कधीही जुने न होणारे ‘नवीन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

Navin Tambat_1  
 
 
आपल्या कार्याने मृत्यू पश्चातदेखील जीवंत असणारे नाशिक येथील ज्येष्ठ तबलावादक व विद्यार्थीप्रिय शिक्षक नवीन तांबट यांच्याविषयी...
 
 
व्यक्ती हयात असताना सर्वांच्याच स्मरणात असते. मृत्यूपश्चातदेखील काही वर्ष एखादी व्यक्ती समाजाच्या स्मरणात असते. मात्र, काही व्यक्ती या समाजासाठी कधीही जुन्या होत नाहीत. त्यांचे शरीररुपी अस्तित्व असो वा नसो त्या कायमच प्रत्येकाला आपल्या जीवनात नवीनच वाटत असतात. म्हणूनच त्या व्यक्ती चिरकाल असतात. असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे नवीनचंद्र तांबट. तांबट यांचे नुकतेच निधन झाले. ज्येष्ठ तबलावादक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशीच त्यांची ओळख आहे. १९७० मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूलमध्ये त्यांनी अविरत सेवा केली. चित्रकला व हस्तकला शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांना कलेची गोडी लावण्यात कायम कार्यमग्न असलेले दिसायचे. नवीन तांबट ज्यावेळी सेवेत होते तेव्हा संगीत हा विषय अध्यापनात नव्हता. मात्र, त्यांनी संगीताचे ज्ञान व माहिती देत विद्यार्थी वर्गात संगीताची गोडी वाढविण्याचे कार्य केले. समूहगीत बसविणे हा त्यांचा हातखंड असणारा विषय होता. २५ ते ३० हजार मुलांना एकत्र करून बाळ देशपांडे व तांबट एकत्र समूहगीत बसवायचे. एवढ्या मोठ्या संख्यने एका तालासुरात विद्यार्थ्यांकडून समूहगीताचे गायन करून घेणे ही किमया केवळ नवीन तांबटच साधू शकणारे होते.
 
 
 
तांबट यांचे वडील मूर्तिकार होते, तर भाऊ कलाकार व मूर्तिकार होते. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला, असे आपण एका अर्थी म्हणू शकतो. मात्र, कलेची रुची वाढविणे आणि ती वृद्धिंगत करणे याबाबतीत तांबट यांनी केलेले कार्य निश्चितच शब्दातीत आहे. शांत मुद्रा, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य, डोळ्यात कायम धीर देणारे आश्वासक भाव, सकारात्मक विचार तसेच प्रकटीकरण ही तांबट यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगता येतील. कोणलाही चटकन मदत करणारे व्यक्ती अशीच तांबट यांची ख्याती होती आणि आजही आहे. त्यांचा सहवास हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आणि प्रभावित करणारा असाच असे. प्रश्न कोणताही असो उत्तर नवीन तांबट अशीच प्रतिमा त्यांची होती.
 
 
कोणताही कार्यक्रम असो ते पहिल्यांदा मंचाचा ताबा घेत. तेथील सर्व व्यवस्था चोख आहे किंवा नाही याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे. सर्वात आधी नवोदितांना संधी देणे हाच त्यांचा पायंडा असे. कोणत्याही कार्यक्रमाच्या यशस्वीततेचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही. काम करणे हे माझे कर्तव्यच होते. मात्र, अमुक कार्यक्रम हा तुमच्यामुळे उत्तम झाला असे म्हणत ते सहज स्वत:ला अलिप्त ठेवत असत. तबलावादनात त्यांची कीर्ती मोठी होती. आघाडीचे गायक-संगीतकार नाशिकमध्ये कार्यक्रम करण्याआधी तबल्यावर साथ देण्यासाठी नवीन उपलब्ध आहे काय अशी विचारणा करत. आजवर त्यांनी श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, सुधीर फडके यांसारख्या अनेकविध मान्यवर कलाकारांना साथ संगत केली आहे. त्यांची पत्नी शुभदा तांबट यादेखील भावगीत गायिका असून मुलगा निनाद हा संगीतकार म्हणून वडीलांचा वारसा पुढे नेत आहे. स्वरदा सुगम संगीत क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांनी आजवर घडविले आहेत.
 
 
नवीन तांबट गेल्याची बातमी जेव्हा नाशिकमध्ये समजली तेव्हा आपल्याच घरातील व्यक्तीचे देहावसन झाले, असे भाव अनेकांच्या मनात दाटून आले. अजातशत्रू कलाकाराच्या निधनाने खरोखरच संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. सर्व कलाकारांना एका सूत्रात बांधणारे उत्तम समन्वयक असे त्यांचे वर्णन केले तर वावगे ठरणार नाही. नवीन तांबट खरे माणूस होते, हीच भावना नाशिककर नागरिकांची आहे. कालच वर्गात तास घेणारे सर आज निवर्तले आहेत, असेच भाव माजी विद्यार्थ्यांचे आहेत. कलाशिक्षक म्हणून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संबंध येत. मात्र, शाळा सोडल्यावर वयाची पन्नाशी पार केल्यावरदेखील पेठेचे नाव काढले की एक ‘कॉमन नाव’ सर्वांच्या मुखी असे ते म्हणजे तांबट यांचेच. नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात त्यांचा असणारा मोठा वावर यामुळे विद्यार्थी वर्गातदेखील साहित्य, कला याबाबत अभिरुची निर्माण होण्यास मदत झाली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ एक पणती प्रज्वलित करण्यात येत असते. त्यासाठी एका वर्षात कोणत्या कलाकाराचे निधन झाले याची माहिती तांबट देत. ती माहिती अशी असे की त्याबाबत फारसे कोणास माहीत नसे. एवढे महत्त्वाचे व आपल्या परिघाबाहेरचे काम करूनही तांबट यांनी त्याचे कधी श्रेय घेतले नाही. बुजरा विद्यार्थी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास मागे राहत असेल तर, त्यास प्रेमाने समजून सांगत त्याच्यातील न्यूनगंड दूर करण्याची किमया केवळ तांबट हेच साधू शकणारे होते. माणूसप्रिय व्यक्तिमत्व म्हणून तांबट ओळखले जात. मृत्यपश्चातदेखील जीवंत राहणे हे कर्माने कसे सहज शक्य आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण नवीन तांबट होते. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@