भारत बंद ! वाचा कुठे काय बंद काय सुरू ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020
Total Views |

Bharat Band _1  
 
 
 
 


मुंबई : केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत विविध शेतकऱ्यांनी आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते व राजकीय पक्षांनी दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम करण्याची घोषणा केली होती. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील बैठका नि:ष्फळ ठरल्याने आज हे बंदचे हत्यार उपसण्यात आले आहे.
 
 
 
मुंबईत जनजीवन सुरळीत
 
महाविकास आघाडी सरकारने आज संपला पाठींबा दिल्यानंतर याचे मुंबईत पडसाद उमटणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना होता. मात्र, मुंबईत रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे आदी सार्वजनिक वाहतूकीवर कोणताही परिणाम जाणवलेला नाही. बेस्टनेही ८५ टक्के गाड्यांसह सेवा सुरळीत सुरू ठेवली आहे. एसटी महामंडळाने मात्र, सावध पवित्रा घेतला आहे. संवेदनशील ठिकाणच्या सेवा तात्पूरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. दादऱच्या भाजी मंडईत नेहमीप्रमाणे गजबज होती. मुंबईच्या डबेवाल्यांनी बंदला पाठींबा दर्शवला आहे.
 
 
ठाण्यातही जनजीवन सुरळीत
 
 
ठाणे जिल्ह्यातही मुंबई प्रमाणेच जनजीवन सुरळीत सुरू होते. बाजारसमित्या आणि अन्य व्यवहार बंद असल्याने बाहेरून येणाऱ्या वाहनांची आवक काहीशी कमी जाणवली. मात्र, दैनंदिन सर्व सोयी सुरळीत आहेत. 
 
 
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद
 
 
नवी मुंबईतील कृषि उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी आणि माथाडी कामगार आणि वाहतूक संघटना यांनी भारत बंदला पाठींबा दर्शविला आहे. नवी मुंबई, कल्याण येथील बाजार समितींच्या आवारात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार होणार नसल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एपीएमसीत आज मालाची आवक बंद राहणार आहे.
 
 
नगरमध्ये परिस्थिती नियंत्रणात
 
 
सहकार क्षेत्राचा दबदबा असलेल्या नगर जिल्ह्यात मात्र, जनजीवन सुरळीत सुरू आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंदला पाठींबा नसल्याचे निवेदन स्थानिक बाजारपेठा व व्यापारी संघटनांना केले होते. त्यानुसार आज सर्वकाही व्यवहार सुरळीत सुरू होते.
 
 
पुण्यातही दुकाने सुरू
 
 
पुण्यातील बाजारपेठा व्यापाऱ्यांनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील बाजार समित्यांतील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सर्व शेतकरी, आडत व्यापारी, व्यापारी संघटनांनी बंदला पाठींबा दर्शवला आहे.
 
 
कोल्हापूरात बंदचा परिणाम
 
 
पुणे-बंगळुरू महामार्गावर बंदचा परिणाम चांगलाच जाणवला. महामार्गावर वाहतूकीची वर्दळ कमी जाणवली. दूधाचे टँकर आणि अन्य अवजड वाहनांशिवाय वर्दळ कमी जाणवली. भाजीपाला, शेतमाल कोल्हापूरात पोहोचला नाही.
 
 
उत्तरेकडील राज्यांत तीव्र पडसाद
 
 
दिल्लीत भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांना नजरकैद केल्याचा आरोप केला आहे. उत्तरेकडील बिगर भाजप शासित राज्यांमध्ये बंदचा परिणाम जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी चक्काजाम सुरू आहे. राजस्थानच्या बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
 
शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा
 
 
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, यात काहीही निष्पन्न न झाल्याने आज बंदची हाक पुकारण्यात आली आहे. केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहणार की तोडगा निघणार याबद्दल उद्याच्या बैठकीत ठरेल.
 
 
केंद्राकडून राज्यांना नियमावली
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना नियमावली जाहीर केली आहे. बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी निर्देश देण्यात आले आहेात. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यभर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.





@@AUTHORINFO_V1@@