समाजसेवक

    07-Dec-2020
Total Views |

Samaj Sevak _1  




कोरोनाकाळात कर्मचारी, वनवासी, कामगार व मदतीपासून वंचित खेड्यापाड्यांतील गरिबांसाठी समर्थपणे उभे राहत सामाजिक कार्याची आवड व समाजाप्रति बांधिलकी जपत सच्चा लोकसेवक राजू सत्यनारायण पिचीका यांनी मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, न्याहरी व भोजन वितरणाची मदत, पेण शहरासह ग्रामीण भागात व उर्वरित रायगड जिल्ह्यात तत्परतेने केली. रुग्णांना सहज उपलब्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते राजू पिचीका यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.

 
 
 

राजू सत्यनारायण पिचीका

कार्यक्षेत्र : रस्ते व बांधकाम व्यावसायिक, पेण

संपर्क क्र. : 9850015383

 
 

कोविड’चे सुरुवातीचे दिवस होते. ‘कोविड’ रुग्ण म्हटला की, माणसाचं जनावर होई. भाऊ भावाला ओळखत नसे, रक्त रक्ताला ओळखत नव्हतं. आजूबाजूचा समाज मदतीचा हात जाऊ दे, बोटाचं नखही द्यायला तयार नसे. ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबईतून कित्येक कुटुंब कोकणात रायगडकडे निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे येत असल्यासारखे मुंबई-गोवा महामार्गावरून, कोकण रेल्वेच्या रुळावरून जन्मगावाकडे, कर्मभूमीकडे आपल्या मुलाबाळांसह रणरणत्या उन्हातून पायी निघाले होते.

 
 

रस्त्यावर शुकशुकाट, खाण्याची, पिण्याचे पाणी मिळण्याची मुश्कील येऊन ठेपली होती. महामार्गावर चिटपाखरू नव्हते. वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबलेली. अगदी हृदय पिळवटून टाकणारे ते दृश्य होते. लहान कच्चेबच्चे मैलोन्मैल चालून थकलेले. पायाला फोड आलेले पाहणार्‍याच्या डोळ्यात टचकन पाणी यायचे. महामार्गावर शासन व्यवस्था नव्हती. रस्त्यालगतच्या गावातील सारे नागरिक हतबल झालेले दिसत होते.

 
 

जनतेला सहज उपलब्ध असलेला सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक हा जन्माला येत नाही, तो इथे घडतो. ज्या माणसाचे मन संवेदनशील असते, ज्यांच्यात थोडी बंडखोरी असते, जे प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला घाबरत नाहीत, तेच समाजसेवक होतात. यालाच अनुसरून ही सारी विदारक परिस्थिती असताना राजू पिचीका यांच्यातील समाजाप्रतिची बांधिलकी जागी झाली आणि त्यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी पुदलवाड मॅडम, उपविभागीय अधिकारी डीवायएसपी नितीन जाधव, तहसीलदार अरुणा जाधव यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शनाखाली आणि आपल्या स्वखर्चाने पेण तालुक्याच्या सरहद्दीवर खारपाडा गावापासून रायगडच्या अखेरच्या हद्दीपर्यंत पोलादपूरपर्यंत प्रवासी बसेस विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. मधल्या गावासह पायपीट करून येणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा दिला व आपल्या जन्मगावी राहत्या गावी पोहोचवण्याचे काम केले. यावेळी नागरिकांच्या चेहर्‍यावरील समाधान व आशीर्वाद शब्दात व्यक्त करता येणार नाहीत.

 
 

Samaj Sevak _3   
 

"कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव होताना दिसतोय. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून स्पेशल टास्क टिमद्वारे घराघरांतून पोहोचून आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोना आजही आहे आणि या विषाणूचा धोका तितकाच तीव्र आहे. आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. अशा केविलवाण्या परिस्थितीत कोणीही आजार अंगावर काढू नका. कोणतीही लक्षणे आढळल्यास याकडे दुर्लक्ष करू नका."



कोरोनाग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून दोन रुग्णवाहिकाही सरकारी दवाखान्यात लोकार्पण केल्या. याच बरोबर मोफत कार्डियाक रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सोयी व रुग्णाबरोबर पूर्णवेळ डॉक्टर आणि रुग्णसेविकाही उपलब्ध आहे. तसेच ‘निसर्ग’ चक्रीवादळात रायगडमध्ये क्षतिग्रस्त गावांना पूर्वस्थितीवर येण्यासाठी यांत्रिकी वाहनांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून दिली. परप्रांतीय नागरिकांसाठी गावाकडे जाताना न्याहरी व झारखंड येथे आपल्या गावामध्ये जाण्यासाठी प्रवासी बसही मोफत उपलब्ध करून दिल्या. या सार्‍या कामाची सरकारी दप्तरी दखल घेतली गेली आणि रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते समाजभूषण राजू पिचीका यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 
 


Samaj Sevak _2   
 
 
 

समाजकार्यासाठी सातत्याने धाव घेणारे लोकसेवक राजू पिचीका यांना या कार्यासाठी त्यांच्या पत्नीसह कुटुंबाने मोठी साथ दिली. याचबरोबर त्यांचे सहकारी प्रकाश झावरे हेसुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हेही उल्लेखनीय आहे. आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, डीवायएसपी नितीन जाधव, तहसीलदार अरुणा जाधव, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, आर.टी.ओ. यांनीही मार्गदर्शन करून बहुमोल सहकार्य केले. कोरोनावर मात करण्यासाठी आजारी नागरिकांनी घरी बसून न राहता स्वतःची व कुटुंबातील आजारी व्यक्तींची सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून आरोग्याची काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू पिचीका यांनी केले आहे.

 
 

- आनंद जाधव

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.