उन्मेष कल्पतरु परी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

unmesh inamdar_1 &nb


 

डोंबिवलीतील टिळकनगर कृत्रिम तलाव गणेश विसर्जन केंद्रातील पाण्यात उरलेल्या गणेशमूर्तींच्या शाडूच्या मातीपासून स्वत:च्या वडिलांची ‘लाईफ साईझ बस्ट’ तयार करणार्‍या उन्मेष इनामदार यांच्याविषयी...


उन्मेष यांच्या मनात त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यापासून त्यांचा एखादा पुतळा तयार करण्याचा विचार घोळत होता. महापालिकेने त्यांच्या कला क्लासच्या समोरच टिळकनगर कृत्रिम तलाव गणेश विसर्जन केंद्र उभारले होते. उन्मेश यांना एक भन्नाट कल्पना सूचली. त्यांनी या केंद्रातील कर्मचार्‍यांना सांगून विसर्जित गणेशमूर्तींची पाण्यातील शाडूची माती गोळा केली. कर्मचार्‍यांनीदेखील त्यांना ती आनंदाने दिली. पण, गेल्या वर्षी उन्मेष यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांचे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. मातीही तशीच पडून होती. पण, कोरोना आणि ‘लॉकडाऊन’ यांनी उन्मेष यांना हा ‘बस्ट’ तयार करण्यासाठी भरपूर वेळ दिला. हे काम उत्तम करण्यासाठी उन्मेष यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनीही प्रेरणा दिली. उन्मेष यांच्या क्लासमध्ये लहान मुले चित्र काढताना, आनंदाने बागडताना मातीच्या डोळ्यांनी का होईना, पण त्यांचे वडील हे सर्व पाहतील, असेच उन्मेष यांना वाटते. विशेष म्हणजे, अशाप्रकारे अर्धाकृती पुतळा तयार करण्याचा उन्मेष यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे.



उन्मेष यांचे शालेय शिक्षण ध. ना. चौधरी बहुउद्देशीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी सर. जे. जे. कला महाविद्यालयामध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. जे. जे. कला महाविद्यालयातूनच जाहिरात कलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर, त्यांनी ‘जाहिरात आर्टिस्ट’ म्हणून काम करण्यास सुरूवात केली. पण, त्या कामात त्यांचे मन फार रमले नाही. उन्मेष सांगतात की, “महाविद्यालयामध्ये असताना आसपासची मुले माझी चित्रे बघत असत. त्यांचे पालक सांगायचे, “तू जशी चित्रे काढतो, तशी आमच्या मुलांनाही शिकव.” रविवारी, सुट्टीच्या दिवशी ही सर्व मुले उन्मेष यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवण्यासाठी हौशीने जायची. मग उन्मेष जसे चित्र रेखाटत, तशीच मुलेही रेखाटू लागली.
 
 
 
 
बघता बघता या मुलांची संख्या वाढू लागली. उन्मेष हे जवळच असलेल्या पांडुरंग विद्यालयात दर रविवारी या मुलांना चित्रकला शिकवू लागले. पालकांच्या आग्रहाखातर या चित्रकलेच्या क्लासचे महिन्याचे फक्त चार रूपये शुल्क उन्मेष यांनी स्वीतारले. त्यातूनच डोंबिवलीतील पहिला चित्रकला छंदवर्ग 1981 साली सुरू झाले. उन्मेष यांचे जे. जे. महाविद्यालयामधील काही सहाध्यायीही यात सामील झाले. दर रविवारी हा उपक्रम चालू होता. विद्यार्थ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत होती. त्यामुळे त्यांनी जाहिरात कलेच्या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. उन्मेष हे अध्यापनाच्या क्षेत्राकडे वळले. जे. जे. महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर कला अध्यापन पदाविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. पण, त्या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी कलाअध्यापनाचा अनुभव लागतो. हा अनुभव मिळावा यासाठी दीड वर्षं मुंबईतील एका शाळेत कलाशिक्षक म्हणून त्यांनी काम केले.



