‘लक्ष्मी’ची पावले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

hajari_1  H x W
 
 
गेल्या ३० वर्षांपासून भाजपमधील सक्रिय कार्यकर्ता असलेल्या आणि आता वयाची ६० वर्षं पूर्ण केलेल्या लक्ष्मीदेवी हजारी, या स्वत: मधुमेह रुग्ण असतानाही कोविड काळात रस्त्यावर उतरुन गरजूंच्या मदतीसाठी तत्पर होत्या. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी शक्य तेवढी मदत पोहोचविण्याचा विडा उचलला. अन्नधान्यापासून सॅनिटायझेशनपर्यंत त्यांनी सर्वप्रकारची मदत गरजूंना केली. तेव्हा, त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
 
 

लक्ष्मीदेवी धनराजसिंह हजारी
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी आरोग्य सभापती, पालघर नगर परिषद
प्रभाग क्र.: ६, पालघर शहर
संपर्क क्र.: ९९७५३ ११८८९

मुंबईसारख्या महानगरापासून साधारण ८० किमी अंतरावर असलेला वनवासीबहुल पालघर जिल्हा. पण, मूलभूत सोयीसुविधा आणि खासकरुन आरोग्य सेवेत अजूनही पिछाडीवर. त्यामुळे कोविड महामारीची लाट येताच, येथील गरीब, गरजू लोकांमध्ये एकच घबराट पसरली. परंतु, पालघर नगर परिषदेच्या माजी आरोग्य सभापती लक्ष्मीदेवी हजारी यांनी नगर परिषदेच्या यंत्रणेबरोबरच, आपल्या कार्यकर्त्यांचीही मोठी फौज तळागाळात तैनात केली. परिणामी, पालघर नगर परिषद ही स्वतंत्र ‘कोविड केअर सेंटर’ सुरु करणारी देशातील पहिली नगर परिषद ठरली. हजारो रुग्णांवर कोविड काळात उपचार करणारे हे ‘कोविड केअर सेंटर’ अजूनही रुग्णसेवेत तत्पर आहे.
 
फक्त ‘कोविड केअर सेंटर’ सुरु करणे, हे या महामारीचा प्रभाव रोखण्यासाठी पुरेसे नव्हते. म्हणूनच लक्ष्मीदेवी हजारी यांनी विविध पातळीवर सेवाकार्यामध्ये स्वत:ला झोकून दिले. सर्वप्रथम आपल्या प्रभागात त्यांनी निर्जंतुकीकरणावर भर दिला. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचेही दारोदारी वाटप केले. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभागातील आजारी, संशयित लोकांची यादी तयार केली. ज्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं जाणवली, त्यांची त्वरित कोरोना चाचणी करण्यात आली. प्रभागात आणि पालघरमधील वेगवेगळ्या परिसरातील सक्रिय कार्यकर्त्यांचा यासाठी मोलाचा सहभाग त्यांना लाभला.
 
खरंतर या महामारीच्या संकटात लोकंही काहीसे घाबरले होते. कित्येकांना नेमके काय करावे, या महामारीपासून स्वत:चे, स्वत:च्या कुटुंबीयांचे नेमके कसे रक्षण करावे, याची मुळी फारशी कल्पनाच नव्हती. त्यात सामान्य रुग्णालयेही बंद होती. ही बाब लक्षात घेता, लक्ष्मीदेवी हजारी यांनी जनजागृतीवर भर दिला. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याबरोबरच, समाजमाध्यमांतूनही लोकांपर्यंत कोरोनासंबंधी माहिती पोहोचविली. कुठल्याही प्रकारची मदत लागली, तर नि:संकोचपणे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी पालघरवासीयांना केले. त्याला पालघरवासीयांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. हजारी यांच्या प्रभाग क्र. ६ मध्ये मोठ्या संख्येने व्यापारी वर्गही सामील आहे. हे व्यापारी बांधव भाजपचे कार्यकर्ते असून त्यांनीही चालत्या-फिरत्या ‘फिवर क्लिनक’च्या माध्यमातून या मदतकार्यात सिंहाचा वाटा उचलला. ‘बोईसर मेडिकल फॅक्टरीज असोसिएशन’च्या डॉक्टरांच्या मदतीने हजारी यांनी पालघरमध्ये दारोदारी आरोग्य तपासणी अभियान हाती घेतले आणि यशस्वीपणे राबविले. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमियोपॅथीच्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या १५०० बाटल्यांचेही कार्यकर्त्यांनी घरोघरी वाटप केले.
 
 
hajari 1_1  H x
 
 

"आपण या देशाचे बांधव आहोत. त्यामुळे देशवासीयांची सेवा करायची, या प्रेरणेने आम्ही कार्यरत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरजूंना मदतीचे आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तन-मन-धन अर्पून काम केले."

