केशुभाईंचे संस्मरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2020
Total Views |

keshubhai_1  H
 
 
 
 
गुजरातमध्ये सुराज्याचा पाया रोवणारे, पाया बांधणारे, दीर्घदृष्टे, राजनीतिज्ञ, अनुभवसंपन्न, धीरगंभीर, सरळ स्वभावी, सहज व सालस, लाखो कार्यकर्त्यांच्या आयुष्य उभारणीस खतपाणी घालणारे, गुजराती जनतेचे हृदयसम्राट, राज्याचे सर्वप्रिय माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे २९ ऑक्टोबर २०२० रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ‘जातस्य ध्रुवो मृत्यु’ या ब्रीदवाक्याला स्वीकारणार्‍या आपल्या संस्कृतीत, आपणा सर्वांनासुद्धा हे कटूसत्य स्वीकारणे अनिवार्यच आहे. प्रभू त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती देवो व त्यांनी मोक्षमार्गावर प्रयाण करावे, अशी मनापासून प्रार्थना. परंतु, एक समाजसेवक आणि राजपुरूषाची कमी राज्य आणि समाजाला जाणवणारच. केशुभाई पटेल यांच्याबरोबर माझ्या अनेक आठवणी (संस्मरण) आणि त्यांच्या जीवनातून घेतलेली प्रेरणा
 
 
 
 
आठवण्याची ही एक संधी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे.केशुभाई यांच्याबरोबर जनसंघाच्या वेळेपासून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून आणि गावाचा पटेल शेतकरी मुलगा या नात्याने ओळख होती. ते राजकोट, कालावड, पडघरी वगैरे विधिमंडळातून जिंकले, ते आम्ही वाचले व ऐकले. आणीबाणीनंतर जनता मोची सरकारात ते कृषी व सिंचनमंत्री बनले. त्यांनी त्यावेळी सौराष्ट्रात अनेक मध्यम व छोट्या सिंचन योजनांद्वारे ७० पेक्षा अधिक बांध बनविले, ज्याची संख्या आज ११५ पर्यंत पोहोचली आहे. एका शेतकरी मुलाला पाण्याचे महत्त्व समजले. सौराष्ट्रातून दुष्काळाला पळवून लावण्याचा त्याचा हा भगीरथ प्रयत्न! त्यानंतर राजकोटमध्ये मी स्थायिक झालो.
 
 
 
 
आधुनिक राजकोटचे स्वप्नदृष्टा अरविंदभाई मणियार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्यांच्या अपूर्ण कार्यास पूर्णत्व देण्याकरिता ‘अरविंदभाई मणियार जनकल्याण ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. ज्यात ट्रस्टी म्हणून केशुभाई, डॉ. पी. व्ही. दोशी, चिमणकाका, कांतिभाई वैद्य, रमणिकभाई वैद्य, महासुखभाई, हंसिकाबेन मणियार यांच्यासारखे महारथींच्या नेतृत्वाखाली प्रथम कमिटी सभासद म्हणून आणि त्यानंतर ‘युवा ट्रस्टी’ म्हणून माझ्यासोबत रामभाई ठाकर, शीवुभाई दवे आणि ज्योतिन्द्रभाई महेता यांच्यासारखे युवा कार्यकर्ते प्राप्त झाले. राजकोटमध्ये माझ्या कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. केशुभाईंबरोबर इतर सर्व ट्रस्टींचे मार्गदर्शन आणि विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक क्षेत्रात योगदान करण्याचे आम्हास भाग्य लाभले. आम्हास प्रोत्साहित करणे एवढेच नाही, तर आयुष्य घडविण्याचे कार्यही त्यांनी केले. ट्रस्टच्या व्याख्यान शृंखलेत अनेक विषय आणि महानुभावांचे व्याख्यान फक्त समाजासाठीच नाही, तर जीवन घडण्यात खूपच उपयोगी पडले, ज्याच्या सुखदस्मृती आज ताज्या होत आहेत.
 
 
 
 
त्यानंतर माझे भाजपमध्ये पदार्पण झाले. सक्रिय राजकारणात आल्यानंतर केशुभाई यांनी वेळोवेळी भाषणकला, विषयाचे गहन अध्ययन, आरोह-अवरोह, संवेदनात्मक, लोकभोग्य उदाहरण इत्यादींसाठी मार्गदर्शन दिल्याचे मला चांगलेच आठवते. भाजपच्या ‘पार्टी विथ डीफरन्स’चा प्रत्यय मला तेव्हा आला, जेव्हा त्यांनी एक ‘शॅडो मंत्रिमंडळा’ची रचना केली. वेगवेगळ्या प्रदेशाच्या मंत्र्यांना वेगवेगळ्या विषयात तरबेज करण्यात आले, ज्यामुळे पार्टी सत्तेत येताच खर्‍या अर्थाने लोकांसाठी सुराज्याच्या दिशेने लोककल्याणाचे कार्य करता यावे, ही होती. केशुभाईंसहित शीर्षस्थ नेतृत्वाची दृष्टी आणि त्यादृष्टीने केशुभाई हे कृषी, सिंचन आणि ग्रामविकासांचे तज्ज्ञच बनले. ही बाब त्यांनी स्वतः मला सांगितली.
 
