आपला माणूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Nandkumar Patil_1 &n
 
 
अचानक कोसळलेल्या कोरोनाच्या संकटात आपल्या समाजबांधवांचे दुःख दूर करण्यासाठी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अथक प्रयत्न केले. वनवासीबहुल जिल्हा असलेल्या पालघरच्या दुर्गम गाव-पाड्यांपासून ते वस्तीवर जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची मदत पोहोचविण्याचे काम नंदकुमार पाटील व सहकाऱ्यांनी केले, तसेच कोरोना आजारामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या छायेतील जनतेला त्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृतीपर मोहीमही राबविली.


नंदकुमार पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजप पालघर जिल्हाध्यक्ष
कार्यक्षेत्र : पालघर जिल्हा
संपर्क क्र.: ९२७१८ ११४०५

 
 
 
कोरोनाचे जागतिक संकट देशासह महाराष्ट्रातही धडकले आणि त्यावर मात करण्यासाठी वैद्यकीय उपचारांबरोबरच ‘लॉकडाऊन’चा मार्ग अवलंबला गेला. मात्र, कोरोना व ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका सर्वहारा वर्ग म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या, स्थलांतरित मजूर-कामगार तसेच वनवासी भागाला बसला. पालघर तर कोकणातील वनवासीबहुल जिल्हा आणि अतिशय दुर्गम-पर्वतीय प्रदेश. अशा ठिकाणी कोरोना व ‘लॉकडाऊन’चा दैनंदिन जीवनावर किती परिणाम झाला असेल, याचा विचारही आपण करू शकत नाही. मात्र, पालघरच्या याच वनवासीजनांना आधार, दिलासा देण्यासाठी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पुढाकार घेतला. कित्येकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. आरोग्यविषयक औषधे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.
नंदकुमार पाटील यांच्या प्रयत्नाला त्यांच्या सहकाऱ्यांचीही उत्तम साथ लाभली. ‘लॉकडाऊन’च्या काळात पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल दोन लाख ८० हजार लोकांपर्यंत तयार अन्नाची पाकिटे पोहोचविण्याचे काम केले. मात्र, केवळ अन्न पाकिटे वितरित करून ते थांबले नाहीत, तर आपल्या समाजबांधवांना अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही त्यांनी केले. पालघर जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ५०० कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे म्हणजे धान्य, तेल, हळद-तिखट, मीठ, साखर, चहा पावडर आदींचे वितरण त्यांनी केले. परिणामी, जिल्हाभरातील वनवासी बांधवांना भाजपच्या माध्यमातून कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास वाटला.
केवळ जीवनाश्यक वस्तू किंवा अन्नाची पाकिटे वितरित करून कोरोनाच्या संकटावर विजय मिळवता येणार नव्हता, तर त्यासाठी वैद्यकीय मदत देणेही गरजेचे होते. नंदकुमार पाटील यांनी त्या दृष्टीने नियोजन केले व जिल्हाभरात सुमारे २२ हजार नग सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. तसेच, कोरोनाच्या काळातील ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचा सहभाग महत्त्वाचा होता. कारण, प्रत्यक्ष जमिनीवर उतरून, आघाडीवर उभे राहून ते सर्व परिस्थिती पाहत होते, हाताळत होते, लढत होते. पोलिसांच्या याच कार्यात त्यांना सहकार्य म्हणून नंदकुमार पाटील यांनी विविध ठिकाणच्या १२ पोलीस ठाण्यांमध्ये सेफ्टी किटचे वाटपही केले.
 
Nandkumar Patil_1 &n
 
 
 

"मी, प्रथमपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात असून, भाजपमध्ये असल्याने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा संस्कार माझ्यावर झालेला आहे. कोरोनाच्या संकटकाळात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता याच संस्कारानुसार जमिनीवर उतरून आपल्याच समाजबांधवांना मदत करत होता. मीदेखील माझ्यावर झालेल्या सेवाकार्याच्या, मदतकार्याच्या याच संस्कारामुळे माझ्या समाजबांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला."

  
 
आपल्याला माहितीच आहे की, कोरोनाचे संकट भयंकर आणि मोठे होते. त्यात समाजाच्या सेवाकार्याबरोबरच आर्थिक मदतीचीही आवश्यकता होती. त्यासंबंधी ‘पीएम केअर’मध्ये योगदान देण्याचे आवाहनही वेळोवेळी करण्यात येत होते. आपला देश इतका मोठा आहे आणि केवळ आपले गाव, तालुका, जिल्हा, राज्यच नव्हे, तर देशभरातील प्रत्येक व्यक्ती आपले बांधव आहेत, त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून नंदकुमार पाटील यांनी पालघर जिल्ह्यातही आर्थिक साहाय्याचे आवाहन केले. परिणामी, एक हजार ४३३ कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिकांनी ‘पीएम केअर’ फंडामध्ये तब्बल ३४ लाख ९६ हजार रुपयांचे भरघोस योगदान दिले.
 
