भलामाणूस

    09-Dec-2020
Total Views |

Manoj Patil_1  
 
 
 
कोरोना महासंकटात माणुसकीला जागणारे अनेक हात पुढे आले. विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांनी आपापल्या परीने हजारो-लाखो गरजूंना मदतीचा हात दिला. ‘कोरोना’ महामारीच्या काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता, संपूर्ण कुटुंबासह जनसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे वसई-विरार शहराचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी ‘कोविड’च्या संकटकाळात केलेल्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

मनोज गोपाळ पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : वसई - विरार
भाजप जिल्हा उपाध्यक्षसंपर्क क्र. : ९३२४६ ३२९२३

 
 
संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्र, असे नेहमी म्हटले जाते. मार्च महिन्यात कोरोना महामारीचे हे संकट संपूर्ण देशावर ओढवले आणि ‘लॉकडाऊन’मुळे सर्व परिस्थितीच बदलून गेली. जीवाच्या भीतीने अख्खे जग स्वार्थी झाले. मात्र, अशा महामारीच्या स्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता, ज्यांनी जनसेवेसाठी स्वतःला झोकून दिले, असे काही ‘कोरोना योद्धे’ही आपल्याला समाजात पाहायला मिळाले. मनोज पाटील हे त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीतही एकही दिवस घरी बसून न राहता, मनोज पाटील यांनी दिवसरात्र मदतकार्यात स्वतःला झोकून दिले. उन्हाळ्यातील कडाक्याचे ऊन असो, अथवा जुलै महिन्यातील मुसळधार पाऊस आदी कसल्याही प्रकारची तमा न बाळगता मनोज पाटील यांनी गरजूंना मदत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. या महामारीच्या काळात मनोज पाटील यांनी अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. सरकारी मदतीपेक्षाही पाटील हे गरजूंच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे असायचे, म्हणूनच जनमानसांत एक ‘भला माणूस’ अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. कोरोना महामारीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. हातात पैसा नाही, खाण्यासाठी अन्न नाही, अशा परिस्थितीत जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला. विरार, नालासोपारा पूर्व-पश्चिम आणि बोळींज परिसरातील अशी हजारो कुटुंबे एकाच वेळी संकटात सापडली.
 
 
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात जीवाच्या भीतीने इच्छा असूनही अनेक जणांनी मदतीपासून काढता पाय घेतला. परंतु, मनोज पाटील यांनी मात्र न डगमगता या संकटकाळातही या हजारो कुटुंबीयांच्या मदतीस धावून जाण्याचा साहसी निर्णय घेतला. विरार, नालासोपारा पूर्व-पश्चिम आणि बोळींज आदी परिसरांतील नागरिकांचे आरोग्य या महामारीच्या काळातही सुदृढ राहण्यासाठी मनोज पाटील यांनी सर्वात आधी येथील नागरिकांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप करण्यास सुरुवात केली. ‘लॉकडाऊन’ काळातही त्यांनी तब्बल ४२ हजार कुटुंबीयांपर्यंत ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले. खरेतर ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मिळविणे कठीण जात होते. कारण, महामारीच्या काळात या गोळ्यांची मागणी सर्वाधिक असल्याने सर्वत्र तुटवडा जाणवत होता. मात्र, हजारो कुटुंबीयांपर्यंत या गोळ्यांचे वाटप करायचे असल्याने मोठ्या प्रमाणात या गोळ्यांची आवश्यकता भासणार हे लक्षात घेऊन मनोज पाटील यांनी यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली. अशा वेळी मनोज पाटील यांनी डॉक्टर जगदीश पाटील यांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. मनोज पाटील यांच्या या समाजोपयोगी कार्यात खांद्याला खांदा लावून साथ देण्याचे डॉक्टर जगदीश पाटील यांनी ठरविले. डॉक्टरांनी साथ देण्याचे निश्चित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या गोळ्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात आले आणि मग टप्प्याटप्प्याने याचे नागरिकांपर्यंत वाटप करण्यात आले. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमसह बोळींजमधील एकूण ४२ हजार कुटुंबीयांपर्यंत या गोळ्या पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. केवळ ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे वाटप करून ते थांबले नाहीत. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठीही त्यांनी विशेष खबरदारी घेतली. मार्च महिनाअखेर व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वैयक्तिक खर्चातून शहरातील शेकडो इमारती, बैठी घरे, तसेच चाळी आदींमध्ये सातत्याने औषध फवारणी करण्याचे कामही त्यांनी केले. कोरोनाकाळात अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होत नव्हता. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनोज पाटील यांनी शहरातील अनेक नागरिकांच्या घरापर्यंत तसेच सोसायट्यांच्या आवारामध्ये भाजीपाला ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून दिला.
 