त्यानंतर १९८९ मध्ये जे. जे.मध्ये पदव्युत्तर कलाअध्यापन पदाविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. हा अभ्यासक्रम पूर्ण होताच, त्यांनी आपला पूर्णवेळ अध्यापनासाठी देण्यास सुरूवात केली. उन्मेष यांचे दर रविवारी भरणारे वर्ग आता दररोज भरू लागले. कोणतीही जाहिरात न करता, या वर्गाला दूरवरुन विद्यार्थी येऊ लागले. विद्यार्थ्यांसाठी घरातील जागा अपुरी पडत असल्याने क्लाससाठी त्यांनी स्वतंत्र जागा घेतली. २००३साली क्लास स्वतंत्र जागेत सुरू झाला. उन्मेष हे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी देत असतात. ‘शंकर्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स कॉम्पिटीशन, नवी दिल्ली’ येथे आजवर त्यांच्या खूप विद्यार्थ्यांनी पुरस्कार मिळविले आहेत.
 
 
 
याशिवाय जपान येथील ‘कानागावा बेनियल वर्ल्ड चिल्ड्रेन्स आर्ट एक्झिबिशन’ आणि स्लोव्हेनिया येथील दरवर्षी होणार्‍या ‘इंटरनॅशनल आर्ट इव्हेंट’ येथेही शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची अशा प्रकारे संधी देणारी डोंबिवलीतील ही एकमेव कला अकादमी आहे. आर्किटेक्चर तसेच फाईन आर्ट्स व कमर्शियल आर्ट्स अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांची विशेष रीघ लागलेली असते. त्यामुळे क्लास ज्या जागेत भरत असे, ती जागाही अपुरी पडू लागली. २०१५पासून ‘उन्मेष इनामदार कला अकादमी’ व्यावसायिक जागेत स्थलांतरित करण्यात आली. या अकादमीमध्ये पहिली ते बारावी अशा विविध वयोगटांतील शेकडो विद्यार्थी दररोज कलेचे शिक्षण घेतात.
 
 
कलेतील अवघड भाग सोपा करून शिकविणे, तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिक दाखविणे, नक्कल करायला न शिकविता स्वनिर्मिती करायला शिकविणे, ही उन्मेष यांच्या शिकवणीतील काही वैशिष्ट्यं म्हणावी लागतील. या वैशिष्ट्यांमुळेच पालक आणि विद्यार्थी उन्मेष यांच्याकडे आकर्षित होत असतात. अकादमीचे दरवर्षी भव्य प्रदर्शन कलादालनात आयोजित केले जाते. उन्मेष यांच्या हाताखाली शिकून ८००विद्यार्थी आर्किटेक्ट झाले आहेत. सुमारे ३००विद्यार्थी फाईन किंवा उपयोजित कलाकार बनले आहेत.



अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम व गुणवत्ता पुरस्कार मिळविले आहेत. कोरोना काळातही त्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे.उन्मेष यांना त्यांचे वडील रामचंद्र इनामदार यांच्याकडून कलेचा वारसा मिळाला. त्यांचे वडील एक उत्कृष्ट चित्रकार, शिक्षक, कवी व समाजसेवक होते. दादर येथील बालमोहन विद्यालयात त्यांनी ३०वर्षे शिक्षक पदावर नोकरी केली. विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी व भूगोल शिकवितानाही ते चित्रकलेचा वापर करीत असत. २०१८साली वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचे निधन झाले. उन्मेष यांच्या मनात वडिलांचा पुतळा तयार करण्याचा विचार तेव्हापासून होताच. कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना हा अर्धपुतळा तयार करण्यात यश आले. त्यासाठी त्यांनी गणपतीची विसर्जित केलेली शाडूची माती वापरल्याने तो एक आगळावेगळा प्रयोग ठरल्याचे बोलले जात आहे. हा अर्धपुतळा अकादमीमध्ये लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. सर्वांना उत्तम काम करण्याची प्रेरणा या अर्धपुतळ्याकडे पाहून येईल, असा विश्वास उन्मेष व्यक्त करतात.


- जान्हवी मोर्ये 
@@AUTHORINFO_V1@@