 
 
 
मुख्यमंत्री झाल्यावर गुजरात राज्याच्या नर्मदा योजनेस त्यांनी प्राधान्य दिले. नर्मदा योजनेस पुढे नेण्यास केशुभाई यांचे बुद्धिमत्तेचे दर्शन पावलोपावली झाले. नर्मदा कॅनॉलचे कामो डॅम याचे बांधकाम झालेले नसले तरी लवकरात लवकर कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था त्यांनी जवळ जवळ असलेल्या टेकडीला बोगदा बनवून केली आणि नर्मदेला कॅनॉलमध्ये आणून सोडले. त्यासाठी मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याबरोबर चांगले संबंध टिकविण्यासाठी ओढून घेतलेला राजकीय रोष त्यासाठी द्वारिकापीठाचे जगद्गुरू परमपूज्य शंकराचार्य महाराज यांच्या प्रतिष्ठेचा उपयोग करणे, भारत सरकारसमोर सादरीकरण करणे व त्यासाठी अटलजी, अडवाणीजींना विषय समजाविणे, प्रस्तुतीकरण करणे, सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर व अचूक प्रतिवाद करण्याकरिता वकिलांना पुराव्याबरोबर मार्गदर्शन करणे आणि मेधा पाटकरांसहित इतर आंदोलनकर्त्यांबरोबर गुजरात राज्याच्या पाण्याविषयक समस्यांबद्दल संवाद साधणे, असे अनेक प्रसंग माझ्या नजरेसमोर येत आहेत.
 
 
 
 
एवढेच नाही, तर मी एकदा त्यांच्या बंगल्यावर गेलो असता, ‘नर्मदा’ या विषयात उत्सुकता दर्शविली, तेव्हा त्यांनी मला एक मोठी खोली दाखवून सांगितले की, ही संपूर्ण खोली नर्मदाविषयक साहित्यानेच भरलेली आहे. त्यातून तुम्ही वाचूही शकता व खोल अभ्यासही करु शकता! अपरोक्षपणे त्यांनी तो विषय माझ्यावर सोपविला! मी जेव्हा पहिल्यांदा संसद सदस्य बनलो, त्यावेळेस एक शेतकर्‍याचा मुलगा म्हणून शेतीची आणि त्यासाठी लागणार्‍या पाण्याची गरज या विषयाची माहिती माझ्याकडे होतीच. म्हणून ग्रामविकास, शेती, पाणीसंग्रहसारख्या संसदीय कमिटी निवडून सदस्य बनलो, ज्याच्या उपक्रमाने चेक डॅमची सुरूवात १९९५ साली माझ्या संसदनिधीमधून मी केली होती. ही सहज, सरळ, कमी खर्चातली जास्त भूजलपातली असलेली जमीन संपादन केल्याशिवाय जलरक्षा आणि त्याद्वारे भूगर्भातील जलसपाटी कशी वाढवू शकतो, अशा अनेक मुद्द्यांवर मी केशुभाईंबरोबर करीत नसे.
 
 
 
