किन्नर - देवदासी संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

saf_1  H x W: 0
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वयम महिला मंडळाने आगळी वेगळी आदरांजली वाहिली. दि. ५ डिसेंबर रोजी ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’ येथे किन्नर आणि देवदासी भगिनींशी संवाद संपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये ४० किन्नर आणि २७ देवदासी महिला सहभागी झाल्या होत्या.
 
 
किन्नर आणि देवदासी हा समाजगट आजही तसा सामाजिक स्तरावर वंचितच. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली देण्यासाठी हा समाजगट एकत्रित जमला होता. या कार्यक्रमामध्ये किन्नर गुरू कामिनी घोडके, भावना महाडसे तसेच पायल या प्रमुख अतिथी होत्या. ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’च्या विश्वस्त प्रतिभा नातू आणि राधा भिडे, समाजसेवक मितेश शहा तसेच श्वेता शहा आदी मान्यवरसुद्धा यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. स्वयम महिला मंडळाच्या अध्यक्षा योगिता साळवी यांनी स्वयम महिला मंडळाने ‘किन्नर आणि देवदासी भगिनी संपर्क आणि संवाद’ हा उपक्रम का राबवला, याबाबत प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रतिभा नातू यांनी ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’बद्दल माहिती दिली. आपले मनोगत मांडताना किन्नर भगिनी मोहिनी यांनी किन्नर समाजाच्या व्यथा मांडल्या, तर कामिनी घोडके म्हणाल्या की, ”बाबासाहेब आंबेडकरांचे समाजातील शोषित वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी खूप काम केले. आज समाजातला ‘नाही रे’ गट इज्जतीने जगतोय, तो केवळ बाबासाहेबांच्या कायद्यामुळे. बाबासाहेबांनी आणि त्यांच्या विचारांनीच आज समाजात किन्नर हे आपली ओळख दर्शवून जगू शकतात. समाजाने किन्नरांना खूप सहकार्य आणि स्नेह दिला आहे. कोरोना काळात किन्नर समाजानेही सेवाकार्य राबवले. समाजातील एक घटक म्हणून सेवाकार्याचा खारीचा वाटा उचलला.” यावेळी भावना महाडसे यांनी ‘जय भीम’चा उद्घोष करत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच किन्नरांच्या स्थितीवर भाष्य केले, तर पायल यांनीही किन्नरांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी समाज आणि प्रशासनाने व्यापक भूमिका घ्यावी, असे आग्रही मत मांडले. त्यानंतर राधा भिडे यांनी राष्ट्र सेविका समितीची एकंदर मानवी मूल्यांबाबतची भूमिका मांडली. या परिप्रेक्ष्यात किन्नर आणि देवदासी भगिनी या भारतीय आहेत. त्यांच्या सुखदु:खाशी समिती समरस आहे. किन्नर भगिनी आणि देवदासी यांना समस्या असतील, काही सहकार्य हवे असेल तर समिती किन्नर आणि देवदासी भगिनींच्या सोबत आहे. तसेच किन्नर आणि देवदासी भगिनींच्या सकारात्मक प्रगतीसाठी राष्ट्र सेविका समिती सोबतच राजमाता जिजाऊ ट्रस्टचे दरवाजे सदैव उघडे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मितेश शहा आणि श्वेता शहा यांनी किन्नर आणि देवदासी भगिनींना ‘स्नेहाची भेट’ म्हणून साडी वाटप केले.
 
 
 
यावेळी उपस्थित किन्नर आणि देवदासी भगिनींनी संवाद साधताना सांगितले की, आम्ही शोषित-वंचित समाजातीलही शोषित-वंचित आहोत. किन्नर म्हणून जन्माला येऊ नये हे काही आमच्या हातात नसते. पण तरीही किन्नर म्हणून जन्मले की आमच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू होतात. आम्हाला इज्जतीचे स्वाभिमानाचे जगणे जगायचे आहे. पण आम्हाला कुणीही नोकरी देत नाही. आमच्यातल्या कितीतरी जणी उच्चशिक्षित आहेत. पण तरीही आम्हाला कुणीही नोकरी देत नाही. आम्हालाही आमच्या आईने नऊ महिने उदरात वाढवलेले असते. आम्हालाही मन असते. पण आम्हाला पशूपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोटी कोटी कुळांचा उद्धार केला. त्यांच्या संविधानानेही माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार दिला. पण हा कायदा समाजात रूजायला हवा. तसेच काही देवदासी भगिनींचे म्हणणे होते की सरकारने खूप काही योजना केल्या. तुम्हाला घर देतो असे सांगत काही जणांनीं आमचे फॉमर्र्ही भरले पण वर्षामागून वर्षे गेली, तरी आम्हाला घरं मिळाली नाही. कोणतीच सुविधा मिळत नाही. आम्हालाही माणसारखं जगायचं आहे. आता आम्ही आमच्या कायेदशीर सुविधा मिळवण्यासाठी संघटित झालो आहोत. स्वयम महिला मंडळाने आम्हाला साथ द्यावी, मार्गदर्शन करावे. तीन तास चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये किन्नर आणि देवदासी भगिनींनी आपल्या व्यथा आणि कथा मांडल्या. तसेच प्रतिष्ठित समाजामध्ये आम्हाला बोलवून मानाचे पान दिलेत. व्यासपीठावर मान्यवर स्त्रियांसोबत बसू दिलेत, यासाठी आभार मांडले. त्यांचे म्हणणे होते. आम्हाला माणूस म्हणून सन्मान दिला, हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ! असो या कार्यक्रमाचे अत्यंत देखणे आणि आटोपशीर सूत्रसंचालन केले ते संतोष शिंदे यांनी. तसेच कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका वैशाली. समाजसेविका मानसी पराडकर, मेघा तांदळेकर, राहुल साळवे, प्रथम पराडकर, भावेश तांदळेकरही उपस्थित होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@