 

Manoj Patil_1   
 
 

"सामाजिक जाणीव म्हणून शक्य असेल तितकी मदत प्रत्येकाने करावी. कोरोना महामारीचा काळ आजही संपलेला नाही. अनेक जण या संकटाचा सामना अद्यापही करत आहेत. समाजात आजही अनेक गरजू नागरिक आहेत. यामुळे प्रत्येकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून समाजासाठी शक्य असेल तितकी मदत केली पाहिजे. सर्वांनी मदत केली तर नक्कीच आपण या संकटावर मात करू."

  
 
 
केवळ नागरिकांच्या सेवेपुरतेच मर्यादित न राहता, रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या ‘कोरोना योद्ध्यां’च्या मदतीचाही विडा मनोज पाटील यांनी उचलला. कोरोनाकाळात घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या आरोग्यसेविका, तसेच अन्य वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कमचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर, विटामिन सी, ‘आसेर्निक अल्बम-३०’, हॅण्डग्लोव्हज अशा प्रकारची मदत मनोज पाटील यांनी वेळोवेळी पुरवली. तसेच समाजासाठी असणारे त्यांचे योगदान लक्षात घेत अशा ‘कोविड योद्ध्यां’चे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा समाजात सत्कारही केला. कोरोनाकाळामध्ये सातत्याने जनतेची सेवा करणारे पोलीस, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी व आशा सेविका यांना वाफेचे मशीन म्हणजेच स्टीमर विनामूल्य पुरविण्याचे त्यांनी काम केले. आरोग्य यंत्रणेसोबतच कोरोनाकाळात जनमानसांत जाऊन काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, तसेच अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनाही मदत देण्यासाठी मनोज पाटील यांनी पुढाकार घेतला. समाजासाठी झटणाऱ्या ‘कोविड योद्ध्यां’ना मनोज पाटील यांनी मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, विटामिन ‘सी’, ‘आर्सेनिक अल्बम-३०’ आदींचा समावेश असलेल्या अशा ३०० किट्सचे त्यांनी वाटप केले. कोरोना महामारीला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेला आयुर्वेदिक ‘आयुष’ काढ्याचेही मनोज पाटील यांनी काही कुटुंबीयांना वाटप केले.
 
 
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मनोज पाटील यांनी विरार व नालसोपारा पूर्व आणि पश्चिमसह बोळींज परिसरातील एकूण ३०० कुटुंबीयांना आयुर्वेदिक ‘आयुष’ काढ्याचे मोफत वाटप केले. कोरोनाकाळात हातावर पोट असणार्‍यांचे सर्वाधिक हाल झाले. अनेकांच्या हाताला काम नसल्याने शेकडो कुटुंबांची उपासमार होऊ लागली. अशा कठीण प्रसंगी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनोज पाटील यांनी मोफत धान्यपुरवठाही केला. बोळींज परिसरात त्यांनी २५० हून अधिक कुटुंबांना मोफत धान्यपुरवठा करत मोलाची मदत केली. रिक्षावाले तसेच फेरीवाले यांना मास्क व ‘आर्सेनिक अल्बम-३०’ यांचे विनामूल्य वाटप करत त्यांनी या वर्गाच्या मदतीलाही धावून जाण्याचे काम केले. मनोज पाटील यांना या समाजोपयोगी कार्यात त्यांना त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांनीही मोलाची मदत केली. यासोबतच भाजप कार्यकर्ते प्रवीण पाटील, विशाल राऊत, अच्युत जोशी, राजेश भट, मीना शहा, नमिता सपकाळ, जयेश जोशी, प्रवीण देवधर, जितेंद्र पाटील, शशिकांत दुबे, नयन शहा, परेश पंड्या, रवि पुरोहित, आकाश ठाकूर, महेश पटेल, प्रसाद पाटील, कपिल म्हात्रे, मंगेश नाईक, पवन सिंग, नीरव शुक्ल, हंसा दुतिया, चिराग पाटील, गौरव पाटील, अद्वैत पाटील, किशोर पाटील, कल्पेश नाईक आणि निलेश नाईक यांच्यासह अनेक सहकारी कायर्कत्यांचेही मनोज पाटील यांना सहकार्य लाभले.
 
- रामचंद्र नाईक
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.