बाबासाहेबांचे शिक्षणातील योगदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

dr 1 ambedkar _1 &nb
 
 
 
 
बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षणतज्ज्ञ होते, एवढचे नव्हे तर ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’, ‘दलित वर्ग शिक्षण संस्था’, ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ अशा विधायक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार केला. शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा प्राप्त करवून दिला. शिक्षणविषयक तरतुदींना घटनात्मक संरक्षण प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब सर्वार्थाने महान शिक्षणतज्ज्ञ तर ठरतातच; मात्र भारतीय शिक्षणविषयक स्वातंत्र्य व अधिकारांचे खरे व खंबीर व भक्कम संरक्षणसुद्धा ठरतात. अशा या महामानवाला, युगपुरुषांना त्यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ त्रिवार अभिवादन!
 
 
 
 
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ हा उद्धाराचा राजमार्गच बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीयांना दिला. म. फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, विषमतानिर्मूलनाच्या कार्याचा वारसा डॉ. आंबेडकरांनी पुढे चालविला आणि त्यांना गुरुस्थानी मानून सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक सक्षम बनविले. शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण होय, असे त्यांचे मत होते. शांताराम गरुड यांच्या मते ‘शिक्षणाची ओढ, अध्यापन निष्ठा, यांचे पूर्वसंचित आणि महात्मा फुले यांच्या समाजपरिवर्तनासाठी प्रबोधन, संघटन व आंदोलन यांच्या लोकविलक्षण कार्यसिद्धीचे सांस्कृतिक पूर्वसंचित अशी अनेकविध पूर्वसंचितांची शिदोरी पचवित डॉ. बाबासाहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडलेले आहे.
 
 
 
 
लंडनमधून ‘बॅरिस्टर’ ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्यभर भारतीय समाज व्यवस्थेने शोषण केलेल्या शोषित समाजासाठी कार्य केले आणि संविधानात्मक तरतूद करून त्यांच्या अधिकारांना बळकटी दिली. ३१ जानेवारी, १९२० पासून ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. २० जुलै, १९२४ला ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली तसेच ‘बहिष्कृत भारत’ पाक्षिक सुरू केले. आणखी ‘प्रबुद्ध भारत’ हे एक नवीन पाक्षिक सुरू केले. भारतीयांच्या उद्धारासाठी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील बाबासाहेबांचे कार्य फार श्रेष्ठ असून वाचनालये, समाजकेंद्रे, अभ्यासमंडळे, वसतिगृहांच्या सोयी करून शोषितांना शिक्षणाची प्रेरणा दिली. सभा, मेळाव्यांमधून समाजजागृतीचे कार्य त्यांनी केले.
 
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनविषयक विचार
 
 
 
१) मूल्यांचे अधिष्ठान: डॉ. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांच्या अधिष्ठानावर उभे होते. व्यक्तीविकासासाठी आवश्यक मूल्यांची रुजवण समाजात होणे गरजेचे आहे.
 
 
२)समता: बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर अस्पृश्यता, जातीयता यांचा विरोध केला. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये असणार्‍या श्रेष्ठ/कनिष्ठत्वाचा त्यांनी जोमाने प्रतिकार केला. समतेचे मूल्य समाजमनात निर्माण केल्याखेरीज भारतीय समाज प्रगती करू शकणारच नाही, असे त्यांचे मत होते.
 
 
 
 
३) शोषितांमध्ये, मागासवर्गीयांत ‘स्व’ जाणीवनिर्मिती : समाजव्यवस्थेच्या विळख्यात अडकलेल्या शोषितांमध्ये स्वाभिमान निर्माण केल्याखेरीज ते प्रगती करू शकणारच नाहीत. त्यासाठी शिक्षणाखेरीज दुसरा मार्ग नाही, असे बाबासाहेबांचे मत होते.
 
 
 
४) शोषणविरहित समाज : बाबासाहेबांच्या मते, समाजात सर्वांना स्थान मिळायला पाहिजे. जीवन स्वातंत्र्य हवे.सर्वांना संधीची समानता हवी
 
 
५) धर्मनिरपेक्ष वृत्ती व दृष्टिकोन : बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला. प्रत्येक भारतीय नागरिक हा धर्मनिरपेक्ष बनावा, अशी त्यांना माफक अपेक्षा होती. मानवी जीवनाला धर्मनिरपेक्षतेचे अधिष्ठान असल्यास धार्मिक प्रदूषण टाळले जाऊन सर्वधर्मसमभाव निर्माण होतो आणि लोकशाही बळकट होते. धर्माचे प्राबल्य नष्ट झाल्याने सामाजिक विषमता नष्ट होईल, असे त्यांचे मत होते.
 
