पश्तुनी आणि ‘मुस्लीम ब्रदरहुड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2020   
Total Views |

pashtuni_1  H x
 
 
 
‘मुस्लीम ब्रदरहुड’च्या गप्पा मारत जगभरातल्या मुस्लिमांना एकत्र यायचे आवाहन पाकिस्तान करतो. मात्र, त्यांच्याच देशात धर्माने मुस्लीम असलेल्या पश्तुनींना मात्र पाकिस्तानमध्ये जगणे मुश्किल आहे. पश्तुनी हे अफगाणी लोकांसारखे राहतात, हा आक्षेप पाकिस्तान्यांचा आहे.
 
 
 
पश्तुनींच्या समुदायामध्ये अफगाणी दहशतवादी लपलेले आहेत का, हे पाहण्यासाठी पश्तुनींच्या वस्तीमध्ये नेहमीच पाकिस्तानी सैन्याची दादागिरी चाललेली असते; अर्थात त्यामुळे पश्तुनींचे दैनंदिन जगणे हलाखीचे झाले आहे. पश्तुनी या सगळ्या प्रकाराला त्रासले, त्यांनी मग पाकिस्तानी सरकारला विरोध सुरू केला. इथल्या जनतेचा विचार न करता, इथल्या निसर्गाची हानी सुरू केली.
 
 
या सर्वाचा परिपाक होता खैबर पख्तून; अर्थात बलुचिस्तानातून सुरू झालेली ‘महसूद तहफूज मूव्हमेंट.’ ‘महसूद’ ही बलुचिस्तानातील पश्तुनींची एक जात आहे. 2014 साली बलुचिस्तानातील खाणी बंद करण्यासाठी गोमल विश्वविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की, या खाणीमुळे परिसरात वसलेल्या ‘महसूद’ समुदायावर भयंकर परिणाम होतात. पण, त्यामध्ये नकिबुल्लाह महसूद याचा खून झाला. त्याला न्याय मिळावा म्हणून मग हे आंदोलन पूर्ण बलुचिस्तानात सुरू झाले.
 
 
मग आंदोलनाचे नाव ‘महसूद’ ऐवजी ‘पख्तून तहफूज मूव्हमेंट,’ असे केले गेले, तर सध्या पाकिस्तानमध्ये सध्या ‘पख्तून तहफूज मूव्हमेंट’ आंदोलन जोर धरत आहे. कारण, या आंदोलनाचे नेते ओवाएस अब्दल यांना गेल्या महिन्यात पाकिस्तानी सरकारने अटक केली. मात्र, एक महिना झाला तरी ते कुठे आहेत, याचा थांगपत्ता कुणालाही नाही. बलुचिस्तानातील अशा प्रकारे किती तरी पश्तुनी नेते, विचारवंत, साहित्यिक, कलाकार आणि स्त्रिया गायब झाल्या आहेत. त्यांचे पुढे काय झाले, याचा मागमूस कुणालाही लागला नाही.
 
 
त्यामुळे पश्तून नागरिकांना वाटत आहे की, अब्दल यांनाही पाकिस्तान सरकारने असेच गायब केले असावे. कदाचित, त्यांचा खून केला असावा. पश्तुनी आंदोलकांना, नागरिकांना असे वाटते. कारण काही महिन्यांपूर्वी बलुचिस्तानमधील प्रोफेसर लियाकत सानीही असेच गायब झाले होते. पश्तुनी समुदायावर होणार्‍या अत्याचाराबद्दल ते विचार मांडत असत. एकेदिवशी ते त्यांच्या सहकार्‍यांसोबत विद्यापीठात जात असतानाच, सहकार्‍यांसकट त्यांचे अपहरण केले गेले. पुढे त्यांच्या सहकार्‍यांना सोडले गेले. मात्र, लियाकत अजूनही गायब आहेत.
 
 
ते कुठे आहेत? जीवंत आहेत की नाही, याबाबत कुणालाही काही माहिती नाही. पाकिस्तानी यंत्रणा सांगते की, आम्हीही लियाकत यांचा शोध घेत आहोत. पण, यावर पश्तुनींचा विश्वास नाही. त्यांचे म्हणणे, पाकिस्तान प्रशासनानेच त्यांना गायब केले असावे. असो, कोण आहेत हे पश्तुनी? पश्तुनी समुदायाचा वास्तवइतिहास इस्लामच्याही पूर्वीचा आहे, असे मानले जाते. पण, पश्तुनी किंवा पठाण हे सध्या इस्लामचेच बंदे मानतात. तरीही सांस्कृतिक भिन्नता कायमच आहे. संस्कृती, भाषा आणि जीवनशैली यामुळे पश्तुनी आणि पाकिस्तानमधील इतरांमध्ये एक प्रकारचा भेद कायमच राहिलेला आहे.
 
 
पाकिस्तानी विनोदी साहित्यामध्ये विनोदाचा आणि व्यंगात्मक टीकेचा धनी जर कोण असेल तर तो पश्तुनी समुदाय. अडाणी, गबाळा असे त्याचे रेखाटन केले जाते. पश्तुनी जीवनशैलीवर किंवा व्यक्तिरेखेवर तिथे चित्रपट, साहित्यनिर्मिती होतच नाही. चित्रपटात नोकर किंवा सुरक्षारक्षकाची भूमिका इतकेच पश्तुनी व्यक्तिरेखेच्या नशिबात असते. थोडक्यात काय, तर पश्तुनी जीवनशैली आणि पश्तुनी समुदायाला पाकिस्तानमध्ये दुय्यम नागरिकत्वच दिले जाते.
 
 
त्यातच काही दशकांपूर्वी अफगाण आणि तालिबान यांचे अत्याचार वाढले. मग पाकिस्तानमध्ये पश्तुनी समुदायाला तालिबानचे समर्थक म्हटले गेले. का तर पश्तुनी हे पठाणच! मात्र, हे सत्य नाही. त्यांच्या एकूणच वागण्यामुळेही पाकिस्तानमध्ये त्यांना जरा ‘वेगळे’ म्हणूनच पाहिले जाते. पश्तुनी मुस्लीम असूनही त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये अन्याय होत आहे. आता कुठे गेले ‘मुस्लीम ब्रदरहुड?’



@@AUTHORINFO_V1@@