वैदिक सणांचे योग रहस्य भाग-७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
 
fest_1  H x W:
 
 
 
 
रामायणात समुद्रमंथनाची कथा आली आहे. सुर आणि असुर आपापसात भांडून थकले. मग ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावरून अमृतप्राप्तीच्या हेतूने त्यांनी समुद्रमंथन करायचे ठरविले. समुद्रमंथन म्हणजे ध्यानाद्वारे मनाचे व शरीराचे मंथन करून कुंडलिनी जागृत करणे व आत्मज्ञान प्राप्त करणे होय. मनाचा व शरीराचा परस्पर संबंध असतो. संस्कार बदलल्यास जीवात्म्याचे उपकरण-शरीर, तेसुद्धा बदलत असते. शरीरात रोग असल्यास मन अस्वस्थ असते. जसे मन तसे शरीर. म्हणून शुद्ध मन असलेले सर्व खरे संत सर्वगुणसंपन्न व दिसावयास सुंदरच असतात. उदा. ज्ञानेश्वर माऊली, स्वामी विवेकानंद. हे कुंडलिनी जागृतीचे रहस्य आहे.
 
 
 
कुंडलिनी जागृतीद्वारे अमृततत्त्वाचा लाभ देव व दानवांना होणार होता. पण सर्वप्रथम त्यांना हलाहल विष प्राप्त झाले. शेवटी अमृततत्त्वाचा लाभ झाला. सुर म्हणजे आपल्यातील चांगल्या वृत्ती तर असुर म्हणजे आपल्यातीलच वाईट वृत्ती होत. बर्‍या-वाईट वृत्तींचे युद्ध आपल्यात सतत चाललेलेच असते, तेच सुरासुरांचे युद्ध होय. कुंडलिनी जागृती म्हणजेच समुद्रमंथन होय. समुद्र म्हणजे शरीर. त्याचे मंथन करण्याकरिता मेरू पर्वत म्हणजे आपला मेरूदंड होय. त्याला लागणारी दोरी म्हणजे शेषनाग होय.सर्पदर्शनाने त्याची अनुभूती येते. या शेषातून प्रथम प्राप्त होते हलाहल म्हणजे भयानक विष! कुंडलिनी जागृत झाल्यावर सर्वप्रथम विष प्राशन केल्यासारखा शरीर दाहाचा अनुभव येतो. साधना केल्यानंतरच असला दाहाचा अनुभव साधकाला येत असतो. मीराबाईंनी हेच विष प्राशन केले होते खरे विष नव्हे. समुद्रमंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, उच्चै:श्रवा, ऐरावत आणि १४ अवस्थारूप रत्ने प्राप्त झाल्यावर शेवटी अमृतकुंभाची म्हणजे अमरत्त्वाची प्राप्ती होत असते. देववृत्तींना अमर व दानववृत्तींना मर्त्य म्हटले आहे. समुद्रमंथन असे आहे. समुद्रमंथन अनाकलनीय इतिहास नसून कुंडलिनी जागृतीची दिव्य साधना होय. या कथेचा खरा आशय आम्हाला समजल्यास ज्ञानाची दिव्य द्वारे आम्हासाठी उघडली जातील. प्राप्त हलाहल भगवान प्राशन करतात. त्यामुळे त्यांचा शुभ्र कंठ नील होतो. म्हणून भगवान शिवाला ‘नीलकंठ’ असे नाव दिले आहे. शिव म्हणजे साधकाचीच कल्याणकारक अवस्था!
 
 
अंतिम कल्याणाकरिता सुरुवातीचे हलाहल विष जो साधक प्राशन करेल तो भगवान शिव होऊन अमर होईल. आशय असा की, कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाच्या सर्वांगाचा जो असह्य दाह होतो ते हलाहल रूप विषप्राशन करणारा श्रेष्ठ साधकच भगवान शिव होतो. साधनाशास्त्रात स्पष्ट म्हटलेच आहे, जो शिवाची साधना करेल तो शिवच बनेल, ’शिवं भूत्वा शिवं यजेत्।’ १४ रत्नातील एक रत्न म्हणजे उच्चैःश्रवा होय, या उच्चैःश्रवारूप घोड्याला पाच मुखे होती. पंचतत्त्वांचे दिव्य श्रवण म्हणजे हा उच्चैःश्रवा होय. त्यानंतर प्राप्त झाला ऐरावत हत्ती! याला सात सोंडा होत्या. या सात सोंड म्हणजे आपली सप्तचक्रान्वित हत्तीसारखी बलवान काया होय. याच ऐरावतावर इंद्रियांचा स्वामी इंद्र म्हणजे जीवात्मा स्वार होऊन असूर वृत्तीशी आपल्या वज्रनिर्धाररूप वज्राद्वारे युद्ध करतो. त्यानंतर निघतात अश्विनीरूप देवांचे वैद्य. अश्व म्हणजे श्वासविरहित अवस्था, म्हणजेच प्राणायामसिद्धी होय. ज्याचा प्राणायाम म्हणजे अश्विनी सिद्धी झाली आहे त्याला कोणताच रोग होणार नाही. म्हणजे असला साधक अमर होतो. त्यानंतर प्राप्त होते लक्ष्मी! लक्ष्मी म्हणजे संपत्ती होय. सर्व संपत्तीत श्रेष्ठ संपत्ती अध्यात्म संपत्ती होय. ही संपत्ती ज्याला लाभली तो लक्ष्मीपती विष्णू भगवान होय. विष्णू विश्वाचा पालक, ज्याचे अवतार राम आणि कृष्ण मानले आहेत. समुद्रमंथनातील कुंडलिनी शक्तिद्वारेच ही १४ रत्ने व ओघाने लक्ष्मीपती भगवान विष्णुत्व प्राप्त होत असते. वैदिक परंपरेने मानवाला परमात्म स्वरूप मानले आहे. पण परमात्म स्वरूप प्राप्त होण्याकरिता कुंडलिनी जागृतीद्वारे १४ रत्ने प्राप्त करावी लागतात. त्याचा दैवी इतिहास म्हणजे कुंडलिनी जागृती साधना होय.
 