‘लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणचे आर्थिक चक्र, व्यापारी-व्यावसायिक-औद्योगिक गतिविधीही थांबल्या. पालघर जिल्ह्याच्या वाडा, डहाणू भागात थोड्याफार प्रमाणात उद्योग-व्यवसाय वसाहती आहेत. इथल्या कारखान्यात स्थलांतरित किंवा अन्य राज्यातील मजुरांची-कामगारांची संख्याही बरीच होती. त्यांची अवस्थाही ‘लॉकडाऊन’मुळे बिकट झाली. ते पाहता नंदकुमार पाटील यांनी या मजुरांना त्यांच्या त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यासाठी मदत केली. तसेच देशातील विविध राज्यांत अडकलेल्या पालघर जिल्ह्यातील बांधवांनासुद्धा परत आणण्यासाठी त्यांनी मदत केली.
 
दरम्यान, एकीकडे कोरोनाच्या संकटापासून आपल्याच बांधवांचा बचाव व्हावा, ते सुखरूप राहावेत, म्हणून प्रयत्न चाललेले असताना दुसरीकडे इतर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना सुरळीत रक्तपुरवठा होणेही गरजेचे होते. सर्वच बंद असल्याने रक्तदान शिबिरांची संख्याही कमी झालेली होती व रक्ताचा तुटवडा जाणवत होता. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने यावर उपाय म्हणून कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार नंदकुमार पाटील यांनी पालघर जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. पालघर, वाडा, बोईसर, जव्हार, विक्रमगड अशा सर्वच तालुक्यात रक्तदान शिबीर आणि प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित केली. सोबतच जिल्ह्यातील ७२ दिव्यांगांना याच काळात आवश्यक उपकरणांचे वाटपही त्यांनी केले. सोबतच जनतेच्या मनातली कोरोनाची भीती नष्ट व्हावी, यासाठी त्यांनी रिक्षा, जिप वगैरेत भोंगे, कर्णे लावून कोरोनाबाबत जनजागृतीही केली.
 
कोणत्याही संकटात मदतकार्य करताना सहकाऱ्यांची आवश्यकता असते. नंदकुमार पाटील यांनाही या काळात ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, संतोष जनाठे, सुशील औसरकर, माजी आमदार पास्कल धनारे, हरिश्चंद्र भोये, सुरेखा थेतले, वीणा देशमुख, ज्योती भोये, विनोद मेढा, समीर पाटील, अशोक वडे, सुरेंद्र निकुंभ, डॉ. हेमंत सवरा, अ‍ॅड. मिलिंद झोले, संतोष चोथे, प्रशांत पाटील, मंगेश पाटील आदी पक्षसहकाऱ्यांनी सहकार्य केले. सहकाऱ्यांबरोबरच कुटुंबाची साथही या काळात महत्त्वाची होती. नंदकुमार पाटील यांना आईवडील, पत्नी, मुली अशा सर्वांनी पाठिंबा दिला. पण, मनात भीतीही होतीच, त्यामुळे प्रत्येक वेळी काळजी घ्या, स्वतःला जपा, अशा सूचनाही घरातून मिळत असत.
 
नंदकुमार पाटील यांना या काळात बरे-वाईट असे दोन्ही अनुभव आले. मुख्य म्हणजे, वनवासी बांधवांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे, समाधानाचे भाव बरेच काही शिकवून गेले. नव्याने माणुसकीची ओळखही झाली. पण, याच काळात त्यांना मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी प्रवृत्तीही पाहायला मिळाली, जे दुर्दैवीच म्हणावे लागेल. दरम्यान, भावी काळात पालघरसारख्या जिल्ह्यात रोजगाराचा आणि आर्थिक प्रश्न बिकट होणार असे वाटते. म्हणून लवकरात लवकर उद्योगधंदे सुरू व्हावेत, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नंदकुमार पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांना थेट मदतीचीही मागणी केली आहे. “इतरांना संदेश देताना सर्व भेद विसरून फक्त माणुसकीच्या दृष्टीने आपल्या समाजबांधवांचा विचार करायला हवा,” असे नंदकुमार पाटील यांचे आवाहन आहे.
@@AUTHORINFO_V1@@