शिकार्‍यांचा कर्दनकाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2020   
Total Views |
forest _1  H x


शिकार्‍यांची शिकार करण्यासाठी वन विभागात प्रसिद्ध असलेले राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्याविषयी...



मुंबई (अक्षय मांडवकर) - काही वनाधिकारी वनसेवेतील आपल्या धडाकेबाज आणि निष्ठावान कार्यपद्धतीमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात वेगळी छाप पाडतात. याच अधिकार्‍यांच्या पंक्तीमधील हा एक वनाधिकारी. वनगुन्ह्यांचा पाठपुरावा करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखा हा माणूस काम करतो. एखादे प्रकरण धसास नेऊन आरोपींना गजाआड करण्यासाठी वनविभागामध्ये हा अधिकारी प्रसिद्ध आहे. मेळघाटामध्ये वाघांची शिकार करणार्‍या शिकार्‍यांची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शिवाय देशातील पहिले ‘वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेल’ उभारण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिकार्‍यांचा कर्दनकाळ असणारा हा अधिकारी म्हणजे विभागीय वनाधिकारी विशाल माळी.
 
  
अहमदनगर येथे दि. 31 मे, 1981 साली माळी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हनुमंत माळी शासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे माळी कुटुंबीयांचे बिर्‍हाड दर तीन वर्षांनी एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात स्थलांतरित होत असे, म्हणूनच विशाल माळींचे बालपण खानदेश, कोकण आणि नाशिक अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये गेले. माळींना लहानपणापासूनच प्राणी आणि निसर्गप्रेमाची आवड होती. नाशिकमधील येवल्यात इयत्ता सहावीत शिकत असताना त्यांनी आपले मित्र आणि भावासमेवत वाघ पकडण्याची स्वप्न पाहिली. या स्वप्नपूर्तीच्या नादात ही तिघंही पोरं जंगलात पळून गेली. दुसर्‍या दिवशी सापडलेल्या या पोरांना आजही गावात वाघ पकडायला गेलेली पोरं म्हणून ओळखतात.
 
 
 
निसर्ग आणि पर्यावरणाचा नाद असल्यामुळे माळींनी शिक्षणही त्याच माध्यमांमध्ये घेतले. अकोल्यातील ‘पीकेव्ही कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री’मधून ‘वनशास्त्र’ विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देहरादून येथील ‘फॉरेस्ट रिसर्च इस्टिट्यूट’मधून ‘वूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी’मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या कालावधीतच त्यांनी बांबूवर संशोधनाचे काम सुरू केले आणि आपल्या ‘पीएचडी’ची तयारी केली. मात्र, ‘पीएचडी’ पूर्ण न झाल्याने त्यांनी 2005 साली ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ची (युपीएससी) परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. त्यामागे उद्दिष्ट एकच होते ‘आयएएस’ होणे.
 
 
 
माळींनी 2008 साली ‘युपीएससी’ बरोबरच ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची’ही (एमपीएससी) परीक्षा दिली. ‘एमपीएससी’ची परीक्षा त्यांनी आजारी असताना दिली. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आणि त्यांची वनविभागात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. 2009 ते 2011 या कालावधीत त्यांचे देहरादून येथे वनविभागाचे प्रशिक्षण झाले. 2011 सालीच ते नंदुरबारमध्ये साहाय्यक वनसंरक्षकपदावर रुजू झाले. या ठिकाणी वर्षभर कार्यरत असताना त्यांनी तोरणमाळ परिसराचा पर्यटन विकासाचा आराखडा तयार केला. त्यानंतर 2012 साली त्यांची बदली ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’मध्ये झाली. या ठिकाणची त्यांची कामगिरी विशेष गाजली. मेळघाटमधील धाकणा वनक्षेत्रात वाघाच्या शिकारीचे प्रकरण घडले होते. जागेवर सापडलेल्या वाघाच्या अवशेषाची ‘डीएनए’ तपासणी केली आणि महत्त्वाचे म्हणजे, ‘फोन कॉल रिकॉर्ड’ असे सायबर पुरावे गोळा केले. याआधारे त्यांनी या प्रकरणातील व्यापारी आणि शिकार्‍यांसह एकूण 13 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यांची खाते परीक्षा होती. त्याचवेळी न्यायालयाची सुनावणीही ठेवण्यात आली. सुनावणीला गैरहजर राहिल्यास त्याचा फायदा आरोपी घेतील, या विचाराने त्यांनी खाते परीक्षा दिली नाही. सरतेशेवटी या प्रकरणातील तीन आरोपींना सात वर्षांची आणि सहा आरोपींना पाच वर्षांची शिक्षा झाली.
 
 
 
या प्रकरणातील धडाकेबाज कामामुळे माळींच्या कामाचा गवगवा झाला. त्यानंतर त्यांनी ‘सीबीआय’सोबतही व्याघ्र शिकारीची तीन-चार प्रकरणे हाताळली. या कामामुळे त्यांना देशभरातील व्याघ्र शिकारीची प्रकरणे हाताळण्याची संधी मिळाली. या माध्यमातून मध्य प्रदेश, पंजाब, ओडिशा, दक्षिण भारतात त्यांनी धाडी मारल्या. त्याद्वारे 70 आरोपींना अटक केली. ही प्रकरणे हाताळताना त्यांनी सायबर पुराव्यांचा आधार घेतला. याच बळावर त्यांनी मेळघाटमध्ये देशातील पहिला ‘वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेल’ स्थापित केला. 2015 साली शासनाने अधिसूचना काढून या सेलला मान्यता दिली. 2016 साली त्यांची नियुक्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झाली. या ठिकाणी त्यांनी पर्यटनाच्या अनुषंगाने सुधारणा घडवून आणल्या. खासगी वाहनांवर बंदी आणल्या.
 
 
2017 साली त्यांना पदोन्नती मिळाली आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ते विभागीय वनाधिकारी म्हणून काम करू लागले. पुन्हा मेळघाटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यावर माळींनी पर्यटन, गावांचे पुनर्वसन आणि वन्यजीव संवर्धनावर भर दिला. ‘मेळघाट वन्यजीव विभाग’ या स्वतंत्र विभागाची स्थापना केली. ऑगस्ट, 2020 साली त्यांची बदली राधानगरी अभयारण्याच्या विभागीय वनाधिकारी पदावर झाली आहे. थोड्या कालावधीतच त्यांनी या परिसरातील वनसंरक्षणाच्या कामाला शिस्त लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. येथील पर्यटन सुधारण्याबरोबरच शिव आणि शाहूकालीन वास्तूंचे जतन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिवाय, सह्याद्रीमधील वन्यजीवांच्या वैविध्याचा उलगडा करण्याच्या अनुषंगाने वन्यजीव संशोधनाच्या कामांना प्राधान्य देण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@