कोरोना हरणार आपण जिंकू!

    09-Dec-2020   
Total Views |

Yojna Thokale_1 &nbs
 
 
 
करुणा हा धम्माचा गाभा आहे. ती करुणा, ती संवेदना आणि ती माणुसकी जपत योजना ठोकळे यांनी कोरोना काळात कार्य केले. गेली कित्येक वर्षे समाजासाठी काम करत असताना समाजाचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. त्यामुळेच कोरोनाने समाजात भयावह वातावरण झाले. त्यावेळी योजना ठोकळे आपल्या ‘आधार महिला संस्थे’द्वारे समाजाला आधार देण्यासाठी उभ्या ठाकल्या. समता परिषद तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनही त्यांनी समाजाला सहकार्य केले.

योजना विरेंद्र ठोकळे
राजकीय पक्ष : भाजप
पद : अध्यक्ष, महिला मोर्चा, ईशान्य मुंबई
संपर्क क्र. : ९३२३३ ४७८८१

 
 
 
माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे केंद्र आणि चळवळीचेही केंद्र. तिथे योजना ठोकळे यांचे ‘बार्टी’च्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. या केंद्रामध्ये वस्तीतील महिला येत असल्याने त्यांच्या सुखदु:खाशी समरस होण्याचेही हे एक केंद्रच. मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि हे प्रशिक्षण केंद्रही ‘लॉकडाऊन’मुळे बंद ठेवावे लागले, या काळात या महिलांचे त्यांच्या कुटुंबाचे काय होत असेल, हा प्रश्न योजना ठोकळे यांना सतावूलागला. मोबाईलच्या माध्यमातून महिला संपर्कात तर होत्याच. ‘लॉकडाऊन’मध्ये मोठी समस्या होती, ती कामधंदे बंद पडल्याची आणि त्यामुळे होणाऱ्या उपासमारीची. बहुतेक महिला घरकाम करणाऱ्या होत्या. कोरोना संसर्गाच्या भीतीने या महिलांची अचानकपणे कामे सुटली. घराची आर्थिक घडी विस्कटली. अशावेळी कुणाकडे मदत मागणाार? कारण, नातेवाईक, आप्तेष्ट यांची परिस्थितीही तशीच. तसेच, या काळात स्थानिक नेतेमंडळीही ‘लॉकडाऊन’ झालेली. कोरोनापेक्षा भुकेने आणि काळजीने मरून जाऊ, अशी स्थिती निर्माण झाली. कामधंदे शोधावेत, तर तेही बंद. सुरुवातीच्या कडक ‘लॉकडाऊन’ काळात तर सामान्य जनांना घराबाहेर पडायचीही बंदी होती. अशावेळी लोकांची स्थिती शब्दात व्यक्त करता येत नव्हती. यावेळी योजना यांनी ‘आधार महिला संस्थे’च्या माध्यमातून गरजू महिलांना सहकार्य केले. अन्नधान्य वाटप केले.
 
 
 
Yojna Thokale_1 &nbs
 
 
 

"मी मूळ सोनज मालेगावची. माझे वडील हे आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. समाज, देश आणि बाबासाहेब आंबेडकरांवरची श्रद्धा, निष्ठा हे माझ्या रक्तातच आहे. त्यामुळे कोरोना काळात समाजकार्य करावे, हे काही ठरवून केलेले नाही. यापुढेही कोरोनाविरोधात लढाई सुरूच राहणार, कोरोना हरणार, आपण जिंकू!"

 
 