 
एक गोष्ट त्यांनी खूप गांभीर्याने घेतली. एकदा त्यांनी नितीनभाई पटेल यांच्याबरोबर गांधीनगरहून जुनागढला जाताना अचानक मला फोन केला आणि म्हणाले, “डॉक्टर कुठे आहात?” योगायोग म्हणजे मी राजकोटलाच होतो. त्यांनी सांगितले की, तुम्ही ज्या चेकडेमविषयी बोललात, ते नक्की कुठे आहे ते दाखवू शकाल का?” मी लगेच होकार दिला व त्यांना राजकोट-जेतपूर मार्गावरील बनविलेले चेकडेम दाखविले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला! आणि झालं असं की, गुजरात सरकारने त्वरित जनभागिदारीतून ६०:४०ची सरदार पटेल सहभागी ‘जलसंचय योजना’ बनविली. या योजनेमुळे क्रांती घडली. एक जनअभियानच झाले. जलयात्रा सुरू झाल्या, ज्यात अनेक गावांतून सामाजिक, धार्मिक संगठनांनी पाठिंबा देऊन लाखो चेकडेम हे गुजरातमध्ये, मुख्यतः सौराष्ट्रात बांधण्यात आले. ज्यामुळे पाण्याचा स्तर वरती आला, शेतकर्‍यांची आवक वाढली. या योजनेची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली व संसदेत मला ’वॉटर मॅनेजमेंट कमिटी’चा अध्यक्ष बनण्याचे भाग्य लाभले.
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांच्या जबाबदारीदरम्यान गुजरात विकासासाठी त्यांच्या उत्कंठेला प्रत्यक्षात आणण्याकरिता रात्रंदिवस भाजपच्या निवडणूक अजेंड्यावा समोर ठेवून रोज एक-दोन प्रजालक्षी निर्णय घेण्यात येत होते. जे मला आजही आठवतात. अवघ्या एका वर्षात अजेंड्यातील ८० टक्क्यांहून जास्त संकल्प केशुभाई यांच्या भाजप सरकारने पूर्ण केले. गुजरात राज्यात उद्योगांचा विकास व्हावा, यासाठी परदेशात स्थायिक झालेल्या गुजरातींनी योगदान द्यावे, यासाठी अमेरिकेची विदेशी यात्रा करून तिथल्या गुजराती व अन्य ‘एनआरआय’ बांधवांना गुजरात राज्यातील टेक्सटाईल्स, डायमंड, फार्मा, मशिनरी, प्लास्टिक, मरिन, पोर्ट डेव्हलपमेंट (विकसन), केमिकल्स, सिरॅमिक, कृषीसारख्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी प्रस्तुतीकरण आणि प्रत्यक्ष चर्चा करून भांडवल गुंतवणुकीचे नवे द्वार उघडले. दिल्लीत यासाठी अनेक राजदूतांबरोबर बैठक घेण्यात आली, ही त्यांची दूरदृष्टी!



गुजरात राज्यात रस्ते, वीज आणि ग्रामविकास, शेतीत नवी सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. यामध्ये महसूल सुधारणा जसे की, आठ किमी मर्यादा जमीनधारकांसाठीच्या कायद्यात सुधारणा, जमीन उच्चतम मर्यादा कलमाला रद्द करण्यासाठी ट्रॅक्टरला बैलगाडीचा दर्जा देणे, रोज आठ तास शेतीसाठी वीज देणे आणि इतर क्रांतिकारी सुधारणेची सुरुवात केशुभाईंनी केली. ज्यात त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसली. सौराष्ट्रात नर्मदा जलवाहिनी टाकण्यासाठी सुरुवात त्यांनीच केली. पूर्ण मारूती गाडी ज्यातून पार होऊ शकेल तेवढ्या मोठ्या व्यासाची वाहिनी टाकून त्यांनी सौराष्ट्राच्या पाण्याची तहान भागवण्याची सुरूवात केली.
असेच एक भागिरथ कार्य म्हणजे गुंडगिरी निर्मूलन अभियान. केशुभाईंनी सरकारी कायदेव्यवस्था एवढी भक्कम केली की, ज्यामुळे मोठमोठे गुंड गजाआड गेले. प्रजेच्या सुखशांतीची त्यांची इच्छा पूर्ण झाली. सर्वत्र त्यांची वाहवा झाली. शंकरसिंह वाघेला यांच्या विद्रोहानंतर झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत १२७ जागांवर जिंकून पुनश्च गुजरात राज्याच्या जनतेने केशुभाईंना मताधिक्याने जिंकवून दिले. आज पण लोकांच्या मनात त्यांच्या शांतिराज्याच्या आठवणी ताज्या आहेत.
 
 
 
 
सामाजिक व धार्मिक संस्थांना सरकारबरोबर जनभागीदारीत जोडून विकासाच्या यात्रेला गती देण्याच्या अभिनव प्रयोगाची सुरूवात केशुभाईंच्या भाजप सरकारनेच केली. राजकोटच्या बी. टी. सवाणी कुष्ठरोगाच्या हॉस्पिटलसाठी त्वरित निर्णय घेऊन, टोकन दराप्रमाणे जमीन हस्तगत करण्याकरिता व त्यानंतर त्यासारख्या योजना बनवून संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्यांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे ‘ज्ञाति ट्रस्ट’च्या हॉस्टेल, स्कूल्स आणि कॉलेजकरिता जमिनी उपलब्ध करून दिल्या. मुलींच्या शिक्षणासाठीची धडपड आणि गतिमान आरंभ केशुभाई पटेल यांच्या शासनातच झाली. मोरबीसाठी डॉ. व्ही. सी. कटारिया जे पूर्णवेळ डोळ्यांचे सर्जन होते, यांच्या कामगिरीचे कौतुक करत एक स्वतंत्र सरकारी डोळ्यांच्या हॉस्पिटलचा दर्जा देऊन डॉ. कातरिया यांना त्यांच्या सेवेबद्दल केशुुभाईंनी सन्मानित केले. डॉ. व्ही. सी. कटारिया यांनी विश्वविक्रम केले आणि मोरबी गावाचे देवदूत डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळविला. डॉ. कटारिया यांनी डॉक्टरी पेशेला सर्वार्थाने गौरवान्वित केले. आज पण डॉ. कटारिया हे लोकहृदयी वसले आहेत.
 
