समाजातील सज्जनशक्ती संघटित होण्यासाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2020   
Total Views |

Savita Dudhbhate_1 &
 
सोलापूर शहरात आदर्श शिक्षिका आणि समाजनिष्ठ समाजसेविका म्हणून लौकिक असलेल्या सविता दुधभाते. समाजात सकारात्मकता, ध्येयनिष्ठता निर्माण व्हावी म्हणून त्या कार्य करतात. त्यांच्या जीवनकार्याचा हा आढावा.
 
 
 
'महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच’च्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि ‘धनगर धर्मपीठा’च्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सविता दुधभाते यांचे वैचारिक कार्य आणि सामाजिक जाणिवा स्त्रीशक्तीची प्रतिमा आणि प्रतिभाच आहे. पंढरपूरच्या एका बी.एड. महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या उच्चशिक्षित सविता; पण इथेपर्यंत येताना त्यांना आयुष्यात बरेच चढ-उतार सहन करावे लागले, बराच संघर्ष करावा लागला.
 
 
 
हा संघर्ष समाज मानसिकतेचा, कुटुंबाच्या आर्थिकतेचा होता. या सगळ्यांवर मात करत सविता आज समाजात यशस्विनी म्हणून सिद्ध झाल्या आहेत. आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना विविध संस्थांकडून जिल्हा आणि राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. शैक्षणिक विषयावर सध्या त्या पीएचडीही करत आहेत. हे सगळे करताना सविता या महाराष्ट्रभर महाराष्ट्राचे आदर्श महापुरुष आणि महान स्त्रिया यांवर व्याख्यान देतात, तसेच गावखेड्यांमध्ये शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन काय आहे, त्याला सकारात्मकता कशी यावी, यासाठीही त्या काम करतात. आजही धनगरवाड्यावर किंवा इतर पालावरही पालक मुलांच्या शिक्षणाबाबत पालक सकारात्मक असतात का? त्यांना किती आणि कशा अडचणी येतात, या सगळ्यांचा आढावा घेऊन शिक्षणाच्या स्वरूपाला कसा आकार असावा? यासाठी सविता अभ्यास करतात. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात. मुळात पालकांना मुलांचे शिकणे महत्त्वाचे वाटले पाहिजे, यासाठी सविता समाजामध्ये प्रबोधन करतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समाज प्रबोधन मंचाच्या माध्यमातून त्या समाजामध्ये कार्य करतात. समाजप्रबोधन करण्यासाठी किंवा जागृती करण्यासाठी नकारात्मकता न अवलंबता, समाजाला सोबत घेऊन त्यांच्या श्रद्धांना तडा न देता प्रबोधन केले पाहिजे, असा सविता यांचा विश्वास आहे, तर धनगर धर्मपीठाच्या माध्यमातून त्या समाजापुढे धर्मजागरणाचेच काम करतात. समाजाच्या आयाबायांनी समाजाची सकारात्मक परंपरा जपावी, आपल्या पुढच्या पिढीला संस्काराचा वारसा द्यावा, याबाबतचे प्रबोधन सविता करत असतात.
 
 
 
आज जागतिकीकरणाच्या विळख्यात नात्यांची चौकट विस्कळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजाला कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचे काम घरातील आयाबायाच करू शकतात, हे नक्की. त्यामुळे घरातील स्त्रीशक्तीला सबल करणे हे महत्त्वाचे काम सविता करत असतात. आज सबल आणि सक्षम असणाऱ्या सवितांचे समाजप्रबोधन कार्य विविध आयामात सुरू आहे. या पाठीमागे कुणाची प्रेरणा असावी? तर सविता यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला तर जाणवते की, त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी आणि आईचा खंबीर आदर्श यामुळेच सविता इथेपर्यंत येऊ शकल्या. उस्मानाबादच्या एका खेड्यातले दुधभाते कुटुंब. शिवाजी आणि सुकुमार हे दाम्पत्य. धनगर समाजाच्या परंपरेने यांच्याही घरात मेंढ्या-बकरींचा गोतावळा. शिवाजी एमएससीबीमध्ये कामाला होते. शिवाजी आणि सुकुमारबाई यांना चार अपत्ये, त्यापैकी एक सविता. शिवाजी मुलांना सांगायचे की, “तुम्ही शिका. शिकल्याशिवाय काही मिळत नाही. तुम्ही इंजिनियर-डॉक्टर व्हा. मी, आहे ना.”
 
 
 
त्यामुळे सविता यांनी लहानपणापासूनच ठरवले की, आपण खूप शिकायचे. आयुष्यात काही तरी बनायचे. पण, एके दिवशी दुधभाते परिवारावर आकाश कोसळले. त्यावेळी सविता आठवीला शिकत होत्या आणि बातमी आली शिवाजी यांचा कामावरच मृत्यू झाला. शॉक लागून ते वारले. सुकुमारबाईंचे शिक्षण अवघे चौथी. घराबाहेर कामाशिवाय कधीही पडणे नाही. चार मुलांचे कसे होणार? मात्र, सुकुमारबाई खचल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर त्या त्यांच्या जागी दयातत्त्वावर कामाला लागल्या. शिपाई म्हणून अवघे ५०० रुपये महिन्यावर नोकरी करू लागल्या. घरची थोडी शेतीभाती आणि मेंढ्या-शेळ्यांचे करून त्या कामाला जात. मात्र, मुलांनी शिकावे, आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करावी, यावर त्यांनी कटाक्ष दिला. शिवाजी यांचे निधन झाल्यावर कित्येक जण त्यांना सांगू लागले की, “कशाला पोरीला शिकवता, बस करा. लावा लगीन तीच.” पण, सुकुमारबाईंनी एकले नाही. काटकसर करून, खूप कष्ट करून त्यांनी सविता यांना शिकविले. आज सविता यांना प्राध्यापक आणि समाजसेविका म्हणून समाजात आदराचे स्थान मिळाले आहे. सविता म्हणतात, “माझ्या आईचा आदर्श माझ्यासमोर आहे. महाराणी अहिल्याबाई आणि माता सावित्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून अस्तित्व निर्माण करणारे सगळेच माझे आदर्श आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी राजसत्ता यशस्वीपणे सांभाळली. तसेच, धर्मकारणही केले. त्यांचे वारसदार आपण आहोत. त्यामुळे समाजातील कुणीही विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता, त्यावर मात करावी, यासाठी मी कार्य करते. तेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. समाजातील सज्जन शक्तीला संघटित करणे महत्त्वाचे.” संघर्ष करून आयुष्य घडविणाऱ्या सविता यांचे आयुष्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@