बळ त्यांच्या पाठीशी होते. ज्याला सर्व मुस्लीम मानतात तो मोईनोद्दिन ख्वाजा चिस्ती हा शहाबुद्दीन घोरीच्या फौजेबरोबर हिंदुस्तानात आला. या सुफीने किती हिंदूंना बाटवले याचा हिशेबच नाही. हिंदूंची गावेच्या गावे बाटवून त्याने असंख्य हिंदूंना बाटवून मुसलमान केले. लोक पिराची पूजा करु लागले. तरीही या सांस्कृतिक आक्रमणाचे गांभीर्य येथील हिंदू राजांनी जाणले नाही. या बाबतीत ते गाफिल राहिले.
 
तथापि, सतराव्या शतकाच्या सुरुवातीस हा सांस्कृतिक आक्रमणाचा धोका ओळखणारे व आपल्या कार्याची दिशा संस्कृती रक्षणाकडे वळवणारे दोन महान द्रष्टे पुरुष महाराष्ट्रात जन्माला आले आणि आपल्या अलौकिक कार्य पद्धतीने त्यांनी ही लाट परतवून लावली. ते दोन महान राष्ट्रपुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज. या दोन्ही द्रष्ट्या पुरुषांनी मुसलमानी सांस्कृतिक आक्रमणाचा धोका ओळखला, ती लाट थोपवून धरली आणि हिंदू संस्कृती रक्षणाचे कंकण हाती बांधून आपल्या कार्याची दिशा तिकडे वळवली.
 
- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@