सेवा धर्म सर्वोपरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

gorkhe_1  H x W
‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळात कर्तव्य म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने गरजूंच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा गोरखे भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या प्रभाग क्र. १० मध्ये व्यापक स्तरावर अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरण केले. प्रत्येक ठिकाणी गरजूंना लागेल ती मदत त्यांनी केली. तेव्हा, त्यांच्या कोविड काळातील मदतीचा परिचय करुन देणारा हा लेख...
अनुराधा गणपत गोरखे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका
प्रभाग क्र. : १०, पिंपरी-चिंचवड मनपा
संपर्क क्र. : ९९७५००१९७८
‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो सर्वसामान्य नागरिकांना! गरीब, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणार्‍या स्त्रिया, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग-दिव्यांग या सर्वांना कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा त्रास सहन करावा लागला. सर्वसामान्यांचे हाल होऊ लागले. त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. अशातच समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने धावून येणार्‍या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी मदतीचा हात पुढे केला. सुरुवातीला गरजवंतांना दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी ठरविले. शाहूनगर, संभाजीनगर, दत्तनगर, शंकरनगर, परशुरामनगर, इंदिरानगर, लालटोपीनगर, टिपू सुलताननगर या सर्व ठिकाणी स्वतः लक्ष घालून त्यांनी सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेतल्या.
झोपडपट्टी वसाहतीमध्ये दि. २३ मार्चच्या ‘लॉकडाऊन’नंतर पाच-सहा दिवसांनंतर झोपडपट्टीमधील लोकांना दोन वेळच्या अन्नाची चिंता जाणवू लागली. त्यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी गरिबांच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घेतला. गोरखे यांनी महिलांची एक टीम तयार करून प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळेल, अशी सोय केली. नगरसेविकेबरोबर नेहमी पाठीशी असणार्‍या प्रत्येक महिलेने आपापले काम वाटून घेऊन स्वतःच्या हाताने अन्न तयार करून ते डब्यात भरून प्रत्येक गरजवंतांना पुरवले. जवळपास २५० गरजवंतांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवण्याचे काम सातत्याने तीन महिने केले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून खिचडी वाटप, कृष्ण मंदिराकडूनदेखील खिचडी वाटप करण्यात आले.ज्यांना दोन वेळचे जेवण आम्ही देऊ शकत नव्हतो, त्यांना आम्ही गहू, तांदूळ असे रेशनच्या किटचे वाटप केले. दोन वेळच्या अन्नापासून कोणीही वंचित राहू नये आणि प्रत्येकाला आपली पोटाची भूक भागवता यावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न अनुराधा गोरखे करत होत्या.‘लॉकडाऊन’ झाल्यामुळे प्रत्येकाला घरी गावाकडे जाण्याची ओढ होती. पण, ‘लॉकडाऊन’मुळे घरी जाणे शक्य नव्हते. अशावेळी लोकांची वैद्यकीय तपासणी करून, त्यांना लागल्यास पैसे देऊन घरी परतण्याची व्यवस्था गोरखे यांनी करून दिली.
प्रभाग क्र. १० मध्ये नगरसेविका अनुराधा गोरखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने प्रत्येक सोसायटीमध्ये, वसाहतीमध्ये सॅनिटायझर फवारणी, औषध फवारणी स्वतः लक्ष घालून करून घेतली. एखादा कोरोना रुग्ण सापडला तर आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना पसरू नये, याची खबरदारी घेतली जात होती. खरंतर सुरुवातीच्या काळामध्ये प्रभागामध्ये एकही रुग्ण नव्हता. कारण, पूर्ण खबरदारी घेतल्यामुळे प्रभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. एखादा कोरोना रुग्ण सापडला तर त्याच्या कुटुंबाची देखभाल अनुराधा गोरखे घेत होत्या. त्यांना मानसिक आधार दिला, तसे घरातले रेशन आणि कुटुंबीयांना बळ देण्याचे कामदेखील त्यांनी केले. अनेक वयोवृद्ध असणार्‍या लोकांना औषध वाटप, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप त्यांनी केले. प्रत्येकाला कोरोनाविषयी माहिती देऊन तो कसा रोखला जावा, याविषयीची जनजागृतीही त्यांनी केली.

gorkhe_1  H x W

सामान्यांच्या पाठीशी संकटकाळी उभे राहणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. ते मी प्रामाणिकपणे, निष्ठेने करणार. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मी नेहमी तत्पर व सक्षम पद्धतीने उभी राहून समस्या सोडवण्यावर अधिक लक्ष देईन व सामान्यांचा आधारवड म्हणून काम करत राहीन. सर्वसामान्यांना न्याय व हक्कासाठी नेहमी प्रयत्न करत राहीन.

अनुराधा गोरखे त्यांच्या प्रभागामध्ये या काळात घडलेला एक भावनिक प्रसंग सांगतात. त्यांचा एक कार्यकर्ता कोरोनाने दगावला. नुकतंच त्या व्यक्तीचे लग्न झाले होते. संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर होती. अशा प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना सावरून गोरखे यांनी धीर दिला. त्या म्हणतात, हा प्रसंग खरंच अंगावर काटा आणणारा होता.कोरोनाच्या काळात सर्वच सदस्य घरात असल्यामुळे अनेक झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये वाद, भांडणं होत होती. अशा प्रसंगी नगरसेविका या नात्याने स्वतः प्रत्यक्ष जाऊन कुटुंबीयांची समजूत काढून गोरखे त्यातून मार्ग काढत होत्या. त्यांना उदाहरण देऊन त्या गोष्टी पटवून द्यायच्या आणि प्रसंगी त्यांच्या काही समस्या असतील, तर त्या समस्या सोडवण्यावर त्यांचा अधिक भर असायचा. तसेच प्रभागातील कार्यकर्ते स्वतः या लोकांच्या समस्यांमध्ये लक्ष घालत आणि त्यांची समस्या सोडवत.अनुराधा गोरखे यांची मुलंदेखील कोविड काळातील या मदतकार्यामध्ये अग्रेसर होती. सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे आणि अमोल गोरखे यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन समाजसेवीरूपाने शक्य तितक्या लोकांना मदत केली.
अनुराधा गोरखे यांच्या प्रभागातील झोपडपट्टी वसाहतींमधील विद्यानगरचा स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आला. त्यांना दिल्लीमध्ये सन्मानित करण्यात आले. स्वच्छता मोहिमेमध्ये कोणताही देखावा न करता, स्वतः झाडू घेऊन नगरसेविका या नात्याने त्यांनी परिसर स्वच्छ केला.‘लॉकडाऊन’च्या आधी अनुराधा गोरखे यांनी आपल्या प्रभागांमध्ये वीज, पाणी तसेच ड्रेनेज व्यवस्थेशी संबंधित अशी वेगवेगळी कामे केली आहेत. प्रभागांमधल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नदेखील केले आहेत.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस वाटपदेखील केले आहे. तसेच शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन गोरखे यांनी कार्य केले आहे. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम दिले आहे. असे अनेकविध उपक्रम प्रभागामध्ये त्या सातत्याने राबवित असतात. यामध्ये त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचे सहकार्यही लाभते.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे गोरखे सांगतात. या सर्व कामांमध्ये कार्यकर्त्यांच्या बरोबरीने नंदा खरे, माई सांडभोर, सुप्रियाताई, सांनगुडे आणि सर्व बचत गटाच्या महिलांनीदेखील आपला विशेष सहभाग नोंदवविल्याबद्दल गोरखे आभार मानायला विसरत नाहीत.
- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@