 
असेच एक महत्त्वाचे कार्य लोकप्रिय सेवाभावी सर्जन आणि सद्भावना हॉस्पिटलचे संस्थापक लोकसेवक डॉ. कनुभाई कलसारिया यांचे. त्यांची ओळख केशुसाहेबांनीच करवून दिली. त्यांना भाजपमध्ये आणण्याकरिताची बोलणी प्रदेश टीमला करून निर्णय घेऊन डॉ. कनुभाई कलसारिया यांना विधिमंडळाचे तिकीट मिळाले. त्यांनी छबीलदास महेता यांना हरविले. अशाप्रकारे सज्जनशक्तीला राजकारणात जोडण्याची नवीन कार्य व सृजनात्मक दृष्टी केशुसाहेब आणि भाजपमध्ये बघण्यास मिळाली.
कच्छच्या भूकंपावेळी केशुभाईंची बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय कौशल्याचे अनेक किस्से सरकारी अधिकार्‍यांकडून ऐकायला मिळत. मीदेखील ते प्रत्यक्षात अनुभवले. कच्छमध्ये त्यांनी ठाण मांडून पूर्ण यंत्रणा कामाला लावली. सामाजिक संस्थांना मदतकार्यात जोडून केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारच्या सहकार्याने कच्छला परत उभे करण्यात त्यांनी स्वतःची पूर्ण शक्ती पणाला लावली.
 
 
 
 
दहा-दहा तास सभा घेऊन लवकरात लवकर निर्णय घेताना साहेबांना मी बघितले आहे. एका अधिकार्‍याने मला सांगितले की, रात्री १२ वाजता ते साहेबांची सही घ्यायला गेले. साहेबांनी उठून एवढेच विचारले की, “प्रजाहितासाठी आहे ना?” बस्स! एवढेच विचारून लगेच सही करून दिली! एवढा विश्वास अधिकार्‍यांवर ठेवून त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा व मार्गदर्शन याबरोबरच केशुभाई स्वातंत्र्यही देत असत. शेवटच्या काळात सोमनाथ ट्रस्टच्या ट्रस्टी व अध्यक्षांच्या नाते सोमनाथ ट्रस्ट संकुलाची विकासाची परिकल्पना आणि त्याला साकारण्यासाठीचे भगिरथ प्रयत्न केशुभाईंनी केले. कोट्यवधींची देणगी आणून, जमिनी खाली करविणे, नवीन गेस्टहाऊस बनविणे, मंदिराचा जीर्णोद्धार करणे, समुद्रतटाला भिंत बांधणे, आकर्षक रमणीय प्रर्यटनस्थळ बनविणे व गोशाळा विकसित करणे यांबरोबर इतर अनेक विकासाची कामे करून सोमनाथ मंदिराला पुन्हा गौरवशाली स्मारक बनविण्याच्या कार्यात केशुभाईंची बुद्धिमत्ता, आंतरदृष्टी, प्रशासकीय कौशल्य अशा अनेक गुणांचे दर्शन होते. मला नेहमी सोमनाथ ट्रस्टबद्दल चर्चा होत असताना, त्यांचा इतिहास, धर्म आणि संस्कृतीबद्दलचा गूढ अभ्यास आणि चिंतनाचे दर्शन त्यांच्यात होते.
 
 
केशुभाई प्रत्येक समाजात एवढेच लोकप्रिय होते. गरिबांचे वाली होते. वनवासी, मजूर, महिला, कामगार, दलित, प्रत्येक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे-नवे विचारांची नवी-नवी योजनांना कार्यान्वित करतच राहिले. सरकारी अधिकार्‍यांना साहेबांची बुद्धिमत्ता व बहुमुखी प्रतिभेपासून नेहमी प्रभावित करणार्‍या अशा अनेक आठवणींची शृंखला माझ्या मनात आजही ताजी आहे. एक महामानव जो जनकल्याणाकरिता समर्पित, कुशल संघटक व प्रशासनकर्ता, प्रखर राष्ट्रभक्त व राजपुरूष असे केशुभाई पटेल यांची कमतरता अनेक वर्षे समाजाला भासणार आहे.॥ ॐ शान्ति ॥
 
 
- डॉ. वल्लभभाई काथरिया




(लेखक राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@