 
६) राष्ट्रनिष्ठा: व्यक्तीमध्ये राष्ट्रनिष्ठा असायला हवी. कोणताही स्वार्थ हा राष्ट्रीयत्वाच्या वर नाही.राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देऊनच प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजाविल्यास भारतीय समाज प्रगती करेल अणि राष्ट्रीय एकात्मता अखंडित राहील, असा त्यांचा विश्वास होता. मात्र, आज राष्ट्रनिष्ठेच्या गोंडस नावाखाली धार्मिक बाजार करणार्‍यांमुळे देशातील सौंहार्दता खंडित होते की काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
 
 
७) शिक्षण : बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यात सर्वोच्च स्थान हे शिक्षणाला दिले. शिक्षणामुळे मानवी मेंदू प्रगत होतो. ज्ञानाचा विस्तार होतो. बर्‍या-वाईटाची कल्पना प्रगत होते. शिक्षणामुळे सामाजिक उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी व्यक्ती सामाजिक कर्तव्यांबाबत नेहमी सजग राहतो., व्यक्तीचे जीवन शिक्षणाशिवाय अपूर्ण राहते.



८) संघटन व संघर्ष : नागरिकांनी अन्यायाचा प्रतिकार करायला हवा. प्रत्येक समाजविघातक, राष्ट्रविघातक आणि नागरिकांच्या अधिकारांवर अन्यायाविरुद्ध ‘शड्डू’ ठोकून उभे राहावयास हवे. स्वत: बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्षमय राहिलेले आहे. भावी पिढीसाठी मात्र त्यांनी संविधानात तरतूद करून ठेवली. मात्र, त्या तरतुदीची योग्य व प्रभावी अंमलबजावणी न केल्याने भारतीयांना आजही संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.
 
 
 
९)धम्ममार्ग : तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्ममार्ग जो संपूर्ण भारतभर होता, त्यातूनच जातीअंताची लढाई लढता येईल व सामाजिक समता प्रस्थापित करता येईल, असा बाबासाहेबांचा आग्रह होता. प्रत्येक मानवाने धम्ममार्ग आचरणात आणल्यास शांती व समता निर्माण होईल याची साक्ष स्वत: इतिहास देतो.
 
 
 
बाबासाहेबांचे शिक्षणाविषयक विचार व शिक्षणाविषयक संविधानात्मक तरतुदी
 
 
“शिक्षण म्हणजे, सर्वसामान्यांचे प्रबोधन, संघटन म्हणजे, जनसामान्यांचे संघटन आणि संघर्ष म्हणजे, सर्वसामान्य माणसाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पुकारवयाचे बंड होय. व्यक्तीला अन्यायाविरुद्ध उठाव करण्याचे सामर्थ्य आणि जाणीव केवळ शिक्षणामुळेच होते,” असा बाबासाहेबांचा विश्वास होता. त्यामुळे घटनेच्या ४५व्या कलमान्वये वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनव्यवस्थेची असल्याची तरतूद त्यांनी केली.
 
 
 
शिक्षणात धार्मिक प्राबल्य निर्माण होऊ नये, यासाठी घटनेतील २८व्या कलमान्वये पूर्णत: राज्याच्या पैशातून चालविल्या जाणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, अशी तरतूद बाबासाहेबांनी केली. बाबासाहेब म्हणतात. “सर्व जाती-जमातींना समानतेच्या एका पातळीवर आणण्याचा एकमेव उपाय म्हणजे असमानतेचे तत्त्व नाकारणे हा आहे.” भारतीय संविधान भाग ४ मध्ये ३६ ते ५१ यात निर्देशक तत्त्वे प्रस्तुत करण्यात आली. त्यातील क्र. ३८ मध्ये लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी समाजव्यवस्थेत प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
 
 
 
क्र. ३९ मध्ये समान न्याय व कायदेविषयक मोफत साहाय्य उपलब्ध करून देईल. क्र.४१ मध्ये कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता लोकसाहाय्याचा हक्क उपलब्ध करण्यासाठी शासन परिणामकारक तरतूद करेल. क्र.४२ मध्ये कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक साहाय्यासाठी तरतूद. क्र.४३ मध्ये कामगारांना काम, निर्वाहवेतन, समुचित जीवनमान फुरसतीच्या आणि सामाजिक सांस्कृतिक संधीची शाश्वती देणार्‍या परिस्थितीची हमी दिली.
 
 
 
क्र.४८ मध्ये नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी, यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. क्र.४५ मध्ये संविधान लागू झाल्यापासून १४ वर्षे सक्तीचे व मोफत शिक्षण देण्यात येईल. क्र. ४६ मध्ये अनुसूचित जाती व जमाती व इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध संवर्धन करण्यास प्रयत्नशील राहील. क्र. ४७ मध्ये आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य राहील. राज्य धोरणांच्या निर्देेशक तत्त्वांमध्ये या संविधानात्मक तरतुदी करून विषमता निर्मूलनाचा भक्कम पाया बाबासाहेबांनी रोवलेला आहे.
 
 

अल्पसंख्याकांचे शिक्षण
 
 
३०वे कलम-धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शिक्षणसंस्था व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे. कलम ३०(२)नुसार शैक्षणिक संस्थांना साह्य देताना राज्य एखादी संस्था ही धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनांतर्गत आहे. या कारणावरून तिला प्रतिकूल होईल, अशा प्रकारे भेदभाव करणार नाही.
 