 
 
सगर राजापासून पाचवी पिढी भगिरथाची होती म्हणजे साधकाच्या देहात चुकीच्या पद्धतीने कुंडलिनीचा दाह उत्पन्न झाला की, त्या दाहाचा त्रास साधकाला पाच जन्मातील पिढ्यापर्यंत सहन करावा लागतो असा कथेचा आशय आहे. याकरिता प्रथम साधकाने कपिल महामुनी म्हणजे योगशास्त्राला सन्मान देऊन योग्य तर्‍हेने योगसाधना केली तरच त्याचा शरीरदाह तत्काळ कमी होईल. अन्यथा अयोग्य मार्गाने कुंडलिनी जागृत केल्यास तो दाह साधकाला पाच पिढ्यांपर्यंत भोगावा लागेल. असा वरील कथेचा योगाशय आहे. म्हणून अयोग्य मार्गाने म्हणजे स्पर्श दीक्षेने कुंडलिनी जागृत करणे किती अयोग्य होय याची कल्पना येऊ शकेल. कल्याणप्रद स्वप्रयत्नाने म्हणजे भगीरथ होऊन ज्ञानगंगेला आवाहन करायचे असते. अन्यथा कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयोग करणारे किती शास्त्रविरोधी वागतात हे यावरून दिसून येईल. असल्या भंपक प्रयोगाने एकतर कुंडलिनी जागृत होतच नसते. झाल्यास ती अवस्था फार काळ टिकत नाही. त्या आवेगाचा योग्य उपयोग न झाल्याने साधकाचे सर्वतोपरी अध:पतन होऊ शकते. असले प्रकार बर्‍याच स्थानी बघण्यात येत आहेत. अशास्त्रीय पद्धतीने कुंडलिनी जागृत झाल्यास त्याचा भयंकर दाह परिणाम साधकाला पाच पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो. सगर आणि भगीरथ कथेचा हा खरा आशय आहे. चांगले विचार व ध्यान कुंडलिनी जागृतीसाठी सर्वात उत्तम मार्ग आहे. मंथनातून प्रत्येक महान साधकाला १४ रत्ने प्राप्त होत असतात. धन्वंतरी हे रत्न प्रत्येक साधनासंपन्न साधकाला प्राप्त होत असते तेही अमृताचा कलश घेऊन. साधनेकरिता साधकाचे शरीर अतिशय निरोगी म्हणजे प्राकृतिक अवस्थेत असावे लागते.साधकाला स्वतःचे आणि दुसर्‍याचे शरीर, आसन प्राणायामादी प्रक्रियांद्वारे कसे शुद्ध प्राकृतिक ठेवावे याचे ज्ञान असते. हाच तो समुद्रमंथनातील धन्वंतरी होय. धन्वंतरी म्हणजे वैद्यकीय ज्ञान. हे वैद्यकीय ज्ञान समुद्रमंथनातून प्राप्त झाले असते तर आज जी वैद्यकीय महाविद्यालये आहेत त्यांची आवश्यकताच भासली नसती. समुद्रात जाऊन पाणी ढवळले की असले अनेक धन्वंतरी उत्पन्न झाले असते. पण तसे झाले नाही आणि होत नसते. समुद्रमंथनातील धन्वंतरी म्हणजे स्वतः साधकाला ध्यान, चिंतनातून प्राप्त होणारे प्राकृतिक ज्ञान होय. असा प्राकृतिक साधक अमृतावस्थेत असतो. दशमीला या धन्वंतरीची जयंती साजरी करतात. (क्रमशः)
 
 
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
 
@@AUTHORINFO_V1@@