 
 
 
 
एरवीही हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गरीब आणि मजूर वर्गासाठी तर कोरोनाचा काळ हा सर्वार्थाने परीक्षा पाहणारा होता. काम बंद असल्याने रोजंदारीवर जीवन जगणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली होती. अशा स्थितीत हजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी किटचे गरजूंना तीन टप्प्यांत वाटप केले. या किटमध्ये १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, साबण, कांदा, लसूण इत्यादी वस्तूंचा समावेश होता. त्याचबरोबर प्रभागामध्ये रोजच्या जेवणाचीही हजारी यांनी सोय केली. पण, तरीही हजारो परराज्यातील मजुरांची पावले त्यांच्या घराकडे वळत होती. कोरोना काळात वाहतुकीची साधने उपलब्ध नसताना जीव धोक्यात घालून हजारो किमीचा पायी प्रवास करणे धोक्याचे होते. म्हणूनच प्रवासी मजुरांची यादी तयार करणे, ती तहसीलदार, रेल्वे अधिकाऱ्यांना देणे आणि त्यांच्यासाठी पालघरहून विशेष मजूर रेल्वे रवाना करण्याची जबाबदारी हजारी आणि त्यांच्या टीमने अत्यंत सक्षमपणे पेलली. बिहार, ओडिशा, राजस्थानला पालघरहून हजारो मजुरांना घेऊन रेल्वे मार्गस्थ झाली. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील छाबुवाच्या एका नेत्याचा हजारी यांना फोन आला. छाबुवातील काही मजूर पायीच मध्य प्रदेशला निघाल्याची माहिती त्यांनी हजारी यांनी दिली. हजारी यांनी त्वरित आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने या मजुरांचे लोकेशन शोधून, त्यांना थांबवले. सर्वोपरी मदत केली आणि नंतर पालघरहून निघालेल्या पहिल्या मजूर रेल्वेमधून हे प्रवासी मजूर मध्य प्रदेशला आपल्या गंतव्यस्थानी सुखरुप पोहोचले.
 
अशा या कोरोना काळात स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून मनोभावे कार्यरत होत्या त्या परिचारिका. पालघर, बोईसरहून मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये दररोज ६०-७० परिचारिका प्रवास करुन आपली जबाबदारी लीलया पार पाडत होत्या. पालघर, बोईसरहून निघालेली एसटी त्यांना बोरिवलीपर्यंत सोडत असे. पुढे त्यांच्या रुग्णालयांच्या बसमधून या परिचारिका रुग्णालयात पोहोचायच्या. मात्र, बोरिवलीला बसमधून उतरल्यानंतर रुग्णालयाची बस येईपर्यंत या परिचारिकांचा एक तास फक्त प्रतीक्षेत जायचा आणि वेळेचाही अपव्यय व्हायचा. परिणामी, या परिचारिकांनी पालघर-बोईसरहून निघणाऱ्या एसटीचे वेळापत्रक त्यांच्या रुग्णालयाच्या बसच्या वेळापत्रकानुसार बदलण्याची मागणी लक्ष्मीदेवी हजारी यांच्याकडे आली. हजारी यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेत, एसटी आगाराला यासंबंधीची सूचना केली. पालघर एसटी प्रशासनानेही त्याची दखल घेत, एसटीच्या वेळापत्रकात योग्य ते बदल केले. त्यामुळे परिचारिकांच्या प्रवासाची येऊन-जाऊन तीन तासांची बचत झाली. याबद्दल परिचारिकांनीही हजारी यांचे आभार व्यक्त केले.
 
मदतकार्य हे कोणा एका व्यक्तीचे, नेत्याचे नक्कीच काम नाही. लक्ष्मीदेवी हजारी यांना यासाठी त्यांचे सुपुत्र आणि भाजपचे माजी पालघर शहराध्यक्ष तेजस हजारी यांची मोलाची साथ लाभली. त्याशिवाय निमेश शुक्ला, जसविंदर कोहली, प्रकाश जैन, कारुलाल जैन, विनेश परदेशी, गायत्री शर्मा, विनिया घरत या प्रमुख कार्यकर्त्यांसह इतर असंख्य भाजपचे कार्यकर्तेही ‘कोविड योद्धे’ म्हणून पालघरमध्ये कार्यरत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्यच नसल्याचे मत हजारी व्यक्त करतात. तेव्हा, एकूणच लक्ष्मीदेवी हजारी यांच्या सेवाकार्याने हजारोंना या महामारीच्या काळात दिलासा दिला असून एरवी सुखसमृद्धी घेऊन घेणारी लक्ष्मीची पावले, पालघरमध्ये अनेकांच्या अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशमान करणारी ठरली आहेत. हजारी आणि त्यांच्या समस्त टीमचे या कोविड काळातील सेवेबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
@@AUTHORINFO_V1@@