 
मागासवर्गीयांचे शिक्षण
 
 
कलम १७ नुसार : अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. अस्पृश्यतेचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. ‘अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. कलम १४ नुसार : राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा संरक्षण नाकारणार नाही. कलम १५ नुसार : राज्य कोणत्याही नागरिकांना प्रतिकूल होईल, अशाप्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अशा कारणांवरून भेदभाव करणार नाही. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी विशेष तरतूद केली जाईल.
 
 
 
कलम १६ नुसार : १६(१) राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजना अथवा नियुक्ती करताना यासंबंधी सर्वांना समान संधी असेल. १६(४)नुसार राज्यांच्या सेवांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, अशा मागासवर्गीयांसाठी नियुक्ती किंवा पदे राखून ठेवण्यास कोणतीही तरतूद करण्यात राज्यास प्रतिबंध नसेल. कलम ४६नुसार : राज्य जनतेतील दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती-जमातींच्या वर्गाला नियुक्ती, बढतीसाठी आरक्षण देण्यासाठी प्रतिबंध राहणार नाही.बाबासाहेब म्हणतात, “शिक्षण व्यक्तीच्या शरीरात भिनले पाहिजे. त्यामुळे त्याचे मन व शरीर सुदृढ राहील. शिक्षणाअभावी व्यक्ती पशुवत होईल म्हणून व्यक्तीला शिक्षणाची गरज आयुष्यभर राहते.” स्वतः बाबासाहेबांनी स्वतः अतिउच्च शिक्षण घेऊन संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला.


मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे चारित्र्य संवर्धन
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, ‘शिक्षण मूल्याधिष्ठित असावे. बालकांच्या मनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे झाला पाहिजे. शिक्षणाने त्याग, मानवता, विनम्रता, दुसर्‍यांची जाणीव, नैतिकता अशी मानवी मूल्ये विद्यार्थी मनावर रुजविली पाहिजे. जीवनाला मूल्यांची जोड असणे गरजेचे आहे. कारण मूल्य शिकविली जात नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये उपजत असलेल्या मूल्यांचा विकास केल्यास चारित्र्य संवर्धन होईल. उत्तम चारित्र्य असणारी व्यक्ती लोकशाहीचे खरे संरक्षक ठरतात.”
शिक्षणाने वैचारिक क्षमतेचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा ः शिक्षणामुळे व्यक्तीची वैचारिक क्षमता वृद्धिंगत होणे गरजेचे ठरते. शिक्षणामुळे बौद्धिक, मानसिक क्षमतेचा, अनुभव कक्षेचा विकास व्हावा, शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाला चालना मिळून व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे.
 
 
 
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे आणि क्रांतीचे प्रभावी साधन : समाजात अनेक गैरसमज, अनिष्ट प्रथा, परंपरा असतात. समाजपरिवर्तनासाठी त्यांचा बिमोड करणे आवश्यक असते. वैचारिक क्रांती व समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाचा वापर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे. सामाजिक व राष्ट्रीय प्रगतीसाठी प्रभावीपणे शिक्षण कार्यरत असले पाहिजे. महात्मा फुले, शाहू महाराज स्वतः बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तन, सामाजिक क्रांती करण्यासाठी शिक्षणाचा प्रभावी साधनांप्रमाणे वापर केला.
 
 
 
महिला कल्याण व स्वातंत्र्याला शिक्षणाने गती मिळते : केंद्रीय मंत्री असताना, ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडले. मात्र, संसदेत ते विधेयक फेटाळले गेल्याने मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब असे उदाहरण जगाच्या इतिहासात महिला स्वातंत्र्याविषयी आढळून येत नाही. घटनेतील ‘कलम ३९(क)’नुसार उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांना समान आहे.
 
 
 
 
कलम ३९(ख) नुसार: सामाजिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल, अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी. कलम ३९(घ) नुसार पुरुष व स्त्री या दोघांनाही समाज कामाबद्दल समान वेतन मिळावे. कलम ३९(ड) नुसार श्रमिक स्त्री व कोवळ्या मुलांचे शोषण होऊ नये. कलम ३९(च) नुसार स्त्री, बालक आणि युवकांना शोषणापासून आणि जैविक आणि भौतिक गरजांच्या बाबतीत आवश्यक संरक्षण दिले जावे. कलम ४२ नुसार कामांबाबत न्याय, मानवीय परिस्थिती, प्रसूतीविषयक साहाय्य उपलब्ध करण्यात येईल.
 
 
 
शिक्षणाने स्त्री-स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त होईल. यावर बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी संविधानिक तरतूद करून स्त्री-शिक्षण, अधिकार, स्त्री-संरक्षण यांना कायदेविषयक चौकट निर्माण केली व स्त्रीमुक्ततेचा मार्ग प्रशस्त केला. आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अधिकार संपन्नतेने संचार करत आहे, ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचीच फलनिष्पत्ती आहे.

 
 
- डॉ. राहुल हिवराडे
@@AUTHORINFO_V1@@