 
याच काळात इतर संस्थांच्या मदतीने गरीब कुटुंबासाठी प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे वाटली. कुटुंबांना धीर दिला की, अजिबात घाबरू नका. आपण धम्माच्या मार्गाने जगतो. आपल्याला काहीच होणार नाही. ज्यावेळी वेळ येईल, त्याचवेळी काळ येईल. पण उगीच ‘कोरोना... कोरोना’ करून घाबरलात तर वेळेआधी बुद्धवासी व्हावे लागेल. योजना यांनी महिलांचे ऑनलाईन समुपदेशन केले. या समुपदेशनामध्ये महिलांसोबत संवाद साधला. त्यांना सांगितले की, आपलं घर म्हणजे एका वेळी तीन-चार माणसं बसू शकतील, इतकी छोटी आहेत. तुम्ही कामाला बाहेर जात होत्या. तुमचा नवरा बाहेर जात होता. त्यामुळे पूर्वी संध्याकाळी रात्री एकमेकांची भेट व्हायची. गोडी वाटायची. पण आता कोरोनामुळे २४ तास एकमेकांची तोंडं पाहायला लागतात. भांड्याला भांडं लागतंच. कुरकूर, चिडचिड करू नका. घरात कटकट, भांडाभांडी झाली तर निदान या कोरोना काळात तरी माघार घ्या. कारण, तुमचा नवरा किंवा घरातले कोणीही या काळात बाहेर पडू शकत नाहीत, नाक्यावर, चौकात कुठेही जाऊ शकत नाही. मग घरातले वातावरण का बिघडवायचे? त्याचे शांतपणे ऐका. इतके वर्षं तुम्हाला कामामुळे, घरच्या जबाबदारीमुळे एकमेकांना वेळ देता आला नाही. आता कोरोनामुळे जबरदस्तीने का होईना, तुम्हाला कुटुंबासोबत २४ तास राहण्याची संधी मिळाली, तर एकमेकांशी चांगले वागून प्रेम वाढवा. या काळात दारूची दुकानं बंद आहेत. पानटपऱ्या बंद आहेत. त्यामुळे ज्यांचे नवरे व्यसन करतात, त्यांना दारू, विडीकाडी मिळाली नाही, व्यसनी नवऱ्यांना निर्व्यसनी पाहण्याची ही नामी संधी आहे. त्याला व्यसन सोडण्यास मदत करा. योजना आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हे समुपदेशन ऐकून वस्तीपातळीवरील कितीतरी कुटुंबे सुखी झालीत.
 
 
 
 
याच काळात योजना यांनी इतर स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदतही केली. एक-दोन संस्था कोरोना काळात तन-मन-धन अर्पून काम करत होत्या. मात्र, हे काम म्हणजे जगन्नाथाचा रथच. एकट्या संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्य करणे कठीण जात होते. अशावेळी योजना यांनी या स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदतही केली. त्यांची स्वत:ची खत वितरणाची कंपनी आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सधन आहे. आपल्याकडे असल्यास दुसऱ्याला देऊन त्याची मदत करावी, हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे योजनांनी केलेली आर्थिक मदत काही काळाने परत करण्याचे ठरवले. तशी विचारणाही केली. त्यावेळी योजना यांनी स्पष्ट नकार दिला. योजना या धम्माच्या उपासक आहेत. मुंबईतील बुद्धविहारातील भन्तेजींशी त्यांचा चांगलाच परिचय. कोरोना काळात सगळीच मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद झाली. अशावेळी भन्तेजींची दैनंदिन आयुष्यही बदलली. योजना यांनी आ. भाई गिरकर आणि समता परिषदेच्या माध्यमातून भन्तेजींना अन्नधान्य वितरीत केले. तसेच समता परिषदेच्या सहाकार्यासोबत बुद्धविहारांना भेट दिली, भन्तेजींचे प्रश्न समजून घेतले. याच काळात समाजात एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. जगण्यावरचा विश्वास उडाला होता. एकमेकांबद्दल संशयही बळावला होता. न जाणे कुणाला कोरोना असेल तर या विचारांनी सख्या शेजाऱ्यांनी एकमेकांसाठी दरवाजे बंद केले होते. अशा परिस्थितीमध्ये योजना यांनी संपर्कातील सगळ्यांना समजावले की, कोरोना हा आजार आहे. पण, स्नेह संबंध हे जगणे आहे. भीतीमुळे नाती तोडू नका, कुणाला दुखवू नका. तसेच जर कुणाला कोरोना आहे, असा संशय असेलच तर कोरोना तपासणी करा, घाबरू नका.
 
 
योजना यांच्या ‘बार्टी’च्या उपकेंद्र प्रशिक्षण केंद्रामध्ये शेकडो मुलींनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले होते. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सेसची संख्या कमी पडत होती. अशावेळी योजना यांनी या प्रशिक्षित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना सांगितले की, तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तेव्हा नोकरी मिळण्याची समस्या होती. आता नोकरी उपलब्ध आहे. हे सेवाकार्यच आहे. तुम्हाला नोकरीही मिळेल आणि कोरोना काळात जनसेवा करण्याचा अनुभव आणि समाधानही मिळेल. योजना यांच्या प्रयत्नांनी नर्सिंग केलेल्या मुलींना विविध रुग्णालयांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. योजना यांचे सामाजिक कार्य नाशिक, मालेगाव आणि इगतपुरीमध्येही सुरू आहे. इगतपुरीमध्ये त्यांचे वृद्धाश्रम आहेत. कोरोना काळात योजना वृद्धाश्रमामध्ये गेल्या. तेथील आजी-आजोबांना भेटून त्यांना धीर दिला. कोरोनासंदर्भातली त्यांची नवीन नियमावली बनवली.
योजना ठोकळे यांचे कार्य खरेच महत्त्वाचे आहे. कोरोना काळात त्यांनी अतुलनीय कार्य केले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.